अप अगेन्स्ट डार्कनेस (मराठी) फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे

Share...

निसर्गतः प्राप्त झालेले सुखदायी आयुष्य सोडून दुर्बलांच्या, वंचितांच्या उत्थानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्ती म्हणजे जणू माणसांमधील देवदूतच. स्वार्थ बाजूला ठेवून समाजातील पीडितांच्या दुःखावर फुंकर घालणारी ही सामान्य माणसेच असामान्य कार्य करून दाखवतात. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणार्या ‘स्नेहालय’ संस्थेचे डॉ. गिरीश आणि प्राजक्ता कुलकर्णी हे अशाच व्यक्तीपैंकी एक. आपल्या कार्यातून समाजाला सकारात्मकतेच्या ‘प्रकाशवाटा’ दाखवणाऱ्या या दांपत्याची प्रेरणादायी आणि भावस्पर्शी कहाणी ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या मेघा देशमुख भास्करन लिखित पुस्तकात उलगडली आहे.

डॉ. गिरीश कुलकर्णी यांची पार्श्वभूमी विशद करून पुस्तकाची सुरुवात होते. गिरीश हे शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मदतीसाठी काम सुरू करतात, त्यावेळची एक घटना लेखिकेने नमूद केली आहे. ‘मदतच करायची असेल तर गिरीशने वृद्ध, दिव्यांग, अनाथ अशा कोणाला तरी करावी. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या भानगडीत नाक खुपसण्याची काय गरज’, अशा चर्चा त्यावेळी गावात सुरू होत्या. यावरून कामाच्या खडतरपणाची कल्पना येते. असंख्य अडीअडचणी असतानाही गिरीश यांचा निश्चय मात्र पक्का होता.

शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांचा विश्वास संपादन करणे, या संबंधातील कायद्यांचा अभ्यास करणे, स्त्रियांना मदत करण्यासाठी एकीकडे भांडवल उभे करणे, अशी कसरत त्यांना करावी लागत होती. या प्रवासात त्यांना त्यांच्या घरच्यांची साथ लाभली, मात्र गावातील इतर लोक, पोलीस, प्रशासन, शरीरविक्रयाच्या व्यवसायातील दलाल अशा असंख्य आघाड्यांवर त्यांना संघर्ष करावा लागला. या संघर्षाचे नेमके चित्रण लेखिकेने केले आहे.

शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांना सांभाळणे, त्यांना शिक्षण देणे, या व्यवसायात आलेल्या अल्पवयीन मुलींना सोडवणे, एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्णांना मदत करणे, असा ‘स्नेहालय’च्या कार्याचा पट पुस्तकाच्या पूर्वार्धात उलगडतो. एका ओसाड जमिनीवर श्रमदानातून उभ्या केलेल्या झोपडीपासून ते अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेल्या रुग्णालयापर्यंत संस्थेचा झालेला प्रवास आपल्यालाही भावतो. निःस्वार्थ भावनेने कार्य करत असलेल्या माणसांनाही वेळोवेळी विरोधाचा, दबावाचा सामना करावा लागतो, तसाच विरोध गिरीश आणि प्राजक्ता यांच्या वाट्यालाही आला. मात्र कठोर निश्चय आणि धैर्याच्या बळावर त्यांनी यावरही मात केली. ‘स्नेहालय’च्या कार्याचा हा पट उलगडताना संस्थेच्या कार्यामुळे आयुष्य बदललेल्यांच्या कथाही पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत. त्यातून समाजातील या उपेक्षित घटकांचे दारुण वास्तव समोर येते. कोणत्याही संवेदनशील माणसाला हेलावून टाकणाऱ्या या कहाण्या आहेत.

गिरीश कुलकर्णी यांच्या पत्नी प्राजक्ता यांनी ‘स्नेहाधार’ आणि ‘स्नेहांकुर’च्या माध्यमातून संस्थेच्या कार्याचा विस्तारलेला परीघही यातून समोर येतो. शरीरविक्रय करणाऱ्या महिला, त्यांची मुले किंवा एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्णांची मुले यांचे पुनर्वसन किती खडतर आणि आव्हानात्मक असू शकते, त्यासाठी मानसिक, भावनिक, सामाजिक आणि कायदेशीर अशा विविध पातळ्यांवर किती संघर्ष करावा लागतो, याची तपशीलवार कल्पना यासंबंधीच्या प्रकरणांमधून येते.

‘स्नेहालय’ या संस्थेचे कार्य असे पूर्णपणे शोषितांशी, उपेक्षितांशी संबंधित असले, तरी हे कार्य उलगडताना वाचकांवर नकारात्मकतेची छाया पसरत नाही, हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. गिरीश कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीसारखीच असंख्य अडचणींमधूनही वाट काढण्याची जिद्द पुस्तकात प्रत्येक ठिकाणी पेरलेली आहे.

मेधा भास्करन देशमुख यांनी ओघवत्या भाषेत हे शब्दचित्र रेखाटले असून सुनंदा अमरापूरकर यांनी त्याचा नेटका मराठी अनुवाद केला आहे. एड्सग्रस्त उपेक्षितांविषयी सहवेदना जागवणारे आणि सद्भवनेची प्रेरणा देणारे हे ‘अप अगेन्स्ट डार्कनेस फिटे अंधाराचे जमिनीवर जाळे’ हे पुस्तक प्रत्येक संवेदनशील माणसाने अवश्य वाचावे, असेच आहे.


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *