‘साहित्यिक म्हणून ओळख मिळाली’
नरहर कुरुंदकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
आणीबाणीनंतरच्या महाराष्ट्रात ज्या साहित्यिक आणि विचारवंतांनी महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व केलं त्यामध्ये कुरुंदकरांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी लिहिलेले उतारे, निबंध, लेख हे सोशल मीडियावर सातत्याने दिसत राहतात.
15 जुलै 1932 साली कुरुंदकरांचा जन्म परभणी जिल्ह्यातला नांदापूर (आता हिंगोली जिल्हा) येथे झाला. प्राथमिक शिक्षण वसमतला झाल्यानंतर ते त्यांच्या मामाच्या घरी हैदराबादला गेले आणि तिथं त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं.
कुरुंदकरांचे मामा नांदापूरकर हे प्राध्यापक होते. आपल्या भाचाच्या जिज्ञासू वृत्तीची त्यांना जाण होती. त्यामुळे कुरुंदकर अगदी 10-12 वर्षांचे असले तरी त्यांचे मामा त्यांच्याशी इतिहास, पुराणं, तत्त्वज्ञान, साहित्य याची चर्चा करत.
साधारणतः अकराव्या वर्षापासून कुरुंदकरांनी लिखाणाला सुरुवात केली. 11 व्या वर्षी त्यांनी कविता केली आणि एका नियतकालिकाला पाठवली. त्यांना वाटलं पुढच्या अंकात ती छापून येईल. पण आली नाही. तेव्हापासून ते नियमित लिहून नियतकालिकांना आपले लेख साहित्य पाठवू लागले. त्यांचा पहिला लेख त्यांच्याच मामांनी छापला.
पहिला लेख छापून येण्यासाठी त्यांना 10-11 वर्षं लागली. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहावं लागलं नाही. पण ते महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय तेव्हा बनले जेव्हा 1956 ला बा. सी. मर्ढेकर यांच्यावर लिहिलेल्या समीक्षणाची लेखमाला ‘सत्यकथा’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. त्यांनंतर मुंबईच्या मराठी साहित्य संघाने त्यांना सौंदर्यशास्त्रावर व्याख्यानासाठी बोलवलं होतं.
गमतीचा भाग म्हणजे कुरुंदकर तेव्हा इंटर (आताचं बारावी) पास नव्हते तेव्हा त्यांची पुस्तकं बीएला अभ्यासक्रमाला होती. ते मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते, ते बीए पास नव्हते त्याआधी ते मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर होते, एम. ए. पास झाले नव्हते त्याआधी त्यांचा रिचर्ड्सची कलामीमांसा हा संशोधनावर आधारित असलेला ग्रंथ आला होता. त्यावेळी ते नांदेडच्या प्रतिभा निकेतन शाळेत प्राथमिक शिक्षक होते.