laurie-baker

लॉरी बेकर हा ‘ब्रिटिश’ मनुष्य ‘भारतीयाहून भारतीय’ होता !’

Share...

‘अल्पखर्ची व पर्यावरणसंवादी (लो कॉस्ट अॅन्ड इको-फ्रेन्डली) घर’, या संकल्पनेचे प्रवर्तक मानले जाणारे वास्तुविशारद लॉरी बेकर यांचे 1 एप्रिल 2007 रोजी वयाच्या 90व्या वर्षी तिरुवनंतपुरम येथे निधन झाले. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. वसंतराव गोवारीकर व सुधाताई गोवारीकर यांचा लॉरी बेकर यांच्याशी परिचय झाला, स्नेह जडला. त्याच काळात गोवारीकरांचे तिरुवनंतपुरम येथील घरही लॉरी बेकर यांनी बांधून दिले. म्हणून सुधाताई व वसंतराव गोबारीकरांना आम्ही विनंती केली लॉरी बेकर यांच्याविषयीच्या आठवणी सांगण्याची; त्यातून तयार झालेला हा लेख, खास ‘साधना’च्या वाचकांसाठी…

1983-85 या काळात तिरुवनंतपुरम येथील डॉ. के. एन. राज या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज’मध्ये आम्ही काही कामाकरिता गेलो. तिथल्या सर्व इमारती लॉरी बेकर यांनी बांधल्या आहेत हे आम्हांला तिथं कळलं. त्या प्रत्येक इमारतीची रचना कलात्मक तर होतीच, पण प्रत्येक इमारत दुसरीपेक्षा वेगळी होती. कलात्मकता व उपयुक्तता यांचा सुंदर मिलाप त्या संस्थेतील कार्यालये, ग्रंथालये, प्रयोगशाळा यांच्या इमारतीत पाहायला मिळत होता. तिथे भरपूर जागा उपलब्ध असल्याने दुमजली घरं फारशी नव्हती आणि फ्लॅट संस्कृती तर अजिबात नव्हती. बैठ्या इमारती होत्या आणि घरं म्हणजे छोटे-मोठे बंगलेच होते. ऐसपैस आणि प्रशस्त! आणि ते सर्व लॉरी बेकरनी अत्यंत कमी खर्चात बांधून दिले होते. 

जवळपास 18-19 वर्षे केरळात राहत असल्याने आमच्या तीन मुलीही तिथेच लहानाच्या मोठ्या झाल्या आणि त्यांचं शिक्षणही तिथेच झालं. त्यामुळे 1982च्या दरम्यान आम्हांला असं वाटू लागलं की, इथेच आपलं स्वतःचं असं एक घर असावं. त्या काळात लॉरी बेकर अधूनमधून भेटत होते आणि आमची त्यांच्याशी छानशी ओळखही झाली होती. त्यामुळे घर बांधायचं ठरवल्यावर आम्ही त्याची जबाबदारी लॉरी बेकर यांच्यावरच सोपवली. हे आम्ही ठरविण्यास, ‘बेकर कितीही कमी रकमेत घर बांधून देऊ शकतात’, अशी त्यांची ख्याती कारणीभूत होती. उदा. नंबुद्रीपाद नावाच्या एका माणसाला सहा-सात जणांसाठीचं घर बांधून हवं होतं. पैसे किती आहेत असं बेकरनी विचारल्यावर ‘दह हजार’ असं उत्तर त्यांना मिळालं. तेवढ्या रकमेत बेकरनी घर बांधून दिलं! दुसरा एक जण सांगत होता की, त्याला दोन बेडरूमचं घर हवं होतं आणि त्याच्याकडे केवळ 2,450 रुपये होते, त्यालाही तेवढ्याच रकमेत घर बांधून मिळालं!

आम्ही घर बांधायचा प्रस्ताव बेकर यांच्यासमोर ठेवल्यावर, त्यासाठी किती खर्च येईल, फी किती घेतील, या बाबत ते आमच्याशी काहीच बोलले नाहीत.

आम्ही डोंगरउतारावरील अर्धा एकर जमीन 25 हजार रुपयांना खरेदी केली होती. ती जागा बेकर यांना दाखवल्यावर त्यांनी दोन स्तरांवर काम सुरू केलं. एका बाजूला ते आमच्या घरी येऊ लागले. आम्हा दोघांशी, आमच्या मुलीशी गप्पा मारू लागले. त्या गप्पा अनौपचारिक असत आणि त्यात विनोदही भरपूर असे. आमच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, आमचे छंद, आमच्या झोपण्याच्य-उठण्याच्या सवयी, आमच्या कामाचे प्रकार, या बाबत ते बारीकसारीक माहिती आमच्याकडून गप्पा मारताना काढून घेत. दुसऱ्या बाजूला, घर बांधायचे होते त्या जागेवर ते जाऊन येत असत. ऊन व सावली कोणत्या वेळी व किती पडते, वारे कोणत्या दिशेने व कसे वाहतात, सभोवतालची झाडी, सूर्योदय-सूर्यास्त यांचे निरीक्षण ते करीत असत आणि विचार करीत असत. त्यांचा हा निवांतपणा पाहून असे वाटे की, या माणसाला आयुष्यात एवढे एकच घर बांधायचे आहे की काय? पण या माणसाने दोन हजारांहून अधिक घरे बांधली. आम्हांला असेही वाटे की, हा माणूस आपल्या घराची जरा जास्तच काळजी घेतोय, पण प्रत्येकाला असंच वाटायचं – आपण लॉरींच्या दृष्टीने कुणीतरी ‘खास’ आहोत!

शेवटी घर बांधायला सुरुवात झाली. बेकर यांचे मुख्य वैशिष्ट्य हे होतं की, ते स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचाच वापर करीत. दगड, माती, विटा, लाकूड, बांबू, नारळाच्या झावळ्या, कौलं, सुरखी हे साहित्य केरळमध्ये विपुल प्रमाणात मिळत असे. काच व सिमेंट यांचा वापर ते फार कमी व अत्यावश्यक असेल तेव्हाच करीत. हे असं करण्यामागे त्यांचा उद्देश केवळ पैसे वाचवणं इतकाच नव्हता, तर पर्यावरणाचं कमीतकमी नुकसान व्हावं व नैसर्गिक घटकांचा जास्तीतजास्त उपयोग करून घ्यावा, हाही उद्देश असे. ‘तुम्ही बांधता ती घरं इतर घरांइतकी सुरक्षित टिकाऊ असतात का’, असा प्रश्न कोणी विचारला तर त्यांचं ठरलेलं उत्तर असे, ‘‘मला एक ‘क्रोबार’ द्या – सिमेंट काँक्रिटच्या घराचे दरवाजे व खिडक्या मी एका मिनिटात उखडून दाखवतो!’’ घरं केवळ अल्पखर्ची व उपयुक्त नसावीत तर ती सुंदरही असावीत, या बाबत बेकर कमालीचे आग्रही होते. आमच्या घराचं बांधकाम सुरू असताना शनिवार-रविवार ते पाहायला आम्ही जात असू. तेव्हा लॉरी बेकर स्वतः कुठेतरी वर चढलेले व गवंडीकाम करताना दिसत. विटा रचणे, पाणी मारणे, लाकूड कापणे ही कामे ते अतिशय सहजतेने करीत असत. त्यांनी आम्हांला कधीही पैशाबद्दल विचारले नाही, पैसे मागितले नाहीत. अनेकदा आमच्याही ते लक्षात येत नसे, कारण ते तसं जाणवू देत नसत. ते ज्या पद्धतीने काम करीत असत, ते पाहून हा माणूस इंजिनिअर आहे, आर्किटेक्ट आहे. कलाकार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, की कामगार आहे. तेच कळत नसे. फीबाबत विषय काढला तर म्हणत, ‘‘इतर मजूर घेतात तेवढीच मजुरी मलाही द्या!’’ एका बाईने तर आम्हांला सांगितलंही, ‘‘बेकर म्हणतात. आमच्या पूर्वजांनी तुम्हांला भरपूर लुटलं.आहे, त्याची ही अंशतः भरपाई आहे.’’

बेकर यांना कामासाठी गवंडी फार मिळत नसत. कारण त्या गवंड्यांना बेकरच्या हाताखाली काम करताना नव्याने प्रशिक्षण घ्यावं लागे. अनेक जण काम मधूनच सोडून जात. अनेक जण त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन, दुसरं काम करायला जात. पण बेकर पुन्हा नवीन गवंड्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत असत. काही जणांना मात्र त्यांच्याकडे काम करायला आवडे, कारण भरपूर शिकायला मिळे. एका अर्थाने लॉरी बेकर म्हणजे एक ‘माणूस संस्था’ होती. (वन मॅन इन्स्टिट्यूशन.) ‘मॅनेजमेंट’ तंत्रामध्ये या माणसाला कुठे बसवायचं, हे ठरविणं एक मोठंच कोड होतं! पण एक गोष्ट आम्ही अनुभवली. या वन मॅन इन्स्टिट्यूशननं ‘क्रिएटिव्हिटी’चं अत्युच्च शिखर गाठलं होतं. आम्ही इतक्या ठिकाणी फिरलो, पण लॉरी बेकरइतका ‘क्रिएटिव्ह’ माणूस फक्त लॉरी बेकरमध्येच बघितला!

सात-आठ महिन्यानंतर बेकर यांनी आमचं जे घर बांधलं, ते अर्धा एकर जमिनीवरील 300 चौरस मीटर जागेवर होतं. प्रत्येक खोलीतून घराच्या बाहेर पडता येईल, अशी व्यवस्था त्यात केली होती. घराच्या आतच मध्यभागी छोटसं तळं बांधलं होतं. घर बैठं होतं, पण उंची पुष्कळ होती. ओटा किचनच्या मध्यभागी होता. त्याच्या सर्व बाजूंनी स्वयंपाक करता येईल, अशी सोय केली होती. धूर निघून जाण्यासाठी छतावरच तशी व्यवस्था केली होती. एक मोठी खिडकी होती. तिला काच किंवा गज नव्हते. तिच्यातून बाहेरचा उघडा-बोडका डोंगर दिसत असे. नवीन माणसाला ती खिडकी वाटत नसे तर मोठ्ठं ‘पेंटिग्ज’ आहे, असं भासत असे. दिवसभर सर्व खोल्यांत खेळती हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असे. घराच्या वेगवेगळ्या भागांत बसण्यासाठी उंच-सखल जागा तयार केल्या होत्या. प्रवेश दरवाजा तर बेकर यांनी स्वतःच कोरीव काम करून केला होता. त्या इतक्या प्रशस्त घराला त्या वेळी केवळ दीड लाख रुपये खर्च आला. नंतर ‘इनसाइड-आउटसाइड’ या इंग्रजी मासिकात (जुलै- ऑगस्ट 1985) बेकर यांनी आमच्या घरावर छायाचित्रासह लेख लिहिला होता. ‘गोवारीकरांचं घर माझ्या अत्यंत आवडत्या घरांपैकी एक असल्याचं’ त्यांनी त्या लेखात म्हटलं होतं.

पुढे काही दिवसांसाठी आम्ही अमेरिकेला गेलो, तिथे आम्हांला चार बेडरूमचं मोठ घर मिळालं होतं. समोर अंगण, पाठीमागे मोठा बगिचा वगैरे वगैरे. पण आम्हांला बेकर यांनी तिरुवनंतपुरम येथे बांधून दिलेल्या घराची इतकी सवय झाली होती की, अमेरिकेतील त्या घरात आम्हांला अवघडल्यासारखं वाटत असे! लॉरी बेकर या व्यक्तीमध्ये आणि त्यांच्या कलाकृतीमध्ये आमची केवढी भावनिक गुंतवणूक होती, याचं हे उदाहरण होतं!

बेकर यांनी हजारो घरं बांधली, पण प्रत्येक घराचा पॅटर्न वेगळा होता. त्यांनी बांधलेलं घर छोटं असो व मोठं, शेतकऱ्याचं असो वा नोकरदाराचं, ते सुंदरच दिसत असे. सहज आठवतंय, बेकरनी ‘गार्बेज’वर एक पुस्तक लिहिलं आहे – स्वतःच्या सुंदर अक्षरात आणि त्यातील चित्रंही त्यांनीच काढली आहेत. माणसाची सर्जनशीलता किती अंगांनी उफाळून येऊ शकते याचं ते मूर्तिमंत प्रात्यक्षिक होतं!

1917 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेला हा माणूस अपघाताने ब्रिटिश, पण प्रत्यक्षात खराखुरा भारतीय होता. 1937 मध्ये ते आर्किटेक्ट झाले. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मिशनरी म्हणून भारतात आले. महात्मा गांधींच्या विचारांनी भारावून गेले. ‘तुम्ही जे काम करता त्याचा समाजाच्या सर्वांत खालच्या स्तरातील माणसाला काय उपयोग होतो, ते पहा’, हा गांधींचा संदेश त्यांनी अक्षरशः अमलात आणला आणि सर्वांत खालच्या स्तरातील माणसालाही परवडू शकेल असे सुंदर घर बांधता येतं, हे त्यांनी स्वतःच्या अनेक कृतींतून दाखवून दिलं.

भारतात आल्यानंतर त्यांनी पहिली पंधरा वर्षे हिमालयात घालवली. केरळमधील मुलीशी लग्न केलं. तीन अनाथ भारतीय मुलं दत्तक घेतली. त्यांना स्वतःला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलाचा जन्म लोकमान्यांच्या आयुष्यातील कुठल्यातरी घटनेच्या दिवशी झाला, म्हणून त्याचं नाव ‘टिळक’ ठेवलं गेलं. एका मुलीचं नाव ‘विद्या’ आहे आणि त्यांच्या घराचं नाव आहे ‘हॅम्लेट’. (हॅम्लेट म्हणजे चिमुकलं खेडे – म्हणजे बेकर यांचे घर.) जमिनीच्या चढउताराभोवती, अध्येमध्ये येणाऱ्या वृक्षांभोवती, छोट्यामोठ्या उंचवट्याभोवती लॉरी बेकरनी आपलं सुंदरसं घर बांधलं होतं. निसर्गाच्या कुठल्याही अस्तित्वाची त्यांनी कधी हिंसा केली नाही. स्वतःला गांधीवादी म्हणवण्याचा त्यांना अधिकार होता – ज्याचा त्यांनी कधी उच्चारही केला नाही!

माणसाचं आंतरिक व्यक्तिमत्त्व कसं ओळखायचं? ‘तो विचार कसा करतो’ यावरून! ज्या देशात तो राहतो, तिथंच किती व कसा समरस होतो यावरून! हे निकष लावले तर लॉरी बेकर हा ‘ब्रिटिश’ मनुष्य ‘भारतीयाहून भारतीय’ होता. भारतीयाला नसेल एवढा त्याला इथल्या सामान्य माणसाबद्दल कळवळा होता. ‘कसं जगावं’ यावर त्यांनी कधी पुस्तक-बिस्तक, नाही लिहिलं: पण ज्या जिव्हाळ्याने ते या देशात जगले. त्याच्या आमच्या मनातील स्मृती विसरणं फार कठीण आहे!

https://weeklysadhana.in/view_article/article-on-laurie-baker-by-vasant-and-sudha-gowarikar


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *