रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले

कालिदासाच्या मेघदूताचा हवाईमार्ग तपासणारे वैमानिक डॉ.भावे

Share...

महाकवी कालिदासाने रचलेले ” मेघदूत ” हे काव्य इ.स.चे ४ ते ६ व्या शतकात लिहिले गेल्याचे मानले जाते. हद्दपारीची शिक्षा भोगणारा यक्ष, वर्षा ऋतू सुरु झाल्यावर अत्यंत व्याकुळतेने आणि उत्कटतेने, मेघालाच आपला दूत मानून, हिमालयातील अलका नगरीतील आपल्या पत्नीला संदेश पाठवितो. कालिदास हा यक्षाच्या तोंडून, नागपूरच्या रामगिरी ( रामटेक ) पासून हिमालयापर्यंतच्या मार्गाचे अत्यंत सुंदर वर्णन करतो. मेघदूत हे एक अत्यंत उत्कृष्ट ‘ संदेश काव्य ‘ म्हणून जगभर गाजले. कवी, लेखक. नाटककार, अभिनेते, नर्तक, चित्रकार अशा अनेकविध कलांच्या अनेक कलाकारांना ते स्फूर्ती देणारे ठरले. यावर शेकडो भाष्यग्रंथ लिहिले गेले. त्यात सर्वाधिक गाजलेला ग्रंथ ( सध्याच्या तेलंगणातील ) मल्लिनाथ याने लिहिला होता. त्यावरून एखाद्या गोष्टीवरील उत्तम भाष्याला ” मल्लीनाथी ” म्हटले जाते. मेघदूताची अनेक भाषांमध्ये शेकडो भाषांतरे झाली. हे मूळ काव्य मंदाक्रांता ( मंदाक्रांता सरस कविता, कालिदासी विलासी ) वृत्तातील असल्याने अनेक भाषांतरेही मंदाक्रांता वृत्तात केली गेली आहेत. होरॅस हेमन विल्सन यांनी १८१३ मध्ये मेघदूताचे इंग्रजीत पहिल्यांदा भाषांतर केले.

महाकवी कालिदासाने आपल्या मेघदूत या जगप्रसिद्ध काव्यामध्ये, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे सुंदर वर्णन केले आहे. ‘ एक सुंदर कल्पनाविलास ‘ म्हणून सर्वांनी सोडून दिले असले तरी पुण्याच्या डॉ.सुरेश विश्वनाथ भावे यांनी या मार्गाचे निरीक्षण करायचे ठरविले. महाकवी कालिदास हा त्यांचा अत्यंत आवडता नाटककार महाकवी ! आता यासाठी डॉ.भावे यांनी घेतलेले परिश्रम पाहिले की आपण अक्षरश: अचंबित होतो. मेघदूताचा आजपर्यंत कुणीही कधीही न केलेला हा एक भन्नाट रसास्वाद आहे.

पुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचिकित्सक ! MBBS, D’Ortho, FRCS, FRCSE, FICS अशा वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मातब्बर पदव्या मिळविलेले. कुठल्याही प्रकारचे विमान चालविण्याचे प्रशिक्षण अल्पावधीत पूर्ण केलेले आणि स्वत:च्या मालकीचे विमान असलेले विमान मालकचालक. स्वत:च्या शिडाच्या बोटीतून नौकानयन, स्वत:चे हॉस्पिटल, स्वत:ची फोटोलॅब, उत्तम शेतकरी, उत्कृष्ट हवाई चित्रण अशा कितीतरी गोष्टी या एकाच माणसाने प्राप्त केल्या होत्या ! मेघदूत आणि रघुवंश ही महाकाव्यांचा पूर्ण रसास्वाद घेण्यासाठी डॉ. भावे यांनी संस्कृतमध्येही पारंगत्व मिळविले. रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग प्रत्यक्ष शोधण्यासाठी जैन रामायणापासून ते बाली बेटातील रामायणापर्यंत वेगवेगळ्या १५० प्रकारच्या रामायणांचा शोध घेतला. आपल्या देशामध्ये पूर्वीची लोकं एका वेळी अनेक क्षेत्रात इतके पारंगत्व कसे मिळवीत असतील असा प्रश्न मला अनेकदा पडतो. ज्यांच्याबद्दल कमालीचे आश्चर्य वाटावे असे अनेक प्रकांड पंडित महाराष्ट्रात जन्माला आले. सामान्यत: ज्या गोष्टी पूर्णत: अशक्य वाटतात त्या गोष्टी, कांही माणसे प्रचंड कष्ट, मेहनत, तयारी करून लीलया प्राप्त करतात तेव्हा अचंबित होणे इतकेच आपल्या हातात राहते. डॉ. भावे हे त्यापैकीच एक अफाट कर्तृत्ववान व्यक्तिमत्व !

कालिदासाने मेघदूतामध्ये वर्णन केलेल्या, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे ( Navigation Log ) डॉ. भावे यांनी आपल्या विमानातून प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याचे संपूर्ण छायाचित्रण केले. ज्यावेळी आकाशात उडण्याची कला नव्हती किंवा विमाने अस्तित्वात आली नव्हती असे जग मानते ( आपल्या पुराणकालात अद्ययावत विमानविद्या अस्तित्वात होती ) तेव्हा कालिदासाने हे संपूर्ण अवकाशवर्णन इतके अचूकपणे कसे केले असेल ? कालिदासाच्या त्या वर्णनाची अचूकता पाहून त्यांनी कालिदास हा उत्तम वैमानिक असला पाहिजे हे सिद्ध केले. या त्यांच्या कार्यासाठी उज्जैनच्या कालिदास अकादमीने त्यांचा मोठा सन्मान केला.

कालिदासाच्या मेघदूतातील मार्गक्रमणाची अचूकता लक्षात आल्यावर डॉक्टरसाहेबांनी पुढची भन्नाट योजना आखली. कालिदासाच्या रघुवंशामध्ये वर्णन केलेल्या , प्रभू रामचंद्रांनी पुष्पक विमानातून लंका ते अयोध्या या हवाई प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आणि छयाचित्रण करायचे असे त्यांनी ठरविले. यासाठी सरकारकडून कित्येक प्रकारच्या परवानग्या त्यांना मिळवाव्या लागल्या. आधी त्यांनी हा प्रवास चालत तसेच कार, बोट, छोटी होडी अशा अनेक वाहनातून केला. नंतर याच मार्गावरून आपले विमान घेऊन जाऊन त्याचे छायाचित्रण केले. विमानोड्डाणासाठी अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या मान्सूनपूर्व आणि मान्सूनपरतीच्या काळात जीव धोक्यात घालून त्यांनी ही उड्डाणे केली. कालिदासाने रघुवंशात शेकडो वर्षांपूर्वी केलेली वर्णने कशी हुबेहूब आणि अचूक आहेत हे त्यांनी सिद्ध केले. त्यांना विमानातून पाहतांना खालच्या महासागरात जेथे पाणी उथळ आहे असे दिसले तेथे ते प्रत्यक्षही पाण्यात उतरून पाहून आले. तेथे पाण्यात बुडी मारून, रघुवंशातील वर्णनानुसार तेथे रामसेतू असल्याचेही पडताळून पाहिले.( त्यांच्या पुस्तकातील हा फोटो सोबत दिला आहे ).

वाल्मिकी रामायणात लोणारचे सरोवर हे चौकोनी असल्यासारखे वर्णन आहे. पण अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट अशी की आकाशमार्गातून वर्णन करणारा कालिदास मात्र हे सरोवर वर्तुळाकार असल्याचे सांगतो. आकाशमार्गच उपलब्ध नसतांना, या सर्व गोष्टी कालिदासाला इतक्या अचूक कशा सांगता आल्या हे गूढच आहे !

या सगळ्या अनुभवांचे थक्क करणारे वर्णन आणि भरपूर फोटो असलेले एक पुस्तक डॉ. भावे यांनी प्रसिद्ध केले आहे. पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. भरपूर रंगीत चित्रे आणि नकाशे यामुळे तर पुस्तक वाचतांना खूप मजा येते. डॉ. भावे कालिदासाला म्हणतात, ” कालिदासा, मी तुझा मेघ, असे म्हणून तीच भरारी मी माझ्या विमानाने केली. तसेच जमिनीवरून प्रवास करून पडताळून पाहिली. त्या काव्यातील अलंकारशात्र तर चाखलेच, पण इतरांना जे उमजले नाही, ते त्याचे पर्यावरण ज्ञान, पशुपक्षी यांचे बारकावे, शहरी आणि गावंढळ लोकांचे विशेषत: स्त्रियांचे रूप आणि वागणूक, दिशाशास्त्र, हवामान शास्त्र व त्यातील गणिते यावरचे प्रभुत्व पाहून मी थक्क झालो. हा केवळ कवीच नाही तर अस्सल पिंडाचा शास्त्रज्ञ आहे “.

या पुस्तकाच्या सुरुवातीला परिचय करून देणारे कॅप्टन आनंद जयराम बोडस हे देखिल अशाच अत्यंत वेगळ्या विषयांवर लेखन करणारे बहुपेडी व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर असून त्यांनी डॉ. भावे यांना अनेकदा सहाय्य केले आहे ! त्यांनी करून दिलेला पुस्तक परिचय लेखसुद्धा खूप वाचनीय आहे. ते एक आश्चर्यकारक निरीक्षण नोंदवितात. समर्थ रामदास स्वामींची समाधी असलेल्या साताऱ्याजवळील सज्जनगडाला दर्शनासाठी हजारो लोक गेली अनेक वर्षे जात आहेत. त्या सज्जनगडाच्यावरील सपाट पृष्ठभागाचा आकार अखंड भारताच्या नकाशाप्रमाणे आहे हे विमानात बसून आकाशातून सज्जनगडाचे दर्शन घेतल्याशिवाय समजायला कठीण आहे.

” रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले ” असे लांबलचक पसरलेल्या नावाचे या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक खुद्द डॉ. एस. व्ही. भावे आहेत. 

पुढच्या आठवड्यात ” आषाढस्य प्रथम दिवसे ” असा महाकवी कालिदास दिवस आहे. तो साजरा करायचा असेल तर या पुस्तकाइतका अप्रतिम पर्याय नाही ! 

मकरंद करंदीकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *