स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

आठवणी अंगाराच्या – विश्वास विनायक सावरकर

Share...

आठवणी अंगाराच्या

आठवणी अंगाराच्या’ या पुस्तकाची ही चतुर्थ आवृत्ती एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकाचे लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चिरंजीव विश्वास सावरकर हे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका व्यक्त केली, ती त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे-

तात्यांच्या आठवणी असंख्य आहेत. कुटुंबातल्या माणसांपुढे आपण अनेक आठवणी केवळ व्यक्तीच्या आठवणी म्हणून सांगतो व ऐकतो; पण या आठवणी माझ्या वडिलांच्या असल्या तरी त्या एका राष्ट्रीय पुढाऱ्याच्या असल्याने त्यांच्या काही आठवणी मी अशा निवडल्या आहेत, की, ज्या वाचल्याने तात्यांच्या स्वभावाचं दर्शन व वागण्या-बोलण्यातून त्यांचं देशप्रेम व तत्त्वनिष्ठा व्यक्त व्हावी.

त्याचप्रमाणे लोकांना सध्याच्या परिस्थितीतही त्यांनी पूर्वी विशिष्ट प्रसंगी दिलेल्या संदेशांचा उपयोग व्हावा, हाच दृष्टिकोन समोर ठेवून मी आठवणी लिहिल्या असून त्यायोगे तात्यांच्या जीवनाच्या घरगुती आणि सार्वजनिक बाजूंवरही प्रकाश पडावा.

त्याचप्रमाणे त्यांच्या घरगुती आवडी-निवडी, त्यांचे कुटुंबीयाशी बोलणं-चालणं, त्यांचा दैनंदिन कार्यक्रम यांविषयीची लोकांमध्ये असलेली उत्सुकताही थोड्याफार प्रमाणात पुरी व्हावी. ह्यापुढे माझ्या मनातील त्यांच्याविषयीच्या आदराविषयी लिहिणं हे मी गौण मानलं. काही जणांनी माहिती काढण्याच्या ओघात काही स्पष्ट व सविस्तर प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या प्रश्नांना, वस्तुस्थितीला धरून मीही सुस्पष्ट व सडेतोड उत्तरं दिली. ती या लेखनात आली आहेतच.

तात्यांच्या वैयक्तिक वागणुकीतून व्यक्त होणारं त्यांचं देशप्रेम, तत्त्वनिष्ठा, दूरदृष्टी व पुढे अनेक वर्षं उपयोगी पडणारं मार्गदर्शन यांचं आकलन व्हावं हा मूळ हेतू या आठवणी लिहिताना डोळ्यांसमोर असल्याने अशा आठवणीं संबंधातील कालगणनेतील वा इतर तपशिलातील अचूकपणात क्वचित फरक पडण्याचा संभव आहे. परंतु या आठवणींमधील गाभा मात्र माझ्या वर वर्णिलेल्या मूळ हेतूच्या दृष्टीने पक्का आहे.

वर उल्लेखिलेल्या माझ्या मूळ हेतूच्या दृष्टिकोनातून मी या ज्या निवडक आठवणी लिहिल्या आहेत त्या लोकांमधील असलेली जिज्ञासा थोड्याफार प्रमाणात पुरी करतील, असा मला विश्वास वाटतो.

एकूण सहा प्रकरणांतून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवर लिहिलेल्या या आठवणी आहेत. तसेच तात्या सावरकर यांची नात विदुला विश्वास सावरकर हिने आपल्या चौदाव्या वर्षी तात्यांच्या मे १९६३ ते फेब्रुवारी १९६६ या कालावधीतल्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी या पुस्तकात आहेत. तसेच काही छायाचित्रेही आहेत. याबरोबरच ‘आझाद हिंद सेने’ची प्रेरक शक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जोडलेला परिशिष्ट वाचनीय आहे. १९८६ मध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये या पुस्तकाबद्दल छापून आलेले अभिप्रायही दिलेले आहेत.

या पुस्तकाची प्रस्तावना शंकर रामचंद्र दाते यांनी लिहिली आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदातील काही ओळी ‘संघर्ष याचं नाव सावरकर’, त्याचं स्वरूप विश्वासराव सावरकर यांनी लिहिलेल्या अनेक आठवणींतून प्रसंगोप्रसंगी व्यक्त झालं आहे. त्यायोगे त्या-त्या वेळच्या प्रसंगाचं शब्दचित्र साक्षात उभं राहातं. त्यांनी आपल्या पित्याच्या या आठवणी लिहून पितृऋण, तसंच समाजऋणही काही अंशी फेडले आहे. त्यांच्या या आठवणी म्हणजे ‘की घेतलं व्रत न हे अम्ही अंधतेने’ या सावरकरांच्या उक्तीचा साक्षात्कार होय.’

लेखक : विश्वास विनायक सावरकर

पृष्ठे : १९८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *