भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची साक्षीदार असणारी विस्तीर्ण आणि पवित्र नदी म्हणजे गंगा! थोडासा वळसा घेऊन उत्तरेकडे वाहणाऱ्या या नदीच्या पश्चिम तटावर एक अगदी प्राचीन नगरी वसली आहे. इथल्या लोकसंस्कृतीचा जणू आत्माच असणारी ही नगरी म्हणजे काशी नगरी होय. आपल्या प्राचीन, प्रदीर्घ आणि बहुपेडी इतिहासामध्ये विविध काळांत विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या नगरीच्या काशी या नावाचा अर्थ चमकदार, दीप्तीमान किंवा प्रकाशमान असा होतो. संस्कृतमधील काश्- चमकणे या धातूपासून हे नाव तयार झाले आहे. पवित्र गंगेच्या विस्तीर्ण पात्रांमधून खळखळत वाहणाऱ्या जळावर आणि तीरावरील घाटांवर जेव्हा सकाळचे पहिले सोनेरी सूर्यकिरण पडत असतील तेव्हा त्या स्वर्गीय प्रकाशाने झळाळून उठणाऱ्या या नगरीसाठी हे नाव खरोखरच सार्थ ठरत असेल. तिच्या काशी किंवा काशिका या नावाबद्दल अन्य देखील काही व्युत्पत्ती सांगितल्या जातात. पुरूरव्याचा सातवा वंशज आणि स्मृतीकार मनूचा नातू काश राजा याने या नगरीवर राज्य केले किंवा त्यानेच ही नगरी वसवली आणि त्यावरून तिचे हे नाव पडले असे काहीजण मानतात. तर काहीजण यांचा संबंध इथल्या प्रदेशात, नदीच्या काठी आढळणाऱ्या, काशी हेच नाव असणाऱ्या उंच चंदेरी गवताशी जोडतात. त्याशिवाय, सध्याच्या काळात प्रचलित असणारे हिचे पर्यायी नाव म्हणजे वाराणसी (अपभ्रंशः बनारस). गेली कित्येक शतके ही नावे याच ज्या सहजतेने काशी किंवा वाराणसी आपल्या इतिहासाचे प्रचंड ओझे वाहते, तशी जगातील फार थोडी ठिकाणे असतील. ही नगरी आपल्या संस्कृतीच्या आत्म्याचे आणि शतकानुशतके आलेली विपरीत परिस्थिती, हल्ले सहन करूनही पुन्हापुन्हा उभी राहत आपल्या अपराजित वृत्तीचे दर्शन घडवते.
काशी हे केवळ एक प्राचीन स्थान नसून तिचे पावित्र्य आणि मांगल्य भारतीय समाजमनावर कोरले गेले आहे. अनेक साहित्यकृती आणि कलाकृतींच्या माध्यमातून काशीच्या प्राचीनतेची आणि पावित्र्याची ही शुद्ध प्रतिमा पिढ्यांपिढ्या वृद्धिंगत होत गेली.
‘मोक्ष मिळवून देत आत्म्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारी नगरी’ असे काशीचे वर्णन आपल्या धर्मग्रंथांनी वेळोवेळी केले आहे. त्यातूनच एकदातरी या नगरीला भेट देण्याची आणि शक्य झाल्यास इथे देह ठेवण्याची इच्छा श्रद्धाळू हिंदूंच्या मनात सदैव जागृत राहिली आहे.
एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश भारतीय विद्या आणि पुरातत्व अभ्यासक जेम्स प्रिंसेप काशीबद्दल लिहितो-
ब्रह्मदेवाची शंभर आयुष्ये इतक्या प्राचीन काळापसून ही नगरी (काशी) अस्तित्वात आहे. यातला प्रत्येक दिवस भूतलावरील ४३२ कोटी वर्षे इतका मोठा असतो. ही नगरी पृथ्वीपेक्षा उन्नत स्थानावर वसलेली असून महादेवाच्या (शिवाच्या) त्रिशूलावर ती स्थित आहे. ती कधीही भूकंपाने कंपित होत नाही. कधीकाळी सुवर्णनगरी असणारी ही नगरी, जसजशी मानवी मूल्ये ढासळत गेली तसतशी साध्या दगड आणि विटांची होत गेली.
काशीच्या या चैतन्यमय स्वरूपाने वेळोवेळी कित्येक प्रवासी, अनेक साधक, तत्वज्ञ यांना आकृष्ट करून घेतले, आणि दुर्दैवाने अनेक मूर्तीभंजकांना देखील – ज्यांनी वारंवार या नगरीचा विध्वंस केला, तिचे पवित्र्यदेखील भंग केले! जुन्या राजघाट पठाराच्या उत्तर भागात जेव्हा उत्खनन झाले, तेव्हा वाराणसी शहराचे जमिनीखाली गाडले गेलेले, ख्रिस्तपूर्व ८ ते इ.स. ७ व्या शतकातले कित्येक अवशेष मिळाले. जरी या नगरीचा इतिहास काहीसा विवादास्पद किंवा संदिग्ध असला तरी, तिची प्राचीनता मात्र निःसंदिग्ध आहे. पार प्राचीन भारताच्या धूसर इतिहासातून किंवा वैदिक किंवा प्रागैतिहासिक काळावरच्या गूढ धुक्याआड देखील या नगरीचे अस्तित्व जाणवत राहते.
जरी या नगरीवर भगवान शिवशंकरांचे आधिपत्य सर्वमान्य असले, तरी अनेक धार्मिक मते, आणि तात्विक मतप्रणालींना या नगरीत सन्मानाने आश्रय मिळाला होता. शैव मतासह, वैष्णव, शाक्त, बौद्ध, जैन, अशा अनेक परंपरांचा सुंदर मिलाफ होऊन त्या सर्वांचा उत्कर्ष झाला. या नगरीवर शैव मताचे वर्चस्व प्रस्थापित होण्यापूर्वी इथे वैष्णव मताचा प्रभाव अधिक होता असे पुराण वाङ्ग्य सांगते. त्यामुळे येथे भगवान शिव आणि विष्णू या दोन्ही देवतांची पूजा करणे अगत्याचे मानले जात असे. किंबहुना अजूनही विश्वेश्वराच्या मंदिरात मुख्य देवतेच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी, मुक्ती मंडपामध्ये भगवान विष्णूची पूजा आधी करण्याचा संकेत आहे.
पुस्तकाच्या माध्यमातून विश्वेश्वर किंवा विश्वनाथाच्या रुपातील शिवाचा अधिवास असणाऱ्या काशीचा इतिहास, तिची प्राचीनता आणि पावित्र्याचे दर्शन घडते. जो या शहरात आपला देह ठेवतो त्याला मोक्ष मिळेल असे वचन प्रत्यक्ष शिव देतो. हे पुस्तक या स्वयंभू ज्योतिर्लिंग विश्वेश्वराच्या इतिहासाचा सखोल शोध घेते. आपल्या भक्तांचे आश्रयस्थान असलेले हे विश्वेश्वर मंदिर हे नेहमीच धर्मांध मूर्तीभंजकांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. परंतु जेव्हा जेव्हा हे मंदिर उद्ध्वस्त करून त्याचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हे मंदिर पुन्हा उभे राहिले आणि भरभराटीला आले.
मंदिराच्या इतिहासातील या प्रलयंकारी घटनांचा लेखाजोखा ‘प्रतीक्षा शिवाची’ हे पुस्तक मांडते. जुलमी मुघल बादशाह औरंगजेबाने १६६९ मध्ये या मंदिरावर घातलेला घाव वर्मी बसला आहे. त्याने मंदिर फोडले आणि मंदिराच्या पश्चिमेकडील अर्धवट तुटलेल्या भिंतीवर घुमट उभे करून त्याला मशिदीचे रूप दिले. आज ज्याला ज्ञानवापी मशीद म्हणतात ती मशीद आणि त्याच्या आजूबाजूची आणि अठराव्या शतकात बांधल्या गेलेल्या नव्या विश्वनाथ मंदिराजवळची जागा यावरून नेहमीच वादंग माजलेला आहे. भूतकाळात या मुद्द्यावरून अनेक वेळा रक्तरंजित दंगली झाल्या आहेत. इंग्रजी सत्तेच्या काळातही या जमिनीच्या मालकी आणि ताब्याच्या मुद्द्यावरून अनेक वेळा ब्रिटिश न्यायालयांचे दरवाजे ठोठावले गेले आहेत, त्यासंबंधीचे खटले चालवले गेले आहेत. स्वातंत्र्यानंतरही हा पूर्ण परिसर मुक्त करावा अशी मनीषा हिंदूंच्या मनात कायमच वास करत आली आहे. २०२१ ला नव्याने दाखल करण्यात आलेल्या एका खटल्याने या फार काळापासून ठसठसणाऱ्या जखमेवरची खपली निघाली. भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण होऊ नये यासाठी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत वारंवार अपीले करूनही हे सर्वेक्षण झाले आणि जानेवारी २०२४ मध्ये या सर्वेक्षणाने या पूर्ण प्रकरणातील सत्य उजेडात आणले.
विक्रम संपतचे हे नवे पुस्तक या मंदिराचा बहुपेडी इतिहास, त्यात आलेली नाट्यमय वळणे, घडलेल्या गूढ घडामोडी, या जागेवरून झालेले कडाक्याचे वादविवाद या साऱ्या गोष्टी उलगडून दाखवते. कितीतरी काळ ज्ञानवापीमध्ये दडपून आणि लपवून ठेवलेल्या या गुपितांना या पुस्तकाच्या रूपाने वाचा फुटली आहे.
5 Comments
(प्रतीक्षा शिवाची) हे काशीच्या या महाकाव्यावर अधिकारवाणीने बोलणारे एक वस्तुनिष्ठ तथ्यांचा परामर्श घेणारे आणि तरीही भावनेने ओतप्रोत भरलेले आणि दाहक पुस्तक आहे.
डॉ. आनंद रंगनाथन, लेखक आणि शास्त्रज्ञ
ज्ञानवापीची कित्येक काळ दडपून ठेवलेली गुपिते अगदी निगुतीने प्रकाशझोतात आणली गेली असल्याने हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे.
ॲड. श्री हरि शंकर जैन
भारतातील धर्म निर्पेक्षतावाद आणि सांप्रदायिक सलोखा याचे आधुनिक युगाच्या संदर्भाने असणारे महत्त्व आणि काशी विश्वनाथ मंदिराची सखोल रुजलेली संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा समजून घेणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.
– श्रीमती अद्वैता कला, लेखिका, पटकथालेखिका, भाष्यकार
इथला बारीक सारीक तपशीलही पुराव्यानिशी मांडला आहे या विषयाशी संबंधित सर्व कागदपत्रांचे नीट संपादन केल्यामुळे या विषयाला पूर्ण न्याय मिळाला आहे.
– ॲड. श्री विष्णु शंकर जैन
सर्वसामान्य वाचकापासून आजवर झाकून ठेवलेली सगळी तथ्ये डॉ. संपत अतिशय उत्कंठावर्धक, सहज आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता, तरीही नेटकेपणाने आणि स्पष्टपणे प्रकाशात आणतात.
डॉ. H.R. मीरा, संशोधिका आणि लेखिका