लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे. लहानपणापासूनच वडिलांचा व्यासंगी श्वास लाभल्याने त्यांनी समाजशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी साहित्याशी निगडित शास्त्रांचा आवश्यक तो अभ्यास केला, तसेच वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, जैन, बौद्ध, ख्रिस्ती धर्मग्रंथ यांच्याशीही ओळख करून घेतली. दंतकथा, मिथके यांचेही महत्त्व अभ्यासले.
कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्यविषयक, सामाजिक इतिहासपर, किशोरांसाठी व कुमारांसाठी लेखन असे सर्व वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले आहेत. संपादनेही केलेली सुनीता देशपांडे यांच्या निकटच्या सहवासातून अरुणा ढेरे यांची वैचारिक आणि साहित्यिक बैठक अधिक समृद्ध झाली आहे असे म्हणता येऊ शकेल. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. या शिवाय स्फुट लेखसंग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.स्वातंत्र्यपूर्व काळातील विशेष कारकीर्द घडविलेल्या महिलांवर त्यांनी विशेष लेखन केलेले आहे.मराठी साप्ताहिके,मासिके,वृत्तपत्रे यांचे त्यानी संपादन केलेले आहे.