आडातलं

श्याम पेठकर

/media/आडातलं_adatale.jpg

निखळ आनंददायी कथा - सीमा भानू bhanuseema@gmail.com

श्याम लिहीत नाही, तो खेळ मांडतो…. वाचनार्‍यांना खेळात ओढतो… आपल्या नकळत..
वाचन थांबतं; आणि आपलं त्रयस्थापण संपतं… त्या खेळातले गडी होतो… प्रत्येक पात्र आपल्याला हाडा मासाचं होऊन भेटतं…
एक रसरशीत अनुभव….
एक कथा संपल्यावर दुसरीच्या वाट्याला जाताना थोडी उसंत घ्यावी लागते. अजून पहिलीचं गारूड रुंजी घालीत असतं.

श्याम पेठकर हे नाव त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लेखनामुळे प्रसिद्ध आहे. ‘आडातलं’ हा त्यांचा कथासंग्रह विजय प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. संग्रहात सहा कथा आहेत. पैकी पाच लघुकथा, तर एक दीर्घकथा आहे. या सगळ्या कथांची पार्श्वभूमी आहे ती ग्रामीण. बहुतेक कथा राजकारणाच्या निमित्ताने घडतात. एखाद्या संवेदनशील विषयाची चाहूल जरी लागली तरी राजकारणी आपली खेळी खेळून तो विषय कसा ताब्यात घेतात आणि त्याचे श्रेय कसे उपटतात; शिवाय आपल्या सोयीने त्याची हवा कशी काढून घेतात याचे चित्रण ‘अंधारात मारलेला दगड’ या कथेमध्ये आढळते. किरकोळ मुद्दय़ावर सामान्य लोकांना एकमेकांत झुंजवून त्यातून आपला फायदा करून घेणारे राजकारणी ‘झमेला’मध्ये प्रकर्षांने दिसतात. ‘सत्तांतर’मधील पात्रे तर आपल्या ओळखीचीच आहेत. नावे थोडी बदलली तरी व्यक्तिचित्रे आणि प्रसंग हे प्रत्यक्षात घडलेले आणि तेही अलीकडच्या काळातले असल्याने कुणाबद्दल लिहिले आहे हे समजून घेणे अजिबातच कठीण नाही.
‘खुर्ची’मध्येही आपल्या परिचयाचीच पात्रे आहेत. दुरुस्तीसाठी बाजूला काढून ठेवलेल्या एका खुर्चीपायी जे काही राजकारण घडते, चेहऱ्यामागचे चेहरे दिसतात, ते फार खुमासदार पद्धतीने मांडण्यात आले आहे. या नर्मविनोदी कथेचा शेवट काय असेल याची उत्कंठा शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. राजकारणाच्या पार्श्वभूमीवरच्या या कथांमधील बरीचशी पात्रे अतरंगी आहेत आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यात ग्रामीण बेरकेपणा चांगलाच मुरलेला आहे. ‘हिशेब’ ही या संग्रहातील एक वेगळी कथा. ग्रामीण भागात शेती करून सगळ्या भावंडांचे क्षेमकुशल पाहणारा साधाभोळा मोठा भाऊ. आणि त्याच्याकडून सारे काही करून घेऊन नंतर त्याच्याच तोंडाला पाने पुसणारे शहरी तोंडवळ्याचे लहान भाऊ असा विषम संघर्ष इथे आहे. कथेचा शेवटही काहीसा अनपेक्षित होतो. या संग्रहातील अगदी निराळी कथा आहे ती ‘आपुले मरण..’ ही. गावातील डबघाईला आलेल्या देशमुखांच्या वाडय़ात गुप्तधन आहे असा प्रवाद आहे. त्यामुळेच हा जुना वाडा त्यांनी विकलेला नाही, असे गावकरी म्हणतात. अशात वाडय़ात राहणाऱ्या गुरख्याचा संशयास्पद मृत्यू होतो. त्यानंतर वाडय़ाची देखभाल केलेली गौरी, मालक देशमुख मास्तरांची बहीण नयना, गौरीचा मुलगा विन्या, मास्तरांचा मुलगा जय आणि शेवटी मास्तर या सर्वाचेच एकापाठोपाठ मृत्यू होतात. तर गौरीचा नवरा गणेश बेपत्ता होतो. या सगळ्या घटितांमागची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
श्याम पेठकरांची कथा आयुष्यातील छोटे आनंद, महत्त्वाकांक्षा, साध्या अपेक्षा आणि प्रश्न मांडते. काही अपवाद वगळता या साऱ्या सामान्य माणसांच्याच कथा आहेत. त्यामुळे त्या वाचताना आपल्याशा वाटतात. बहुतेक कथांतील संवाद हे वैदर्भीय भाषेतील असले तरी त्यांचा अर्थ कळणे फारसे अवघड जात नाही. शिवाय कानाला ते गोडही लागतात. लेखकाची लेखनशैली खूप सहजरीत्या विषय मांडत पुढे सरकते. त्यामुळे सगळ्या कथा निखळ आनंद देऊन जातात. विवेक रानडे यांनी केलेले पुस्तकाचे मुखपृष्ठ लक्षणीय आहे.

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा