‘सेमीकंडक्टर्स’ हे आजच्या सर्वप्रकारच्या तंत्रज्ञानाचा पाया आहेत. आपलं दैनंदिन जीवन सुखकारक करणाऱ्या सेमीकंडक्टर मायक्रोचिप, एलईडी, लेझर, निरनिराळे डिटेक्टर्स, ॲक्च्युएटर्स अशा अनेक वस्तू ‘सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी’ वापरून बनवल्या जातात. अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीत सुरू झालेला हा ‘सेमीकंडक्टर उद्योग’ बघता बघता जगभर पसरला. आज एखादी सेमीकंडक्टर मायक्रोचिप बनवायची असेल तर त्यात जवळपास पंचवीस देश सामील असतात. त्यामुळे कोणत्याही एका देशाला ‘सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी’वर वर्चस्व मिळवणं सहजसाध्य नाही. तरीही जगातले सगळे प्रमुख देश ‘सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी’मध्ये स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहेत कारण जगावर राज्य करण्याची ही एक गुरुकिल्ली आहे.
सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा शोध कसा लागला? निरनिराळे देश यात कसे सामील झाले? इंटेल, ॲपल, हुवावे, सॅमसंग यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांबरोबरच ‘आर्म’ सारख्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपनीची स्थापना कशी झाली? याची रोचक कहाणी डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘मिशन सेमीकंडक्टर्स’ या पुस्तकात वाचायला मिळते.
या कहाणीत अनेक रोचक नाट्ये भरलेली आहेत. संशोधकांमधल्या इर्षा, कंपन्यांमधली चढाओढ, देशा-देशांमधलं राजकारण आणि सेमीकंडक्टर्सवरून जगात नव्यानं सुरू झालेलं शीतयुद्ध या सगळ्याविषयी वाचताना एखादी ‘वेब सिरीज’ बघण्याचा अनुभव येतो. प्रत्येक प्रकरण संपताना पुढे काय होणार? याची उत्सुकता सतत वाटत राहते, हे या पुस्तकाचे यश आहे.
सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी सारख्या एका क्लिष्ट विषयावर कुणालाही कळेल इतक्या सहज सोप्या भाषेत परिपूर्ण पुस्तक लिहिल्याबद्दल मी डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांचे अभिनंदन करतो. मराठी वाचक ‘मिशन सेमीकंडक्टर्स’चे जोरदार स्वागत करतील याची मला खात्री आहे.
– डॉ. दिनेश अंमळनेरकर
फॉर्मर डिरेक्टर जनरल, सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पुणे, हैद्राबाद, त्रिचू
लेखिका :: डॉ. माधवी ठाकूरदेसाई
पृष्ठ : २३५
मूल्य : ₹२९९