आपला भाषिक दर्जा घसरू लागला आहे, कारण आपल्या जगण्यातील वैचारिक दर्जा घसरू लागला आहे, हे आधी मान्य करायला हवे.. माधुरी पुरंदरे
हल्ली कोणीही कोणास अशुद्ध भाषेसाठी दोष देणे हे ब्राह्मणी मानले जाते. भाषा ही जात, आर्थिक स्तर, सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा अनेक घटकांवर आधारित असते हे मान्य. परंतु तरीही भाषेचे, लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण असतेच असते..
माधुरी पुरंदरे कमी बोलतात. शब्द, स्वर आणि नाद या तिघांचा उत्तम आस्वाद घेण्याची क्षमता असूनही त्या कमी बोलतात. मराठीच्या बरोबरीने फ्रेंचदेखील त्यांची मातृभाषा आहे किंवा काय, असे वाटावे इतके त्यांचे फ्रेंचवर प्रभुत्व आहे. तरीही त्या कमी बोलतात. त्या साहित्य, कला क्षेत्राशी संबंधित आणि पुण्यात त्यांचे वास्तव्य. म्हणजे तर मौलिक सल्ले आदी देण्याचा अधिकार त्यांना जन्मत:च प्राप्त होतो. तरीही त्या फार बोलत नाहीत. ‘माननीय’, ‘ज्येष्ठ’, ‘दिग्गज’ वगैरे होण्याची संधी त्यांच्या आयुष्यात तशी लवकरच चालून आली. तरीही त्यांना बोलावे असे वाटत नाही. त्यांनी चंद्रकांत काळे यांच्यासमवेत केलेले मराठी काव्यरंग उलगडून दाखवणारे विविध प्रयोग हे आजच दंतकथेच्या पातळीवर गेले आहेत. त्यांच्या वाचू आनंदे मालिकेने मराठी वाङ्मयविश्वातील एक मोठी त्रुटी भरून काढली गेली आहे आणि लिहावे नेटकेने अनेकांना आधार दिला आहे. तरीही त्यांचे फारसे न बोलणे काही संपत नाही. परंतु म्हणून त्या जेव्हा बोलतात तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. मुंबईत जाहीर, पण कमी जणांच्या मेळाव्यात बोलताना माधुरी पुरंदरे यांनी आजच्या मराठीच्या भयानक अवस्थेवर बोट ठेवले.
त्यांच्या मते बनवणे या क्रियापदाने मराठी भाषाजगतात घातलेला धुमाकूळ हा क्लेशकारक आहे. खरेच आहे ते. हल्ली मराठी माणूस काहीही बनवतो. तो स्वयंपाक करत नाही, तर जेवण बनवतो आणि सिनेमा आदी तयार न करता तेही तो बनवतो, असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. सरकार बनवले, कायदा बनवणार ही उदाहरणे त्यांनी दिली नसावीत. वास्तविक मराठीत बनवणे हे बनवाबनवीच्या उद्योगाशी जवळ जाणारे आहे. माधुरी पुरंदरे म्हणाल्या त्याप्रमाणे ते हिंदीचे मराठीकरण. म्हणजे हिंदीत काहीही बनाना म्हणून मराठीत काहीही बनवणे. परंतु ते इतकेच नाही. बनवणे या क्रियापदाने मराठी भाषकांना चांगलेच बनवलेले आहे हे नक्की. परंतु त्याच्या जोडीला अनेक क्रियापदांनी हेच केले आहे. उदाहरणार्थ बोलणे. हल्ली कोणीही कोणाला काहीही सांगत नाही. म्हणत नाही. ते बोलतात. नाटकात कलाकार संवाद म्हणत नाहीत. ते संवाद बोलतात. इतकेच काय कवीदेखील त्याची कविता वाचत वा गात नाही. तर बोलतो. तसेच ताटावर बसलेल्यास हल्ली पदार्थ वाढत नाहीत. ते टाकले जातात. म्हणजे भाजी टाकू का, चटणी टाकू का.. इत्यादी. समाजमाध्यमांवर नोंद लिहीत नाहीत. तीही टाकतात. नवयौवनांनी साडी नेसली त्याला आता बराच काळ उलटला. आताच्या मुली साडी घालतात. पोलीस वा जागरूक नागरिक चोरास अलीकडे रंगेहात पकडतात. कारण त्यांना हातोहात पकडणे माहीतच नसते. पूर्वी सायंदैनिकांच्या मते गुन्हेगार नामचीन होते. आता सुप्रसिद्ध व्यक्तीदेखील नामचीन म्हणून ओळखल्या जातात. विचारवंत तर मराठीत अलीकडे इतके झाले आहेत की सामान्य नागरिकांपेक्षा लवकरच या विचारवंतांची संख्या महाराष्ट्रात वाढेल. त्याचप्रमाणे मराठीत अलीकडे कनिष्ठदेखील कोणी नसतो. सगळेच ज्येष्ठ. हिंदीत एखाद्या प्रकरणातील तपशील बाहेर आले तर त्यास खुलासा म्हणतात. मराठीत या खुलाशास जवळचा शब्दप्रयोग म्हणजे गौप्यस्फोट. तो आता होतो न होतो. परंतु खुलासा मात्र सारखाच होतो. हिंदीत आयुर्वेदिक उत्पादनांत जडीबुटी वापरतात. मराठीतही ती आली. वास्तविक मराठीत वनौषधी आहेत. त्यामुळे जडीबुटीची गरज मराठीस नाही. पण आपल्याकडे काय आहे हे माहीत नसणे हीच मराठी भाषकांची शोकांतिका असल्याने जडीबुटी आपल्याला गोड मानून घ्यावी लागली. तीच बाब दाढीची. इंग्रजीत शेव्ह करतात. हे शेव्हिंग मराठीत आल्यावर त्याची हजामत तरी व्हायला पाहिजे किंवा दाढी. परंतु इंग्रजीतील शेव्ह मराठीत शेव होऊन आले. या ‘बनवणे’ क्रियापदाइतकाच ‘जी’ या प्रत्ययाने उच्छाद मांडलेला आहे. अमुकजी येत आहेत किंवा तमुकजी जात आहेत. हा ‘जी’ हा हिंदी. मराठीत यासाठी कुर्रेबाज राव आहे. अमुकराव वा तमुकराव. पण ते विसरून आपण हे हिंदीचे लाचार ‘जी’ अलीकडे आनंदाने लावतो किंवा लावून घेतो. हे आणि असे अनेक दाखले देता येतील. परंतु प्रश्न असा की हे असे का होते?
याचे स्पष्ट कारण म्हणजे लोकप्रिय होण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाऊन लांगूलचालन करण्याची आपल्याला लागलेली सवय. हल्ली कोणीही कोणास अशुद्ध भाषेसाठी दोष देत नाही. तसे करणे ब्राह्मणी मानले जाते. हा शुद्ध मूर्खपणा आहे. भाषा ही जात, आर्थिक स्तर, सांस्कृतिक पाश्र्वभूमी अशा अनेक घटकांवर आधारित असते हे मान्य. परंतु तरीही भाषेचे, लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण असतेच असते. आपण ब्राह्मणी म्हणवून घेण्याच्या भीतीने ते सोडून देऊ लागलो आहोत. आपल्यापेक्षा जातीय, धार्मिक, सांस्कृतिक वैविध्य हे जागतिक पातळीवर आहे. परंतु म्हणून इंग्रजी लेखन प्रमाणिततेचा डौल सोडत नाही. म्हणजे केरळी, मराठी, ब्राह्मण, उत्तर प्रदेशी, बिहारी, अफ्रिकी, इस्लामी, पश्चिम आशियाई अशा अनेकांच्या इंग्रजी बोलीचा लहेजा वेगळा असेल. परंतु या सर्वाचे इंग्रजी लेखन हे प्रमाणित नियमांच्या आधारेच असते. परंतु हे आपणास मान्य नाही. कारण पुरोगामी म्हणवून घेण्याच्या हौसेपोटी आपण भाषेस पायदळी तुडवू लागलो आहोत. वास्तविक भाषा हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. परंतु कट्टय़ावरच्या वावदूक गप्पांनाच चिंतनीय मानण्याची प्रथा आपण आनंदाने रूढ करून घेतली असल्याने भाषेच्या हेळसांडीची आपणास जराही खंत वाटत नाही.
आपला भाषिक दर्जा घसरू लागला आहे, कारण आपल्या जगण्यातील वैचारिक दर्जा घसरू लागला आहे, हे आधी मान्य करायला हवे. भाषा हा अभिव्यक्तीचा पहिला सहजसोपा हुंकार असतो हे जरी खरे असले तरी या हुंकारामागे डोक्यातील विचार असतात. म्हणजे एखादी व्यक्ती बोलत आहे आणि तिच्या मेंदूचा त्या बोलण्याशी काही संबंधच नाही, असे निरोगी व्यक्तीबाबत कधी होत नाही. याचा अर्थ एखाद्याची भाषा खराब असेल तर त्याचे कारण त्याची विचारप्रक्रिया अधिक खराब आहे, असा असतो. ज्वर हा जसा आजार नसतो, ते आजाराचे लक्षण असते. तद्वत बिघडत चाललेली भाषा हा आजार नाही, ते आजाराचे लक्षण आहे. म्हणजेच मुळात विचारप्रक्रियेची मशागत करण्याची गरज आपणास वाटत नाही तोपर्यंत आपली भाषा ही अशीच उठवळ राहणार. ही मशागत वाचन, वादविवाद, प्रसंगी वाक्ताडन आणि मुख्य म्हणजे मतभिन्नता आदी मार्गानी होत असते. आज यालाच विरोध असल्याने बुद्धिवंत, विचारी हे शब्दप्रयोग शिवीप्रमाणे केले जातात. हे कटू असले तरी वास्तव आहे. तेव्हा बनवणे या मराठी क्रियापदाचा अतिवापर चिंताजनक आहे असेही माधुरी पुरंदरे यांना वाटत असेल. आणि ते तसे आहेच. कारण मुदलातील क्रियाही चिंताजनक आहे. क्रियाच चांगली नसेल तर क्रियापदही खराबच असणार.
हे जर सत्य असेल- आणि ते तसे आहेच- तर मग आपल्याकडे सध्या भाषा, धर्म आदींच्या नावे उत्सव सुरू आहे, त्याचा अर्थ कसा लावायचा? जे दैनंदिन जगण्यात नसते त्याचेच नेहमी उत्सवी अवडंबर माजवले जाते. धर्म, भाषा दैनंदिन जगण्यात नाहीत. म्हणूनच त्यांचे उत्सवी सोहळे. समाज कर्ता, कर्म, क्रियापद इत्यादीबाबत अनभिज्ञ असला की हे असेच होणार. तेव्हा मी काय ओल्तो.. असे कोणी लिहिल्यास माधुरी पुरंदरे आणि आपण सर्वानी ते गोड मानून घ्यावे.