बालसाहित्य प्रगल्भ व्हावे

Share...

मराठी बालसाहित्य लेखक, मराठी बालमासिकांचे संपादक आणि मराठी बालसाहित्याचे प्रकाशक प्रथमच राज्यस्तरावर एकत्र येत आहेत. या बालसाहित्य चर्चासत्राच्या अनुषंगाने बालसाहित्याच्या क्षेत्रात पुढील दिशादर्शन कसे असावे, याबाबत काही गोष्टींचा विचार होणे गरजेचे वाटते.

प्रत्येक पिढीतील पालकांना असे वाटत असते की आपली मुलं ही अजून जास्त हुशार, चौकस हवीत‌. हुशार म्हणजे पाठ्यपुस्तकी गुणवत्तेसोबत त्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत यश प्राप्त करावे. लौकिक, व्यावसायिक यशासोबत आणखीही काही प्राप्त करावे. तर काही पालक मुलांसाठी सतत केवळ चिंतातुर असतात . त्यांना काळजी असते की या मुलांचं भविष्यात कसं होईल? मात्र हे पालक चिंतातुर असण्याचे मुख्य कारण म्हणजे ते आज केवळ पाठ्यपुस्तकीय गुणवत्तेच्या मागे लागले आहेत. मुलांची कल्पनाशक्ती विकसित व्हावी यावर कोणाचा भर दिसत नाही. यश जोखण्याच्या फूटपट्ट्या गुणांवर आधारित असल्याने आजची मुलं ही पाठ्यपुस्तकीय गुणवत्तेत पुढे आहेत. परंतु, कल्पनाशक्तीचा विस्तार करण्यात फार कमी पडतात. त्यामुळेच, व्यक्तिमत्त्व विकासातही ही मुलं कमी पडतात. याला मुख्य कारण म्हणजे आपल्या घरात मुलांच्या हातात आता आपण गोष्टींची पुस्तकं मोठ्या प्रमाणावर देत नाही.

सुशिक्षित घरांतही अलीकडे लहानपणापासून मुलांना बालसाहित्य वाचनासाठी प्रोत्साहन दिले जात नाही. त्यामुळे, अशा घरातील मुलं एकलकोंडी, हेकेखोर किंवा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाची होण्याची भीती वाढते, असं आता शिक्षणतज्ज्ञ व मानसतज्ज्ञ म्हणू लागले आहेत.

आपल्याला भावी पिढी जर मानसिकदृष्ट्या निरोगी व कल्पक घडवायची असेल तर बालपणापासून मुलांच्या हातात (मोबाइलसोबत) सकस बालसाहित्यही देता आले पाहिजे. कारण मुलांचे भावविश्व हे बालसाहित्य वाचनातूनच लवकर समृद्ध होते.

गेल्या पिढीतील आजी-आजोबा ही लहान मुलांसाठी गाणी-गोष्टींची चालती-बोलती विद्यापीठे होती. ही माणसं पाठ्यपुस्तकी शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित अल्पशिक्षित असतील, परंतु मौखिक परंपरेने आलेले अनुभवसिद्ध शहाणपण त्यांच्या जवळ विपुल होते. आज मुलांच्या भरण-पोषणाच्या काळात आजी-आजोबा ही संस्कारक्षम परंपराच आपण गमावून बसलो आहोत. जिथे कुटुंबातीलच संवादच संपत चालला आहे, तिथे मौखिक परंपरेने लाभलेले संस्कारधन वृद्धिंगत करण्यात कुटुंब आणि शिक्षणव्यवस्थेला अपयश येते, यात नवल नाही.

आपल्या देशात मुलांच्या हातात तंत्रज्ञानयुक्त ‘स्मार्ट फोन’ आले आणि त्यांचे पुस्तकांशी असलेले नातेच जणू इतिहासजमा झाले. स्मार्टफोनमुळे आजच्या बालपिढीतील उत्सुकताच मरत चालली आहे. मुलांमधील उत्सुकता, कल्पनाशक्ती जतन करण्याचे काम बालसाहित्य करीत असते. आज पाश्चिमात्य देशांमधील बालसाहित्यात मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसतात. मुलांच्या हाती रंगीत चित्रांची बोलकी पुस्तके, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशित केलेली बालगोष्टींची पुस्तके मोठ्या प्रमाणावर दिसतात. पाश्चिमात्य देशात चाइल्ड लायब्ररींना खूपच प्राधान्य असते. आपल्याकडील बालसाहित्याची पुस्तके अजूनही आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारलेली दिसत नाहीत. मुळात बालसाहित्याचा आता गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे. मराठीतील बालसाहित्य नाही म्हटलं तरी अजूनही इतर प्रगत जगातील बालसाहित्याचा विचार केला असता फार मागे आहे. मराठी बालसाहित्याची मोजून आठ-दहा मासिके प्रकाशित होतात. त्यांचा १२ कोटींच्या महाराष्ट्रात एक लाखाच्या घरातसुद्धा खप नाही, ही कोणालाच चिंतेची बाब वाटत नाही.

मराठीतील अनेक साहित्यिक आपल्या आयुष्याच्या म्हणजे आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून मुलांना हेच बालसाहित्य आहे असे भासवण्याचे काम करीत आहेत. काही अपवाद वगळता मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारे बालसाहित्य मराठीत सध्या फारच कमी लिहिले जाते, यासाठी कदाचित आजच्या आपल्या लेखकांची विविधांगी अनुभवांची ओंजळच फारशी समृद्ध नाही, असे वाटते. शिवाय, त्या त्या काळाची गरज ओळखून नव्या पद्धतीचे बालसाहित्य लिहिले गेले पाहिजे, याची जाणही नाही, असे दिसते.

मराठी बालसाहित्याला समृद्ध परंपरा आहे. काही पिढ्यांचे भरणपोषण या बालसाहित्याने केले आहे. परंतु आजच्या तंत्रस्नेही बालपिढीच्या भावविश्वाला बालसाहित्य वाचनाकडे कसे वळविता येईल, हा आज महत्त्वाचा प्रश्न आहे. या तंत्रस्नेही मुलांना वाचनाकडे वळविणे ही बाल साहित्यक्षेत्रात लेखन करणाऱ्या साहित्यिकांवर मोठी जबाबदारी आहे. मुळात आज तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर बालसाहित्य लेखकांनी करून घेतला पाहिजे. बदलते तंत्रज्ञान ही या क्षेत्रासाठी संधी आहे. मुलांसाठी ई-बुक स्वरूपात बालसाहित्य लिहिण्याची मानसिक तयारी लेखकांनी करून घ्यावी. शाळांमधून अवांतर वाचनतासिका हा टाइमटेबलचा भाग असावा. विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून वयोगटांचा विचार करून वर्गनिहाय पूरक वाचनमाला असल्या पाहिजेत. प्रत्येक शाळेत वाचनालय आणि पूर्णवेळ ग्रंथपाल असावा. अशा काही सुधारणांसह बालसाहित्य लेखकांनीसुद्धा आपापल्या परिसरातील एक एक शाळा वाचनसंस्काराच्या दृष्टीने दत्तक घेतली तर निश्चितच भविष्यात चांगले वाचक तयार होतील. मात्र आज बालवाचक घडविण्यासाठी विशेष प्रयत्न होत नाहीत.

सोव्हिएत रशियाची उभारणी होताना त्या देशाने सर्वप्रथम बालसाहित्यावर आपले लक्ष केंद्रित केले आणि आपल्या देशासाठी देशप्रेमाने तसेच मानवतावादी विचारांचे बालसाहित्य त्यांनी अतिशय माफक किमतीत मोठ्या प्रमाणावर देशभर व जगभर विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले होते. भारतात ‘नॅशनल बुक ट्रस्ट’द्वारे असे प्रयत्न सुरवातीला होताना दिसले. परंतु, नोकरशहांनी ही पुस्तके गावखेड्यापर्यंत पोहोचू दिलीच नाहीत. (सध्या तर ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ला मराठी विभागात पूर्णवेळ संचालकही नाही. मराठी बालपुस्तकांच्या किमतीतही नॅशनल बुक ट्रस्टने मोठी वाढ केली आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही.)

बालसाहित्याच्या वाढीसाठी महाराष्ट्रात आज स्वतंत्र बाल विद्यापीठाची नितांत गरज आहे. मुंबईत सर्व सोयींनी युक्त असे जे बालभवन आहे, तसेच बालभवन महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाले पाहिजे. या बालभवनामुळे विद्यार्थ्यांना साहित्य, कला, वाचन, संगीत, नृत्य, चित्र,नाटक, गायन, अभिनय अशा विविध कलांची जोपासना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासारखे शिक्षण विभागाने आणि विविध साहित्य संस्थांनी दरवर्षी तालुका-जिल्हास्तरीय विद्यार्थी बालसाहित्य संमेलनांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करावे, यामुळे विद्यार्थीदशेतच वाचन, लेखन आणि वाणीचा संस्कार मुलांवर होईल. शाळा-शाळांमधून शिक्षक आणि पालकांनीच दरवर्षी एकातरी बालमासिकाची वर्गणी आपल्या विद्यार्थी, पाल्यांच्या नावाने भरणे अत्यावश्यक समजावे.

चॉकलेटच्या किमतीत मुलांसाठी पुस्तके पाठ्यपुस्तक मंडळ आणि नॅशनल बुक ट्रस्टला प्रकाशित करता आली पाहिजे. (चॉकलेटच्या किमती काही आता कमी नाहीत) मुळात वास्तव जगातील विदारकता बदलविण्यासाठी मुलांना स्वप्न पाहण्याची ताकद बालसाहित्यातून देता आली पाहिजे. यासाठी आजच्या काही बालिश बालसाहित्याला प्रगल्भतेचे वरदान लाभण्याचीही नितांत गरज आहे.

– नरेंद्र लांजेवार

(लेखक ग्रंथपाल आहेत)

 22 Dec 2018, 5:27 am


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *