Description
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या दिवंगत महनीय व्यक्तींचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे अशा “महाराष्ट्रातील शिल्पकार” चरित्रग्रंथमालेतील “लोकशाहीर पठ्ठे बापूराव” हा सतरावा ग्रंथ आहे.
“पठ्ठे बापूराव” यांचं चरित्र लिहिणं तितकसं सोपं नव्हतं. पठ्ठे बापूराव यांचं सलग चरित्र अद्यापही लिहिलं गेलेलं नाही. चरित्रलेखनासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री सहजासहजी उपलब्ध होणं शक्य नाही. महत्प्रयासानं ही साधनसामग्री जमा करावी लागणार होती. ही साधनसामग्री आपण किती कष्टाने व नेटाने मिळविली याची माहिती स्वतः लेखकाने आपल्या मनोगतात सांगितलेली आहे. या चरित्रग्रंथाच्या लेखनासाठी प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी घेतलेले कष्ट खरोखरच वाखाणण्यासारखे आहेत.
प्रा. चंद्रकुमार नलगे यांना पठ्ठे बापूरावांविषयी आत्यंतिक जिव्हाळा व प्रेम आहे. चरित्र लेखनासाठी त्यांनी कथनात्मक पद्धतीचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे हा चरित्रग्रंथ वाचनीय, रसाळ झाला आहे.
“महाराष्ट्रात एकीकडे राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक गाजत होते. दुसरीकडे राजमान्य बालगंधर्व सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. नाट्यक्षेत्रात राम गणेश गडकरी आपल्या नाटकांनी
मराठी रंगभूमीला अलौकिक लौकिक मिळवून देत होते. त्याच काळात तमाशा लोककलेचा राजा लोकशाहीर शीघ्रकवी पठ्ठे बापूराव मराठी मनावर अधिराज्य गाजवत होते. ” असे प्रस्तुत ग्रंथाच्या लेखकाने
या ग्रंथात सार्थ शब्दात नमूद केले आहे. राम गणेश गडकरी तसेच बालगंधर्व या कला क्षेत्रातील दोन महनीय व्यक्तींवर भरभरून लिहिले गेलेले आहे. अर्थात तेवढं वाड्मयीन कर्तृत्व या दोनही कलावंतांचं
होतं, यात वाद नाही. पण तसं पठ्ठे बापूरावांच्या बाबतीत का घडलेलं नाही, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरात विदारक सत्यं दडलेली आहेत.
एकदा लिहिलेली लावणी पुन्हा लिहायची नाही; लावणी लिहिण्यासाठी एकदा कागदावर लेखणी टेकविली की ती लिहून झाल्याशिवाय कागदावरची लेखणी उचलायची नाही; शिळ्या पैश्याचं तोंड बघायचं नाही, असा पठ्ठे बापूराव यांचा पण होता; असं बापूरावांच्या संबंधात बोललं जातं. या चरित्रग्रंथातही तसा निर्देश आलेला आहे.
कलानिर्मिती ही उर्मी व वृत्ती यांच्याशी निगडीत असते. त्यामुळे एकटाकी लावणी लिहिणे अथवा लावणी लिहून झाल्यानंतर तिच्यात दुरुस्ती अथवा फेरबदल न करणे आपण समजू शकतो. पण शिळ्या पैशाचं तोंड बघायचं नाही, ही गुर्मी कलावंत कितीही मोठा असला तरी असू नये. नसता काय होतं याचं प्रत्यक्ष उदाहरण स्वतःच पठ्ठे बापूराव आहेत. पठ्ठे बापूराव यांना आपल्या आयुष्यातले अखेरचे दिवस केवळ हालअपेष्टातच नाही तर ताई परिंचेकर या मजूर स्त्रीच्या घासातल्या अर्ध्या घासावर व्यतीत करावे लागले.
‘काळ कोणताही असो, त्या काळात जन्मलेला कलावंत कितीही मोठा असो, रसिकांनी त्याला जे दिलेलं असतं ते उधळण्यासाठी दिलेलं नसतं.पण याचं भान न ठेवता ते कलावंतानं उधळून दिलं व त्यामुळे तो ‘उघडा’ पडला तर त्याचं फारसं दुःख त्याच्या रसिकांनी मानू नये. पुढच्याला ठेच लागली तर निदान मागचा तरी शहाणा होईल!
रा रं बोराडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कती मंडळ
दिनांक: १८ ऑगस्ट २००३
Reviews
There are no reviews yet.