पृथ्वीचे आख्यान

अतुल देऊळगावकर

/media/पृथ्वीचे आख्यान_Prithi.jpg

कुतूहल : पृथ्वीचे आख्यान - अजिंक्य कुलकर्णी


मानवानं निसर्गाच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. आणि हे आत्मघातकी आहे.
प्रक्षुब्ध झालेला निसर्ग निकरानं परतीचा प्रबळ हल्ला करत आहे.

पाणथळ जागा संपत चालल्या असुन वाळवंटं वाढत आहेत.
अरण्यतोड थांबत नाही. जैवविविधता कोसळत आहे.
दहा लाख प्रजाती समूळ उच्चाटनाच्या धोक्यात आहेत.
सर्व महासागर प्लॅस्टिकने तुंंबुन जात आहेत.

आपल्या डोळ्यांदेखत पर्यावरणीय यंत्रणा नष्ट होत आहेत. सध्या जग कडेलोटाच्या बिंदूवर येऊन ठेपलं आहे. सध्या चालू असलेल्या ह्या बहुविध अराजकाला मानवी कृत्येच जबाबदार आहेत.
याचा अर्थ मानवी कृतीच त्यांना रोखू शकते.
आणि त्यासाठी हे दशक निर्णायक ठरणार आहे.

माणसाने चालवलेले अनन्वित अत्याचार झेलणाऱ्या सहनशील धरतीकडून मिळालेला निर्वाणीचा इशारा
--------

पर्यावरण अभ्यासक, लेखक अतुल देऊळगावकर यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजेच ‘पृथ्वीचे आख्यान’ हे होय. या पुस्तकात देशविदेशात माणसांनी गेल्या दोन दशकांत निसर्गविरोधी ज्या ज्या कृती केल्या आहे त्याचा आढावा घेतला आहे. २००६ च्या अखेरीस जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ सर निकोलस स्टर्न यांनी ‘हवामान बदलाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम’ हा अहवाल सादर केला. त्यात ते म्हणतात की, ‘येणाऱ्या दोन दशकांत आपण कसे वागतो यावर आपले भविष्य ठरणार आहे. दोन महायुद्धे व महामंदीनंतर आलेली परिस्थिती क्षुल्लक वाटावी अशी आर्थिक व सामाजिक उलथापालथ होऊ शकते. कर्बवायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी निधीदेखील अवाढव्य लागणार आहे. परंतु तो वाचविण्याचा विचार जगासाठी विघातक ठरणार आहे. विचार करण्यासाठीसुद्धा सवड नाही अशी युद्धजन्य आणीबाणीची स्थिती हवामान बदलाने आणली आहे.’

भारतातील विविध पर्यावरणीय चळवळी जसे की ‘चिपको’, ‘कित्तिको’ व ‘सायलेंट व्हॅली’ यांचा आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. पर्यावरणाच्या संदर्भात ज्या अभ्यासकांनी, संशोधकांनी, चळवळी उभ्या केलेल्या स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी जे योगदान दिले आहे त्यांच्या कार्याचा आढावा यात वाचायला मिळतो. हवामान बदल हा वर्तमानातील प्रदूषणाचा परिणाम नसून तो भूतकाळातील प्रदूषणाचा परिणाम आहे. कर्ब उत्सर्जनात अमेरिकेसहित विकसित राष्ट्रांचा वाटा हा जवळजवळ ५० टक्के इतका आहे. १९८८ साली हवामान बदल ही संकल्पना आली. त्या वर्षी हवामान बदलासंबंधी पहिली जागतिक शिखर परिषद झाली. मानवी हस्तक्षेपामुळे जगाचे तापमान हे ०.३ ते ०.६ अंश सेल्सिअसने वाढत आहे. हवामान बदलासंबंधी पहिली वसुंधरा परिषद १९९२ साली ब्राझीलमधील रियो या शहरात झाली. या परिषदांमधून कर्ब उत्सर्जन कमी करण्याचे करार होतात खरे, पण त्याची अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे होत नाही.

हवामान बदलाचा व कर्ब उत्सर्जनाचा थेट संबंध आता स्पष्ट झालेला आहे. तरीही कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारात कसे बदल व्हावेत, हा मुद्दाच आजतागायत कधीही आला नाही. व्यापार आणि हवामान बदलाचा फार घनिष्ठ संबंध आहे. हवामान बदलामुळे पृथ्वीचे वाढत असलेल्या तापमानामुळे अंटाक्र्टिका खंडावरील बर्फ वितळू लागला आहे. हवामान बदल, जैवविविधता आणि हवामान यांचा विविध साहित्य, संगीत आणि चित्रपटांमध्ये काय संदर्भ आहे हेसुद्धा या पुस्तकात वाचायला मिळते.
– अजिंक्य कुलकर्णी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org

द्वारा : लोकसत्ता वृत्तसेवा