शेती आणि पशुपालन हे माणसाचे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले व्यवसाय. शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. भारतातही वैदिक कालखंडापासून अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक विविध विषयांना गवसणी घालणारी ग्रंथरचना केली.
कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतुःसूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ.
एक शास्त्रज्ञ म्हणून नेहमीच असे जाणवते की, सृष्टीची निर्मिती हे मानवाला अजूनपर्यंत न सुटलेले कोडे आहे. आधुनिक विज्ञान पदार्थांच्या घन, द्रव्य, वायू ह्या तीनच अवस्था मानते व जीवशक्ती ह्या तीन गोष्टींवर अवलंबून आहे असे मानते. पण जेव्हा ‘शोध आणि बोध: प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा’ हे पुस्तक तुम्ही सखोल वाचाल, तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येईल की, ऋषीमुनींनी तपश्चर्या व चिंतनाद्वारे अभ्यासलेल्या पंचमहाभूते या संकल्पनेचा आधार आजही आपल्याला घ्यावा लागतो आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते सृष्टीच्या कार्यप्रणालीत कोणती कामे करतात आणि त्यांचे महत्त्व काय, ह्याचा सुरेख आढावा लेखकाने आपल्या पुस्तकात अतिशय चिकित्सक बुद्धीने, संशोधक दृष्टीने आपल्यापुढे ठेवलेला आहे.
ऋषीमुनींनी ही कामे करताना कुठल्या प्रयोगशाळेत प्रयोग केले अथवा कुठली उपकरणे वापरली ह्यांचे संदर्भ आपल्याला कुठेही मिळत नाहीत. पण त्यांनी जीवसृष्टी हीच प्रयोगशाळा मानून, तीक्ष्ण प्रखर बुद्धिमत्तेने व विलक्षण सर्जनशीलतेने त्या काळातील शास्त्रीय परिभाषा त्यांनी तत्त्वज्ञान स्वरूपात जगासमोर मांडलेली आहे. हे तत्त्वज्ञान उलगडण्याचे कठीण काम ह्या पुस्तकाद्वारे लेखकाने केल्याचे आपल्याला पदोपदी जाणवेल. प्राचीन काळात ऋषीमुनींनी ध्यानमार्गानेच मनाच्या अत्यंत तरल अवस्थेत जीवसृष्टीचे रहस्य जाणून घेण्यासाठी हा प्रवास केला असावा, असे मला वाटते.
आपल्याला परिचित असलेले आधुनिक ऋषीतुल्य शास्त्रज्ञ म्हणजे ॲरिस्टॉटल, गयोथे, फेलनर, बरबॅक, डॉ. जगदीशचंद्र बोस व डॉ. कार्व्हर.हे शास्त्रज्ञ सृष्टीच्या गाभ्यापर्यंत आपल्या अंतर्दृष्टीच्या साह्याने पोहोचले, त्यामुळेच त्यांना जिवांमधल्या समान सूत्रांचे दर्शन झाले व आपण जसा एखाद्या माणसाशी संवाद साधतो, तसा सर्व जिवांतील चैतन्यशक्तींशी पूर्वीच्या ऋषी-मुनींप्रमाणे संवाद साधून त्या आधारावरच त्यांनी संपूर्ण जगाला थक्क करणारे संशोधन सहजतेने केले, हे आपण सर्वांनी अनुभवले आहेच. प्रस्तुत पुस्तकात भारतात वेदकालापासून केल्या जाणाऱ्या शेतीचा आणि शेतीच्या पद्धतीचा आढावा अगदी परिश्रमपूर्वक घेतला आहे.
माझ्या मते माहितीची उपलब्धता हा समाजप्रबोधनाचा महत्वाचा घटक आहे, प्राचीन शेतीविषयक समाजजाणीव, सुसंगत,तपशीलवार माहिती समाजातील जिज्ञासू, विद्यार्थी, शिक्षक,संशोधक व अगदी सर्वसामान्य शेतकरी बंधूंना ह्या पुस्तकाद्वारे अत्यंत उपयोगी ठरणार आहे. प्राचीन शेतीविषयी इतकी सुसंगत, नावीन्यपूर्ण माहिती देणारे मराठी पुस्तक माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्यामुळे मराठी वैज्ञानिक साहित्यात ह्या पुस्तकाद्वारे मोलाची भर पडलेली आहे, असे मला खात्रीने वाटते.
‘हे पुस्तक म्हणजे संशोधनातून गवसलेला प्राचीन खजिना आहे.’
डॉ. प्रमोद प्र. मोघे