“तुंबाडचे खोत” — ‘जगबुडी’ काठी नांदलेल्या एका घराण्याच्या चार पिढ्यांची द्विखंडात्मक दीर्घ कादंबरी

Share...

कधी कधी एखादं पुस्तक असं आपल्या हाती लागतं, की सुरुवात करताना आपण फक्त पानं वाचतो, पण थोड्याच वेळात त्या पानांत आपण हरवून जातो. डोळ्यांसमोर चित्रं उभी राहतात, कानात संवाद ऐकू येतात, आणि नकळत आपण त्या कथेमध्ये एक पात्र होऊन जातो. श्री. ना. पेंडसे यांच्या “तुंबाडचे खोत” ह्या दोन खंडांत विभागलेल्या महाकाव्यासारख्या कादंबरीचं अनुभवणं असंच काहीसं आहे.

या भिडस्त कादंबरीचा आवाकाच भन्नाट आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश अमदानीच्या पहिल्या दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीच्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी. म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड आहे.

तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासून विद्यमान वंशापर्यंत या इतिहासाची व्याप्ती आहे. या चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पिढ्यानपिढ्या असंख्य स्वभावविशेष अशी व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणाऱ्या अनेक घटना भेटत राहतात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसरीसारखी नाही. एक घटना दुसरीसारखी नाही.एकुण एक सर्वच व्यक्ती व घटना स्वत्वविशेष अशा आणि काळ स्वभावाने वर्षांचा असला तरी स्थळ मात्र एकच : तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. तुंबाडच्या खोतांच्या कुलवृत्तांताची ही बखर एखाद्या रम्याद्भुत आणि उग्र भीषण कहाणीसारखी आहे.

ही गोष्ट आहे कोकणातल्या तुंबाड गावाची. समुद्राच्या लाटांइतकी गूढ, जगबुडी नदीसारखी खोल, आणि सह्याद्रीच्या डोंगराएवढी उंच. तुंबाडचे खोत – गावचे प्रमुख, सत्ताधीश, पण माणूस म्हणून अनेकदा विचलित. या घराण्याची गोष्ट सुरु होते १७२५ साली, एका मोरया नावाच्या मूळ पुरुषापासून. गाव वसवतो, सत्ता मिळवतो, पण संपत्तीच्या हव्यासात आणि अघोरी साधूंशी संगत करत करत शेवटी स्वतःचं पतन करतो.

खोतांचा वाडा: एकेकाळी वैभवाचं प्रतीक असलेला, गावाच्या मानाचा ठिकाण, पण आता गावकऱ्यांच्या कुजबुजीचा विषय बनलेला. खोताचं पतन हे केवळ एका व्यक्तीचं नसून, एका घराण्याच्या साखळीचं आहे.

मग हळूहळू वंशाची दुसरी, तिसरी आणि चौथी पिढी उभी राहते. गणेश शास्त्री तुंबाडकर, हा त्या अंधाऱ्या इतिहासातून नवा उजेड घेऊन उगम पावणारा एक तेजस्वी चेहरा. नम्र, उदार, संपत्तीपेक्षा माणुसकीला जपणारा. गावात नव्याने मान मिळवणारा. पण वंशाचा दोष त्याच्या मुलांपर्यंत झिरपत जातो. बजापा, त्याचा मुलगा, हा नरसू खोतांच्या मदतीने भरारी घेतो, उद्योगात यश मिळवतो, आणि मग त्याच्या आयुष्यात येते – जुलाली देवी.

जुलाली ही साधी स्त्री नव्हे ती आहे मोह, सत्ता आणि नशिबाचे कोडे घेऊन आलेली एक अद्भुत व्यक्तिरेखा. बजापा तिच्याशी लग्न करतो, पण नंतर काही काळात, दोन्ही पत्नींसह जीवन जगत असताना, तो आजाराने ग्रासला जातो आणि संपतो. त्याच्या मृत्यूनंतर जुलालीचा एकाकीपणा ती सहन करू शकत नाही आणि शेवटी आत्महत्या करते. चार पिढ्यांचा इतिहास पाहिलेला वाडा शेवटी भस्मसात होतो. एका वंशाचा शेवट, पण कदाचित कुठेतरी उगमाची शक्यता.

या कहाणीत नरसू खोतचं पात्र मनात खोलवर घर करतं. तो विचारवंत आहे, गांधी-टिळक यांच्यात भरकटतो, पण निर्णय मात्र झणझणीत घेतो. त्याचा अंतही वाचकाच्या मनाला थेट भिडतो. दादा खोत अघोरी प्रयोगात रमलेला, तर बजाबा – वाघावर झेप घेणारा! एकेका व्यक्तिरेखेत लेखकाने पूर्ण आयुष्याचं गूढ ओतलेलं आहे.

लेखकाच्या लेखणीची कमाल अशी की, प्रत्येक पात्राला तो जीवन देतो. त्या वाड्यात, त्या गावात, त्या पिढ्यांमध्ये आपण वावरतो. प्रत्येक संवाद, प्रत्येक घटना, प्रत्येक वळण – हे सगळं इतकं जीवंत आणि अस्सल वाटतं की ही कथा काल्पनिक आहे हे मान्य करावंसं वाटत नाही!

पेंडसेंनी तब्बल २५ वर्ष ही कादंबरी लिहिली. जगबुडी नदीतून प्रवास केला, तुंबाडला भेटी दिल्या, आणि मग निर्माण केली एक महाकथा ज्यात राजकीय घडामोडी आहेत, कोकणची लोकसंस्कृती आहे, श्रद्धा-अंधश्रद्धा आहेत, नीती-अनीतीच्या लाटा आहेत.

पुस्तकाच्या भाषा शैली ही कोकणी कोकणातील बारकावे, भाषेवरचा कोकणी प्रभाव, थोडं शिवराळपण,  प्रांजळ संवाद, प्रेमकथा या सगळ्याचं मिश्रण अगदी रसरशीत वाटतं. तुंबाडचे खोत अधिक मातीशी जोडलेले, अधिक माणसाळलेले, आणि म्हणूनच अधिक भावस्पर्शी वाटतात.

तुंबाडचे खोत ही केवळ वाचण्याची कादंबरी नाही, ती अनुभवण्याची आहे. ती कथा नाही, ती “शतकीय” अनुभूती आहे. ती फक्त घराण्याची गोष्ट नाही, ती माणसाच्या स्वभावाची उजळणी आहे.

श्री. ना. पेंडसे यांच्या प्रतिभेला शतशः प्रणाम. ही कादंबरी प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी वाचावीच, आणि पुन्हा पुन्हा आठवावी कारण तुंबाड हे गाव उरात जपून ठेवावं असं आहे…


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *