व्यवसाय छोटा असो की मोठा; तो टप्प्याटप्याने वाढत जातो. व्यवसायाची वाढ ही कधीच एका सरळ रेषेत होत नाही. ही वाढ वळणावळणाने होते. त्यालाच ‘ए’ कर्व्ह असंही म्हटलं जातं. व्यवसायाची सुरुवात झाल्यानंतर काही वर्षांत एक वेळ येते जेव्हा तुम्हाला टप्पा ओलांडावा लागतो. त्यानंतर दुसरा टप्पा, त्यानंतर तिसरा टप्पा असा हा प्रवास असतो. यात अडचणी येतात, चढ उतार येतात, खूप अनुभव मिळतो. त्या सगळ्यांचा विचार करून पुढचा टप्पा गाठायचा आणि तोही पार करायचा असतो.
काटदरे फुड्सचा प्रवासही असाच वळणावळणाचा, रोचक आणि थक्क करणारा आहे. १९५८ मध्ये छोट्या गावातल्या एका स्वयंपाक घरात या व्यवसायाची सुरुवात झाली. तीन पिढ्यांनी त्याला खतपाणी घातलं आणि आज ‘काटदरे’ हा ब्रँड तयार झाला आहे. गेल्या ६७ वर्षातल्या अनुभवाचं संचित म्हणजे हे पुस्तक. त्यामुळेच त्याला एक वेगळं महत्त्व आहे. अशा प्रकारचं अनुभवाचं डॉक्युमेंटेशन होणं हे नव्या पिढीतल्या वाचकांसाठी आणि विशेषतः उद्योजकांसाठी साठी मोलाचं ठरणार आहे.
एखादा ब्रँड कसा घडतो हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल. प्रत्येक वेळी फक्त यशच सांगायचं नसतं तर झालेल्या चुकाही सांगाव्या लागतात, सांगायच्या असतात. मागच्या लोकांनी केलेल्या या चुकांपासून पुढल्या पिढीतले लोक शिकतात आणि त्यांचं नुकसान टळतं. आपण चार गोष्टी सांगितल्या तर दुसऱ्यांकडूनही आणखी चार गोष्टी कळतात. त्यामुळे मोकळेपणाने अनुभव शेअर केले गेले पाहिजेत. ज्ञान दिल्याने वाढतं असं आपल्या संस्कृतीत सांगितलंय; ते निःसंशय खरं आहे.
या पुस्तकात काटदरे उद्योगाच्या प्रवासातला संघर्षाचा काळ, झालेल्या चुका, त्या चुकांपासून घेतलेले धडे आलेलं अपयश, कसोटीचा काळ याबद्दल विस्ताराने आणि अगदी मोकळेपणाने लिहिलं आहे. या मोकळेपणाचं अभिनंदन यासाठी की प्रत्येकाने त्याच त्याच चुका करायच्या नसतात. जुन्या चुका टाळून नव्या चुका करायला संधी द्यायची हा या पुस्तकात सांगितलेला मंत्र खूप महत्त्वाचा आहे.
चढ-उतार हा व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. कितीही कठीण काळ आला तरी आपल्या सचोटीचा मार्ग सोडायचा नाही. आडमार्गाने जायचं नाही. ग्राहकांच्या विश्वासाला तडा जावू द्यायचा नाही. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सोसण्याची तयारी ठेवायची. आव्हानांचं संधीत रूपांतर करत मार्गक्रमणा करणं हाच शाश्वत यशाचा मार्ग असतो, हे काटदरे फूडसने घेतलेल्या भरारीचं खरं गमक आहे. सध्याचा काळ हा शॉर्टकटचा आहे. सगळ्यांना कमी श्रमात, कमी वेळेत जास्त यश हवं आहे. जास्त पैसे हवे आहेत. अशा काळात हे पुस्तक नवी वाट दाखवणारं ठरेल.
काळानुसार बदलणं, नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं, नव्या सिस्टिम्स आणणं हे ज्या पद्धतीने काटदरे यांनी केलं ते उद्योग करणाऱ्या प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे. व्यवसायात यश मिळवायचं असेल तर काही गोष्ट आवश्यक असतात.
या प्रत्येक गोष्टीत काटदरे यांनी जे प्रयोग यशस्वी केले, राबवले, कामगारांचं परिवर्तन घडवलं त्यांच्या या अनुभवांमधून सगळ्यांना खूप काही-शिकण्यासारखं आहे. हे पुस्तक फक्त काटदरेंची प्रेरक कहाणी नाही तर ज्यांना उद्योगात यायचं आहे, जे उद्योग करत आहेत, ज्यांना मोठी झेप घ्यायची आहे, आव्हानांचं संधीत रूपांतर करायचं आहे अशा सगळ्यांना मार्गदर्शक ठरणारी ही एक रोमांचक यशोगाथा आहे.
उत्तम चमु, उत्तम माणसे
कार्य पद्धती
नव्या तंत्रज्ञानाचा वापर
अभिनव सेल्स/मार्केटिंग
पॅकेजिंग
ग्राहककेंद्री यंत्रणा
उद्योजकतेच्या प्रवासात उद्योजकाकडे अनुभवाची खूप मोठी शिदोरी जमा होते. या पुस्तकाच्या रूपाने काटदरे कुटुंबाने आपली शिदोरी सर्वांसाठी खुली केली आहे. त्यातलं काय घ्यायचं? किती घ्यायचं? आणि त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग करायचा हे प्रत्येकावर अवलंबून आहे.
मनःपूर्वक शुभेच्छा !
– डॉ. आनंद देशपांडे
संस्थापक, पर्सिस्टंट सिस्टिम्स आणि देआसरा फाउंडेशन