अरविंद प्रभाकर जामखेडकर यांचा जन्म ६ जुलै १९३९ रोजी मालेगाव, नासिक येथे प्रभाकर, लक्ष्मी यांच्या पोटी मध्यमवर्गीय घरात झाला. पारंपरिक गाणपत्य संप्रदायाच्या त्यांच्य घरात गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती घरीच बनवण्याची परंपरा आजही पाळली जाते. घरातूनच त्यांना कलादृष्टी आणि बुद्धीवादी तत्त्वज्ञानाचा वारसा मिळाला. प्रभाकरराव मालेगावच्या शाळेत शिक्षक होते आणि संस्कृतातील विद्वान. अरविंद ना घरातूनच संस्कृतचे बाळकडू मिळाले होते. आपल्या मुलानं संस्कृतचं अध्ययन करावं, त्यात तज्ज्ञता मिळवावी, अध्यापन करावं या वडिलांच्या इच्छेला जामखेडकर सरांनी मूर्तरूप तर दिलंच, एवढंच नाही, तर त्यापुढे कित्येक योजने ते चालून गेले. त्यांच्या सहाही मोठ्या बहिणी संस्कृत विषयात प्रवीण होत्या. बरोबरच इंग्लिश भाषेचे ज्ञान आणि गणित विज्ञानातील प्रावीण्य हा त्यांना लाभलेला विद्वत्तेचा वारसा होता. शालेय शिक्षण मालेगाव येथे झाल्यावर उच्च शिक्षणासाठी अरविंद पुण्याला आले.
१९५४ ते १९५८ या काळात बालमुकुंद लोहिया संस्कृत पाठशाळेत (आताचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ) त्यांचे संस्कृतचे पारंपरिक शिक्षण झाले आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयात व नंतर पुणे विद्यापीठात औपचारिक शिक्षणाची सुरुवात झाली. या काळात त्यांनी वेदांचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या पुण्यातील वास्तव्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर सिद्धेश्वरशास्त्री चित्राव आणि प्रा. रा.ना. दांडेकर यासारख्या भारतविद्येच्या गाढ्या अभ्यासकांचा व पं. भागवत गुरुजी (पं. वा.भा. भागवत) आणि धुपकर गुरुजी या संस्कृत-प्रेमींचा मोठा प्रभाव पडला. पुण्यातील डेक्कन अभिमत विद्यापीठ म्हणजे पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासकांची काशी. त्याचे कुलपती म्हणून जामखेडकर सरांची नुकतीच निवड झाली.
https://maharashtranayak.in/jaamakhaedakara-aravainda-parabhaakara
https://www.evivek.com/Encyc/2016/9/12/dr-arvind-jamkhedkar.html