Bibliophobia: The End and the Beginning of the Book

पुस्तकं पाच हजार वर्षं टिकली की! – Nilu damle

Share...

पुस्तकं सुरवातीला पानांवर, जनावरांच्या कातडीवर लिहिली गेली.  भूर्जापत्रावर मजकूर लिहायचा, भूर्जापत्रं दोऱ्यात ओवली की झालं पुस्तक. पानं आणि चामडीनंतर मातीच्या चकतीवर मजकूर कोरायला सुरवात झाली. नंतर आला कागद. लांबलचक कागदावर लिहिलेलं असे, त्याची पुंगळी केलेली असे. पुंगळी उलगडायची आणि वाचन करायचं. चीनमधे इसवी सनाच्या सहाव्या शतकात कागद होता, कागदावर मजकूर चितारला जात असे, चलनी नोटाही कागदावर छापल्या जात. गुटेनबर्गची छपाई पंधराव्या शतकात जर्मनीत सुरु झाली आणि तिथून बांधलेलं कागदी पुस्तक आणि पुस्तकाच्या अनेक प्रती सुरू झाल्या.

पुस्तकात शब्द असतात. एका काळात माणसं चित्रांची भाषा वापरू लागले. चित्रांनंतर फोटोग्राफी आली. नंतर चित्रपट आले. पुस्तक या कल्पनेनं ही नवी दृश्य भाषा वापरली.  तीही पुस्तकंच.

डिजिटल आणि इंटरनेटचं युग सुरु झाल्यावर पुस्तकाचं रूप बदललं. न छापलेली पुस्तकं बाजारात आली. कागदाशिवाय पुस्तकं. डिजिटल पुस्तकं  ठेवण्यासाठी ना कपाटं हवीत ना ग्रंथालयं. जगात कुठं तरी राक्षसी कंप्यूटरवर डिजिटल पुस्तकं ठेवलेली असतात, गुगलवर  सर्च केला की  क्षणार्धात पुस्तक/संदर्भ हजर.

पुस्तक  निर्मितीचा इतिहास पुस्तकात आहे. तो सलगपणे एकाद्या धड्यात मांडलेला नाही, पुस्तकभर पसरलेला आहे. 

इसवी पूर्व २१३ साली चिनी सम्राट किन शी हुआंग याने आदेश जारी केला.  कोणाही नागरिकाकडं धार्मिक, राजकीय, ऐतिहासीक पुस्तक सापडलं तर ते नष्ट केलं जावं, ज्याच्याकडं ते सापडेल त्याला मारून टाकावं. सम्राटाला पुस्तकांवर मक्तेदारी हवी होती, सम्राटाला नागरिकांना पुस्तकांपासून वंचित ठेवायचं होतं. 

सोळाव्या शतकात मार्टिन लुथरनं ख्रिस्ती विचार आणि आचार यांच्यावर टीका करून सुधारणा सुचवल्या. बंड.अधिकृत बायबल जाळून त्यानं निषेध व्यक्त केला. नंतर पोपांनी  मार्टिन लूथरनं लिहिलेलं पुस्तक जाळलं. 

हिटलरनं नाझी विचारांना विरोध करणारी पुस्तकं जाळली, पुस्तकं साठवणाऱ्या वाचनालयांसह.

१९८९ साली इराणचे धर्मनेते खोमेनी यांनी फतवा काढला. सलमान रश्दीची सेटॅनिक व्हर्सेस ही कादंबरी जाळा, रश्दीला मारा.

पुस्तकं डेंजर असतात. पुस्तकं विचार मांडतात. विचार सत्ता उलथवू शकतात, मत्ता नाहिशी करू शकतात,अधिकार हिरावून घेऊ शकतात.  

पुस्तक जाळा, पुरा, नदीत बुडवा, काहीही करा. 

पुस्तक टिकतं.

अभंग नदीत बुडवले. तरीही टिकले.

१५६६ साली मार्टिन लुथर यांचे धर्मविषयक विचार टेबल टॉक्स या पुस्तकात प्रकाशित झाले. पोप ग्रेगरी तेरावे यांनी आदेश दिला की  ते पुस्तक जिथं कुठं सापडेल तिथं हुडकून जाळा; पुस्तक कोणाच्या घरी सापडलं तर त्या माणसालाही फासावर चढवा.  एका जर्मन माणसानं ते पुस्तक कापडात गुंडाळलं, मेणाचा लेप लावून  जमिनीत पुरलं. इमारतीची दुरुस्ती करताना घरमालकाच्या वारसाला ते सापडलं. जर्मनीत धर्मयुद्ध सुरु असल्यानं ते पुस्तक जर्मनीत सुरक्षीत नाही असा विचार करून त्यानं ते इंग्लंडमधल्या एका माणसाकडं पाठवलं. त्यानं पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि एका आर्चबिशपकडं ते सोपवलं. तेवढ्यात इंग्लंडमधेही धर्मयुद्ध उपटलं. आर्चबिशपाचा शिरच्छेद झाला. युद्ध थंडावल्यानंतर १६५२ साली ते प्रसिद्ध झालं. १५६६ ते १६५२ असा पुस्तकाचा प्रवास.

असं म्हणतात की, “डिजिटल पुस्तकं आल्यानंतर कागदी पुस्तकं संकटात आहेत”, कोणाचा राग आहे म्हणून नव्हे. पुस्तकं सेलफोनवर आणि लॅपटॉपवर वाचता येतात, साठवता येतात. नको कपाट की ग्रंथालय. लिहिणं आणि संपादनही सोपं जातं.

तरीही पुस्तकं छापली जात आहेत. भले त्यांची संख्या कमी जास्त होत असो. टेबलावर लॅपटॉप असतो, त्याच्या बाजूला पुस्तक असतं. झोळीत लॅपटॉप असतो आणि त्या बरोबरच पेपरबॅक पुस्तक असतं.

माहिती, ज्ञान, करमणूक मिळवण्याची अनेक दृकश्राव्य साधनं सहजी उपलब्ध असतानाही पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत. दृकश्राव्यांशी स्पर्धा करताना पुस्तकं अधिक सचित्र होत आहेत, आकार बदलत आहेत, पण शिल्लक आहेत. 

भले रूप बदललंय,पण पुस्तक टिकलंय आणि टिकणारे.  पुस्तक ही माणसाची गरज आहे, ती माणसाची सवय आहे. 

सेलफोनवर, लॅपटॉपवर पुस्तक वाचणं आणि लिहिणं खूपच सुखाचं आहे, त्यात ढोर मेहनत कमी होते. लिहिणं वाचण्याच्या प्रक्रियेत कंप्यूटरवर ओळी ठळक करणं, अधोरेखित करणं अधिक सुखकारक आहे. लिहिताना किवा वाचताना आवश्यक असणारे संदर्भ आता गुगलवर क्षणार्धात मिळतात हेही मोठ्ठं सुख आहे. त्यामुळं डिजिटल पुस्तकं टिकणार हेही नक्की.

तरीही…

लॅपटॉप बिघडतो. सर्वर बिघडतो. फायली करप्ट होतात, नाहिशा होतात. मजकुराची मालकी कुठल्या तरी कंपनीकडं असते. ती कंपनी बंद झाली तर? त्या कंपनीचा मालक इलॉन मस्क सारखा चक्रम माणूस असेल तर मजकुराची खात्री देता येणार नाही.

चांगल्या कागदावर छापलेलं पुस्तक किती तरी बरं. ते सहज चारपाचशे वर्षं टिकतं. मुख्य म्हणजे ते माझ्यासोबत रहातं. पत्रव्यवहार हा एक अमोल ठेवा असतो. ईमेलवरच्या पत्रव्यवहाराची खात्री नाही कारण तो कुणातरी कंपनीच्या हाती रहातो.  तो कागदावर असेल तर माझ्याकडं जवळपास कायम टिकतो.

कागदावरची पत्रं आणि पुस्तकं अगदी सहज चारपाचशे वर्षं जगतील, सहज हाताशी येतील. कंपन्या, त्यांचे चक्रम मालक, त्यांचं राजकारण, राजकारणातली दर्जाहीन माणसं यांच्या ताब्यात पुस्तकं आणि पत्रव्यवहार सोपवणं डेंजरस नाहीये काय?

प्रस्तुत पुस्तक लॅपटॉवर वाचत असतांना आणि त्यावरचा लेख लॅपटॉपवर लिहितानाही  कागदी पुस्तक मनातून हटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *