भवानराव पंतप्रतिनिधी

औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं

Share...

कला, साहित्य, कीर्तन, व्यायाम, उद्योग या सर्वांना एकाचवेळी आश्रय देणारा तो राजा होता. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 8 वर्षं आधीच या राजानं संस्थानचा कारभार जनतेच्या हातात दिला.

होय. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातच झाल्या आहेत. हे संस्थान होतं औंध आणि त्याचे राजे होते भवानराव पंडित पंतप्रतिनिधी. तसं पाहायला गेलं आणि इतर संस्थानांची तुलना केली तर औंध हे एकदम चिमुकलं संस्थान होतं. फक्त 72 खेड्यांच्या या संस्थानानं इतिहासाच्या पानांवर वेगळा ठसा निर्माण केलाच त्याहून एक प्रयोगशील संस्थान म्हणून ते अजरामर झालं आहे.

या सर्व प्रगतीमागे एका व्यक्तीची प्रेरणा होती ती म्हणजे भवानरावांची. आज काळाच्या ओघात औंधची ही प्रगती आणि भवानरावांचं नाव काही अनाकलनीय कारणांमुळे नाहीसं झालं आहे. लोकशाही दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या लोकशाहीच्या प्रयोगाची माहिती घेऊ.

औंध संस्थान

औंध मूळपीठ डोंगरावरील देवीचे मंदिरऔंध मूळपीठ डोंगर


औंध संस्थान 1690 साली स्थापन झालं आणि 1948 साली भारतात पूर्ण विलिन होईपर्यंत ते सुरू राहिलं. श्रीमंत पंडित प्रतिनिधींची मूळ गादी पूर्वी कऱ्हाड इथं होती. पण कऱ्हाड इंग्रजांकडे गेल्यावर 1854 साली प्रतिनिधींची गादी औंधला आली. पण औंध संस्थानाची रचना काहीशी वेगळी आहे. सलग असं हे संस्थान नव्हतं. राजधानी औंधला असली तरी बाकीची गावं आजच्या सांगली, सातारा, सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यात विभागलेली होती. औंध, कुंडल, आटपाडी, गुणदाळ असे त्याचे चार विभाग होते. त्यातला आटपाडी हा सर्वांत मोठा तालुका होता.

लोकांची सत्ता

AUNDH INFO/ANANAD SALUNKHEभवानराव पंतप्रतिनिधी औंध

1938 साली औंधचे शेवटचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी आपल्या संस्थानचा कारभार आता लोकांच्या हातून चालवला पाहिजे असं मत मांडलं. खरंतर अशी घोषणाच केली. 1934 पासूनच महाराज गांधीजींच्या स्वराज्य आणि ग्रामराज्य संकल्पनेने भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनी गांधीवादी राज्यघटना तयार करावी असं मत मांडलं.  पंतप्रतिनिधींचे पुत्र आप्पासाहेब पंत यांचे मॉरिस फ्रिडमन नावाचे एक पोलिश गृहस्थ सहकारी होते. मॉरिस फ्रिडमन यांना भारतानंद असंही म्हटलं जाई. राजसत्तेच्या ऐवजी लोकांची सत्ता आणायची तर आपण महात्मा गांधींचा सल्ला घेतला पाहिजे असं फ्रिडमन यांनी राजांना सुचवलं.

गांधीजींची भेट

फ्रिडमन यांच्या सल्ल्यानुसार पंडित सातवळेकर, अप्पा पंत, मॉरिस फ्रिडमन आणि आणखी काही सहकारी वर्ध्याला गांधीजींना सेवाग्राम आश्रमात भेटायला गेले. गांधीजींनी त्यांना स्वराज्याचं महत्त्व पटवून दिलं. काही दिवसांनी स्वतः राजे भवानराव पंतप्रतिनिधीच गांधीजींना भेटायला गेले. या भेटीमध्ये गांधीजींनी खेडी स्वयंपूर्ण होणं, स्वतंत्र होणं का गरजेचं आहे हे सांगितलं.

“लोकाच्या सद्सद्विवेकबुद्धीचा विश्वस्त आणि त्यांचा आद्य सेवक म्हणून राजाला तनखा जरूर मिळाला पाहिजे पण त्याबद्दल आग्रह किंवा तो हक्क आहे असे मानू नये,” असं गांधीजींनी राजेसाहेबांना सांगितलं. आप्पा पंतांनी ‘मुलखावेगळा राजा’ या पुस्तकात या भेटीचे सविस्तर वर्णन केलं आहे.

गांधीजींची कल्पना आणि औंध एक्सपेरिमेंट

गांधीजींनी, प्रत्येक गावात पाच पंचांचं मंडळ स्थापन करावं. गावातले शिक्षण, सुरक्षा, रस्ते, बाजार, यात्रा, शेती याचे सर्वाधिकार त्यांना द्यावेत आणि संस्थानच्या महसुलातला अर्धा वाटा गावांसाठी द्यावा असं सुचवलं. गावातले तंटेबखेडे गावातच मिटवावेत. काही गावांची मिळून एक ‘तालुका पंचायत’ तयार करावी. तालुक्याची सर्व प्रगती या पंचायतीतून झाली पाहिजे. प्रत्येक तालुका पंचायत समितीने आपल्यातून तीन सदस्य औंधच्या मध्यवर्ती काउन्सिलवर पाठवावेत. या काउन्सिलवर बाहेरच्या तज्ज्ञ मंडळींना नेमण्याचा अधिकार राजाला असेल आणि वर्षातून किमान दोनवेळा काउन्सिलचं सत्र होईल असं त्यांनी सुचवलं.

भवानराव पंतप्रतिनिधी, औंध

यानुसार राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांच्यासाठी मॉरिस फ्रिडमन यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्यानुसार जो लोकशाहीचा प्रयोग औंध संस्थानात राबवला गेला त्यालाच ‘औंध एक्सपेरिमेंट’ असं म्हटलं गेलं. याच नावाने हा प्रयोग देशभरात प्रसिद्ध झाला.

मसुद्यात काही सुधारणा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी सुचवल्या आणि तो औंधच्या जुन्या कौन्सिलकडे मंजुरीसाठी पाठवला गेला. कालांतराने या घटनेच्या कायद्यात दुरुस्त्याही झाल्या.

21 जानेवारी 1939

औंधच्या राजानं आपली सत्ता लोकांच्या हाती सोपवण्याचं ठरवलं आहे. 21 जानेवारी 1939 रोजी ही राज्यघटना लागू करण्याचं निश्चित झालं आहे. असं सांगून गांधीजींनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि दादासाहेब मावळणकरांना या दिवशी औंधला जाण्यास सांगितलं. लोकांचं राज्य घोषित करण्याच्या कार्यक्रमात राजे लोकांना उद्देशून म्हणाले, “आता राज्य तुमचं. अधिकार, पैसा, सुधारणा तुम्हीच तुमच्या हाताने करणार.”

नवी राज्यघटना स्वीकारल्यावर नव्या काउन्सिलसाठी निवडणुका घेणं आवश्यक होतं. त्यासाठी तीन महिन्यात साक्षरता वाढवण्यासाठी संस्थानात प्रयत्न झाले. 70 टक्के लोकांना अक्षरओळख होईल इतपत शिकवण्यात आलं. त्यानंतर जून महिन्यात निवडणुका झाल्या आणि नवे काउन्सिल निवडले गेले. आप्पा पंत त्याचे पंतप्रधान झाले. 1943-44 या काळात रामाप्पा बिद्री हे पंतप्रधान होते.

1942 च्या चले जाव आंदोलनात आणि 1942 ते 1947 या काळात क्रांतीकाऱ्यांचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून या संस्थानानं भूमिका बजावली होती. गांधीजींच्या चले जाव आंदोलनात आणि प्रतीसरकारच्या कार्यात संस्थानातील लोकांचा मोठा वाटा होता. लोकशाहीचा हा प्रयोग पाहाण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनीही औंधला भेट दिली होती.

भवानराव पंतप्रतिनिधी

औंधचे शेवटचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी हे बाळासाहेब या नावानेही ओळखले जात. साहित्य, शास्त्र, उद्योग, कला, व्यायाम यांची त्यांना आवड होती आणि त्यापैकी अनेक गोष्टींमध्ये ते पारंगतही होते.

त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1868 साली झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली होती. 1897 ते 1901 या कालावधीमध्ये ते संस्थानचे सरचिटणीस झाले. या काळात त्यांनी संस्थानावरचं सर्व कर्ज फेडून टाकलं.

1909 साली ते संस्थानाच्या गादीवर आले. 1935 साली मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. हे संमेलन इंदूरला झालं होतं. 1951 साली त्यांचं निधन झालं.

व्यायाम आणि सूर्यनमस्कार

व्यायाम आणि त्यातही सूर्यनमस्काराचे ते विशेष प्रसारक होते. औंधच्या यमाई देवीवर त्यांची जितकी प्रगाढ श्रद्धा होती तितकीच त्यांची सूर्यनमस्कारावरही होती. संस्थानातल्या शाळांमध्ये त्यांनी सूर्यनमस्कार घालण्याची प्रथा रूढ केली होती. ते स्वतः सूर्यनमस्कारावर व्याख्याने देत.

भवानराव पंतप्रतिनिधी, औंध

आप्पा पंत यांनी त्यांच्या या व्यायामाच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते लिहितात, “महाराजांना तालीम, कुस्ती, जोर, बैठकांचा छंदच होता. औंधच्या डोंगरावरील देवीला ते पळत जायचे.”

पंचेचाळीशीनंतर त्यांनी मिरजेच्या राजेसाहेबांच्या सल्ल्यानुसार नमस्कार सुरू केले. दररोज 300 नमस्कार घालण्याचा क्रम त्यांनी 25 वर्षं जोपासला. सूर्यनमस्काराचं छायाचित्रांसह पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध करून लोकांना वाटलं होतं.

संडे रेफरी प्रकरण

या सूर्यनमस्कारांमुळे एक विचित्र प्रकरण मात्र 1935 साली तयार झालं. महाराजांची बदनामी होईल असा मजकूर लंडनमधील ‘संडे रेफरी’ या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला होता. भारतातील एक राजा मुलींना व्यायाम करायला लावतो आणि त्या सडपातळ झाल्यावर त्यांचा वापर करतो अशी काही बदनामीकारक आणि खोटी वाक्यं संडे रेफरी मध्ये प्रसिद्ध झाली होती.

या वर्तमापत्रावर खटला दाखल केल्यावर संडे रेफरीने माफी मागितली आणि त्याकाळी दंडभरपाई म्हणून 30 हजार रुपये पाठवले. भवानरावांनी हे पैसे बँकेत ठेवले आणि त्याच्या व्याजातून दोन सूर्यनमस्कार प्रशिक्षकांना भारतभर नमस्काराच्या प्रसारासाठी पाठवलं.

शिक्षणावर भर

आपल्या संस्थानातील मुलं शिकून मोठी व्हावीत यासाठी भवानरावांनी भरपूर प्रयत्न केले होते. 1916 पासून सक्तीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. संस्थानात फार पूर्वीपासून मुलींची शाळा, रात्रशाळा, गुन्हेगारांची शाळा, प्रौढांची शाळा, कामगार, तेव्हा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजासाठी शिक्षणाचे प्रयत्न केले होते.

मुलांमधील गुणांची पारख करून ते सल्लाही देत. लक्ष्मणराव किर्लोस्कर, नागूराव ओगले अशा थोर लोकांचा संस्थानाशी संबंध आहे.एके दिवशी आटपाडी भेटीवर गेले असताना एका गजानन नावाच्या शाळकरी मुलाने वेगवेगळ्या नकला करून राजाला भरपूर हसवलं होतं. त्यावर खुश होऊन राजांनी त्याला जवळ बोलावून शाबासकी दिली आणि काय करतोस असं विचारलं.

भवानराव पंतप्रतिनधी, औंध

तेव्हा त्याच्या शिक्षकांनी हा मुलगा सतत टवाळी करतो, गावात भटकतो अशी तक्रार केली. तेव्हा महाराजांनी त्याला सांगितले, “गजानन तू मास्तरांच्या नादाला लागू नको. तुला अभ्यास जमणार नाही, तू सिनेमात जा. जगदंबा तुझं कल्याण करेल….”

हा गजानन मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांचे लाडके गदिमा झाले. सिनेमा, गीतलेखन, गीतरामायण सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तुंग यश मिळवलं. पटकथालेखक मधुकर पाठकही औंध संस्थानचेच होते.

कलावस्तूंचे, चित्रांचे संग्राहक म्हणूनही भवानराव ओळखले जातात. ते स्वतः सुंदर चित्रं काढत. नामवंत चित्रकारांना त्यांनी आश्रय दिला आणि त्यांच्याकडून उत्तमोत्तम चित्रं काढून घेतली होती. आजही औंधचं संग्रहालय कलावस्तूंनी संपन्न मानलं जातं.

भवानराव पंतप्रतिनिधी, राजेसाहेब औंध व कलामहर्षी बाबूराव कृष्णराव पेंटर

भवानराव पंतप्रतिनिधी, राजेसाहेब औंध व कलामहर्षी बाबूराव कृष्णराव पेंटर 

औंध इन्फो या संकेतस्थळाचे निर्माते आनंद साळुंखे कला आणि औंध संस्थानाचा संबंध सांगताना बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “औंध कलेचं माहेरघर होतं. जेथे चित्रकार, गायक, शिल्पकार अश्या व्यक्तींच्या कलागुणांना वाव होता. तसंच भारतीय संस्कृती, अजिंठा वेरूळ शिवाय विदेशी चित्रसंग्रह असे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रे असणारा भारतातला एकमेव चित्रसंग्रह येथे आहे.”

औंधमधले देवीचे चित्र

औंधमधील देवीचे चित्र

“औंधच्या राज्याच्या कुंचल्यातून चित्ररामायण रेखाटले गेलेच आहे. त्याचबरोबर ‘संपूर्ण महाभारत’ जगासमोर आणण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले होते.”

शिल्पकलाचित्रकला, शिल्पकला, काष्ठशिल्प सर्वच कलांना औंधमध्ये आश्रय मिळाला.

किर्लोस्कर औंध संस्थानात कसे आले?

उद्योगात वेगवेगळे प्रयोग करणे, त्यांना आश्रय देणे यावर भवानरावांचा भर होता. आज ज्या किर्लोस्कर उद्योगाची भरभराट झाली आहे त्याचं रोपटं याच संस्थानात रुजलं. लक्ष्मणराव किर्लोस्कर बेळगावात नांगराचं फाळ तयार करण्याचं काम करत. मात्र त्यांच्यावर इंग्रज सरकारची सतत पाळत असे.

औंध मंदिरऔंधमधले मंदिर. या मंदिराच्या सभागृहाचे काम किर्लोस्करांनी केले आहे.

एकदा बेळगावला गेले असताना लक्ष्मणरावांनी ही काळजी राजांना सांगितली. तेव्हा राजांचे कारभारी जेकब बापूजी यांनी किर्लोस्करांना आपल्या संस्थानात आणण्याची कल्पना सांगितली.

राजांनी तात्काळ काही जागा लक्ष्मणरावांना दिली. आज तिचंच रुपांतर किर्लोस्करवाडी आणि उद्योगात झालं. असाच आश्रय त्यांनी ओगले यांना दिला आणि त्यांनीही मोठा उद्योग स्थापन केला. 1930 साली औंध संस्थानात आशियातला पहिला ग्लायडिंग क्लब काढण्याचेही प्रयत्न झाले होते.

दो आंखे बारह हात

आज खुल्या तुरुंगांबद्दल भारतभर नव्हे जगभरात बोललं जातं. पण याचे खरे आद्य प्रणेते भवानराव पंतप्रतिनिधी आहेत. त्यांनी 1939 साली स्वतंत्रपूर नावाची कैद्यांची खुली वसाहत सुरू केली होती.

गुन्हेगारांना आपली चूक सुधारण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यातूनच स्वतंत्रपूरचा उदय झाला होता. इथं त्यांना कुटुंबासह राहता यायचं. कष्ट करून जे पिकवलं ते विकता यायचं.

शिल्पकला

चित्रकला, शिल्पकला, काष्ठशिल्प सर्वच कलांना औंधमध्ये आश्रय मिळाला.

यावर ग. दि. माडगुळकरांनी एका सिनेमाची कथा लिहिली आणि व्ही. शांताराम यांनी तो सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्याचं नाव दो आंखे बारह हात… लता मंगेशकरांच्या आवाजातलं, ए मालिक तेरे बंदे हम… हे या सिनेमातलं गाणं आताशा तुमच्या मनात आलं असेलच…

पर्यटनाचा एक उत्कुष्ट नमुना … श्री भवानी वस्तूसंग्रहालय :

औंध संस्थानाचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे स्वत: उत्तम चित्रकार व कलाप्रेमी होते. युरोपात फिरत असताना त्यांनी अनेक चित्रे व कलाकृती खरेदी केल्या. भारतीय चित्रकारांची चित्रे हि ते विकत घेत असत. त्याच बरोबर कलाकारांकडून चित्रे अथवा पुतळे बनवून घेत व त्यांना यथोचित मोबदला देवून सन्मानीत करत. यामुळे महाराजांकडे मोठा कलासंग्रहालय निर्माण झाला. हा कलासंग्रह जनतेला पाहता यावा, लोकांना हा कालासंग्रह पाहून कलेची प्रेरणा मिळावी व शैक्षणिकदृष्टी साध्य व्हावी या दुहेरी हेतूने १९३७ – १९३८ या काळात श्री भवानी चित्र संग्रहालयाची इमारत उभारली व हे संग्रहालय जनतेला खुले केले.

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कलेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावे या हेतूने बाळासाहेबांनी हा कलासंग्रह संग्रहाच्या इमारतीसह १९५२ मध्ये महाराष्ट्रास सुपुर्त केला.औंध येथील भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय हे कलेचे व विशेषत: रंगचित्राचे संग्रहालय आहे. केवळ चित्रकलेचे असे हे कदाचित भारतातील एकमेव संग्रहालय आहे. 

श्री भवानी वस्तूसंग्रहालय


1 Comment

  1. खुप छान माहिती. प्रथमच समजले औंध हे संस्थान होते ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *