मारुती चितमपल्ली पुस्तके

मारुती चितमपल्ली लिखित पुस्तके…

Share...

वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. अशा दुष्काळाच्या काळात म्हातारी वानरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून जातात आणि काही क्षणांतच त्यांचे प्राण जातात. दुष्काळाच्या परिस्थितीत वानरांनी दाखविलेल्या या धर्यामागे ‘नवीन पिढीने तरी जगावे’ हा उद्देश असतो. एरवी भूक आणि तहानलाडू केवळ गोष्टीतच असतात असं आपण मानतो. पण प्रत्यक्षात प्राण्यांकडून ती कृतीत आणली जाते. माणसांसारखीच वानरेदेखील शेकोटी करतात. वानरांचा संपूर्ण कळप एकावर एक लाकडे रचून शेकोटी तयार करतो. न पेटलेल्या या शेकोटीभोवताली ते अर्धाएक तास बसतात आणि मग आपल्या मार्गाने निघून जातात. त्यांनी शेकोटी पेटवलीच नाही, तर मग त्यांना ऊब कशी काय मिळाली, हे जाणून घेतलं तेव्हा वानरे डोळ्यांनी त्या शेकोटीतील उष्णता शोषून घेतात, असं आदिवासींकडून कळलं. वानरे निघून गेल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या शेकोटीतील लाकडं तुम्ही जाळण्यासाठी आणली तर ती कधीच जळत नाहीत. ‘वानरांची लाकडे, चुलीला साकडे’ ही म्हण कदाचित यावरूनच पडली असावी. प्राण्यांचा अभ्यास करताना या गोष्टी मी कधी प्रत्यक्ष अनुभवल्या, तर काहींची माहिती गोळा केली. आणि ती या प्राणीकोशाच्या निमित्तानं छोटय़ा छोटय़ा प्रकरणांतून लोकांसमोर येणार आहे.

मुंगसाला पिलांसह रस्ता ओलांडायचा असेल तर घार आणि गरुडाची भीती असते. म्हणून आधी मुंगूस बाहेर येऊन डोकावतो आणि मग पिलांना कशा पद्धतीनं रस्ता ओलांडायचा याचे संकेत देतो. त्या पिलांची आई त्यांना शेपटी पकडायला लावते आणि मग इतर पिल्लं एकमेकांची शेपटी पकडून रस्ता ओलांडतात. अशा पद्धतीनं रस्ता ओलांडला तर हा कुणीतरी वेगळा आणि विचित्र प्राणी असल्याचा समज घार आणि गरुडाचा होतो. त्यामुळे ते त्यांच्या वाटय़ाला जात नाहीत आणि मुंगूस त्याच्या पिलांसह सुरक्षितपणे रस्ता ओलांडून पलीकडे जातात.

‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? उंदरांच्या नावाच्या शोधार्थ एकदा पारध्यांच्या वस्तीत गेला होतो. त्या ठिकाणी मला एक उंदरांसंबंधी तज्ज्ञ व्यक्ती भेटली. त्या माणसाने रात्री एक वाजता मला पाडय़ावर बोलावलं. अनुभव घ्यायचा असेल तर धोका पत्करावाच लागतो असे म्हणून मी निघालो. त्याच्याकडे एक करंडी होती. ती करंडी डोक्यावर घेऊन तो एक किलोमीटपर्यंत चालत गेला आणि रस्त्यातच त्याने करंडी उघडली. त्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल शंभर उंदीर होते. करंडी उघडल्याबरोबर उंदीर त्यातून बाहेर पडले आणि जवळच्याच एका शेतात गेले. अर्ध्या तासाने ते उंदीर परत आले तेव्हा त्या प्रत्येकाच्या तोंडात एक-एक कणीस होतं. पारध्याने त्या कणसांमधले दाणे काढले आणि उर्वरित कचरा जाळून पुरावा नष्टही करून टाकला. त्या पारध्याने उंदरांना कणसाची चोरी करण्यास शिकवलं होतं. या उंदरांच्या बिळापाशी रानकोंबडीचे अंडे होते. तेवढे मोठे अंडे या उंदरांनी बिळापर्यंत ओढत आणलं. मेळघाटातले उंदीरही फार हुशार! अर्ध्या एकरात त्यांची बिळे आढळतात. त्या प्रत्येक बिळात दगडाचा एक पिलर उंदराच्या उंचीएवढा असतो. बिळातून बाहेर आल्यावर उंदीर त्या पिलरच्या आडून शत्रूपक्षी आहे का, हे पाहतो. शत्रूपक्षी असेल तर तो बिळात जातो आणि नसेल तरच तो बाहेर पडतो. ही सर्व माझी निरीक्षणे आहेत. ती मी प्रत्यक्ष अनुभवली आहेत.

मोराला पिसारा असतो. पण जंगलातल्या काही मोरांना पिसारा नसतो. त्याला ‘मुकना मोर’ म्हणतात. मोरनाचीमध्ये या मुकन्या मोराला प्रवेश नसतो. हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले. हा बदल म्हणजे जंगलात हस्तिदंताशिवाय काही हत्ती जन्माला येऊ लागले. जंगलातल्या हत्तींच्या कळपात एखादा तरी ‘मुकना हत्ती’ असतो आणि त्याला मादीसोबत समागम करण्याची परवानगी नसते. हत्तींच्या बाबतीत आणखी एक गोष्ट म्हणजे हत्ती म्हातारा झाला की हत्तींचा कळप म्हाताऱ्या हत्तीने त्यांच्यासोबत येऊ नये असं ठरवतो. अशा वेळी तो म्हातारा हत्ती नदीच्या काठाजवळ असलेल्या डोहात जलसमाधी तरी घेतो किंवा उंचावरून उडी मारून मृत्यू पत्करतो. तर काही ठिकाणी नदीला पूर येईपर्यंत तो तिथे राहतो. हत्तीचं शव तुम्हाला कधी जंगलात दिसणार नाही. आणि चुकून राहिलंच तर सर्व हत्ती मिळून त्या हत्तीच्या मृतदेहाला डोहात नेऊन टाकतात. सर्वसामान्यांकरिता ही माहिती अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे; परंतु या ऐकीव कथा नाहीत, तर ही जंगलातील प्राण्यांबाबत वस्तुस्थिती आहे. प्राणीकोशासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यास-दौऱ्यांत हे अनुभवायला मिळालं. ‘मुकना’ हा शब्दही त्यातूनच कळला. हत्तींच्या कळपाचं नियंत्रण हत्तीण करते. कळपातले इतर तिच्या मागे चालतात. काळविटांच्या कळपाचं नियंत्रणसुद्धा मादी काळवीटच करते. कोणत्या बाजूला वळायचं याचा इशारा ती कानाने देते. कानाची पाळ ती उजवीकडे, डावीकडे, समोर, मागे वळवते आणि त्यानुसार संपूर्ण कळप तिच्या मागे जातो. आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. मादी कोकिळेला गाताच येत नाही. हेही बऱ्याचजणांना माहिती नाही. लता मंगेशकर यांना आपण ‘गानकोकिळे’ची उपाधी देतो, ते चुकीचं आहे.

— मारुती चितमपल्ली, 

शब्दांकन : श्री सुरेंद्र बा. जळगांवकर 

मारुती चितमपल्ली यांची एकूण:१४ पुस्तके 

  • निळावंती  :१४०₹
  • नवेगावबांधचे दिवस:३००₹
  • पक्षी जाय दिगंतरा :१८०₹
  • चैत्र पालवी :१५०₹
  • केशराचा पाऊस:३००₹
  • शब्दाचं धन :२२०₹
  • रानवाटा :२५०₹
  • रातवा : १८०₹
  • निसर्गवाचन: २५०₹
  • घरट्या पलीकडे:१५०₹
  • पाखरमाया:१८०₹
  • जंगलाची दुनिया: ६०₹
  • जंगलाचे देणे:२५०₹
  • सुवर्ण गरुड:१६०₹
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *