लेखक घर बांधतो
ख्यातनाम कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी पुण्यात आपल्या मनाप्रमाणे बांधलेल्या ‘अक्षर’ या वास्तूचे अतिशय हृद्य वर्णन त्यांच्या ‘लेखक घर बांधतो’ या लेखात केले आहे. हे घर साहित्य-कला-संस्कृतीच्या असंख्य मैफलींनी नेहमी निनादत राहिले. आज काळाच्या तकाज्याने लेखकाचे हे घर अस्तंगत होते आहे. पण अनेकांच्या आठवणींत घर करून राहिलेल्या या घराच्या उभारणीच्या दस्तुरखुद्द लेखकानेच सांगितलेल्या आठवणी आम्ही संपादित रूपात पुनर्मुद्रित करीत आहोत.
बासष्ट साली घर पुरं झालं. खर्च बावन्न हजार झाला. घराला नाव पाहिजे. मी ते ‘अ क्ष र’ ठेवलं. अक्षरावर घर झालं होतं.
तेव्हा आसपास इमारतींची गर्दी झालेली नव्हती. बरंच रान मोकळं होतं. त्या पाश्र्वभूमीवर माधवरावांनी तयार केलेलं घराचं डिझाइन टुमदार आणि वेगळं दिसे. घर म्हणून त्याचं त्याला खास व्यक्तिमत्त्व होतं. केवळ आडवे उघडे वासे, मध्येच दिसणारा छपराचा भाग बघून काहीजण विचारीत, ‘याच्यावर पत्रे घालायचे राहिले काय?’
काहीजण सुचवीत : ‘‘निदान पारदर्शक पत्रे तरी घालून घ्या.’’
घरातही थोडं ऊन, वारा, पाऊस आला पाहिजे; बाहेरच्या वातावरणापासून आपण एखाद्या बंद पेटीत राहिल्यासारखं राहू नये, म्हणून अंगणवजा हा भाग उघडा होता. माधवरावांचं सांगणं होतं की, या Perforations ची खालच्या भिंतीवर चांगली छाया पडेल.’
आचवलांनी फर्निचर अद्याप सुचवलं नव्हतंच. आम्हीच सुचेल तसं घर सजवलं होतं. ते अनेकांना आवडलं.
सत्तर साली एन. एस. डी.चे अल्काझी एकवार घरी आले होते. ते म्हणाले, ‘‘मराठी लेखकाचं इतकं सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहतोय.’’
दोन हात झोपडी बांधू शकतात; मोठं घर बांधायचं तर अनेक हात लागतात.
सुरुवातीपासूनच माझ्या घराला लेखक, प्रकाशक, संपादक यांचा हातभार लाभला होता. घर पुरं झाल्यावर वास्तुशांती कवीच्या हातून झाली. होमहवन अण्णा-वहिनींनी केलं.
(मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित.. ‘प्रवास एका लेखकाचा’मधून साभार)