लेखिका मारिया रेसा १९२१ सालच्या शांतता नोबेल पारितोषिकाच्या मानकरी आहेत. पत्रकारीतल्या कामगिरीसाठी त्यांना नोबेल देण्यात आलंय.
मारिया रेसा जन्मानं फिलिपिनो आहेत, त्यांची वाढ आणि आणि शिक्षण अमेरिकेत झालंय. सध्या त्या अमेरिका आणि फिलिपिन्स या दोन्ही ठिकाणी जाऊन येऊन असतात. फिलिपिन्समधे त्या खटले आणि खुनाच्या धमक्यांना तोंड देत असतात.
प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या तीन धड्यांत लेखिकेनं जन्मापासून पत्रकारीची सुरवात करेपर्यंतची हकीकत मांडली आहे. चौथ्या धड्यापासून त्यांनी केलेली पत्रकारी कामगिरी सुरू होते. तेही एका परीनं लेखिकेचं आत्मकथनच आहे. पुस्तकात सर्वात शेवटी लोकशाही वाचवणं, हुकूमशाहीशी सामना करणं हा जाहिरनामा आहे.
हुकूमशाहीशी सामना करायचा किंवा लोकशाही वाचवायची यासाठी काय करावं हे लेखिकेनं केलेली कामगिरी सांगतं,ते स्वतंत्रपणे सांगण्याची आवश्यकता नाही.
मारिया रेसांनी बातमीदारी केली, वाहिन्यांवर बातम्या सांगितल्या, अमेरिकेतल्या वॉल स्ट्रीट जर्नलसाठी बातमीपत्रं लिहिली.मुख्यतः फिलिपिन्स, इंडोनेशिया आणि सिंगापूर या ठिकाणी त्यांनी बातम्या गोळा केल्या. १९८७ साली रेसा यांची कारकीर्द सुरू झाली. नऊ अकराच्या घटनेतल्या दहशतवाद्यांचं महत्वाचं केंद्र फिलिपिन्स होतं. या दहशतवादी नेटवर्कचा तपास रेसा यांनी लावला. इंडोनेशियात झालेल्या रक्तरंजीत उलथापालथीच्या त्या साक्षीदार होत्या. फिलिपिन्समधे हुकूमशाही, लोकशाही, हुकूमशाही अशा उलथापालथी होत होत्या. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत रेसा यानी बातम्या दिल्या.
सीएनएनमधे रेसा काम करत; सीएनएनचं धोरण सीएनएन ठरवणार, रेसा यांनी त्याचा अमल करायचा. त्या कंटाळल्या. आपलं आपण काय करायचं ते ठरवायचं आणि अमलात आणायचं असं ठरवून त्यांनी २००५ साली रॅपलर ही ऑन लाईन बातम्या गोळा करणारी संस्था उभी केली. जागाजोगी घडणाऱ्या घटना बातमीदार पाठवत, रॅपलर त्या संपादित करून फेसबुक, युट्यूबवर टाकत असे. नागरी प्रश्न, रस्त्यावरची गुन्हेगारी, लोकांचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न, सरकारी-सार्वजनिक कारभार, नैसर्गिक दुर्घटना अशा अनेको मुद्द्यांवर रेसा बातम्या प्रसिद्ध करत असत.
फिलिपिन्सचे प्रेसिडेंट ड्युटेर्टे या धटिंगणाशी कसा सामना करावा लागला याचं सोदाहरण कथन प्रस्तुत पुस्तकात आहे. ड्युटेर्टे यांनी फेसबुक आणि इंटरनेटचा वापर करून अत्यंत खोटी आणि विषारी माहिती लोकांमधे पसरवली. फेसबुकचा कुशलतेनं आणि व्यासायिक वापर करून त्यांनी फेसबुकवर गट तयार केले. फेसबुवरचे मेसेजेस आणि त्यावरच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून आपल्या बाजूचे कोण आणि बाजूला नसलेले कोण याचा अभ्यास ड्युटेर्टेंच्या फेसबुक गटानं केला. बाजूच्या लोकांना भक्त केलं; त्यांना पटवलं की विरोधक दुष्ट आहेत; विरोधकांना बदनाम करणारी माहिती त्यांना पुरवण्यात आली. भक्तानी पूर्ण सायबर जग व्यापून टाकलं. विरोधक दुष्ट आहेत हे पटवल्यावर त्यांना जखमी करा, ठार मारा, त्यांना धडकी भरेल असे उद्योग करा असे संदेश फेसबुकवरून दिले गेले.
भक्तांना नोकऱ्या, पैसे, सवलती दिल्या. त्यासाठी सरकारी पैसे वापरले गेले.
विरोधकांवर खटले, पोलिसंच्या नोटिसा, अटका, नोकरीतून काढून टाकणं, त्यांचे आर्थिक व्यवहार बंद पाडणं.
विरोधकांवर गुन्ह्यांची बनावट लेबलं लाऊन त्यांना मारून टाकणं.
फिलिपिन्समधे ड्रगची समस्या होती. बेरोजगारी आणि आर्थिक संकट हे ड्रगचं मुख्य कारण होतं. ड्युटेर्टेनी आर्थिक प्रश्नात लक्ष घातलं नाही, ड्रगवाले हे शत्रू केले आणि त्यांना खतम करणं अशी राष्ट्रीय मोहीम सुरू केली. नको असलेली माणसं ड्रगवाली ठरवून मारायची हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट होतं. दररोज बारा पंधरा माणसं मारली जात होती. ना कोर्ट, ना सुनावणी.
रेसा यांच्या वेब पेपरनं ड्युटेर्टेनं फेसबुकचा वापर कसा केला याचा पद्धतशीर अभ्यास केला. भक्त लोक कसे गोळा केले, खोटे मजकूर कसे पसरवले, द्वेष कसा पसरवला याचा अभ्यास केला.
फेसबुकवर खोटे अकाऊंट तयार करत. या अकाऊंटचा खोटेपणा कायद्याला सिद्ध करता येणार नाही अशी व्यवस्था करत. सरकारचं या खोट्या माहितीकडं दुर्लक्ष असे, फिलिपिन्समधे इंटरनेट व्यवस्था बेबंद होती.या खोट्या अकाऊंटवरून खोटी माहिती पसरवली. या पोस्ट्स, मेसेजसना करोडो लाईक्स देऊन त्या मेसेजेसचं महत्व वाढवलं गेलं. डोनल्ड ट्रंप याना २०१६ ची निवडणूक जिंकायला फिलिपिन्समधल्याच फेसबुक गटांनी मदत केली.
फेसबुकचा गैरवापर रेसा यांनी झुकरबर्ग यांच्यासमोर पुराव्यासह ठेवला. झुकरबर्गनी काहीही केलं नाही. कारण झुकरबर्ग आणि सरकारं यांच्यात हातमिळवणी असे.
ड्युटेर्टो यांना रेसा नकोशा होत्या. ड्युटेर्टो यांनी रेसा याना मारण्याचा प्रयत्न केला, नाना प्रकारचे छळ केला.
बातम्या देताना सामोरं जायला लागलेल्या दोन घटनांचा उल्लेख रेसा करतात. दोन्ही घटना जाकार्तातल्या आहेत. एक मैदान. काही तरूण टगे. पार्टी चालली होती. डोक्याला गुंडाळलेल्या कापडांवर ते कोणत्या पंथाचे आहेत ते लिहिलं-चितारलेलं होतं. मस्तीत होते. त्यांनी आठ माणसांची मुंडकी उडवली. उन्मादात नाचत होते.
दुसरी घटनाही एका मैदानातलीच. तरूण मुलं फूटबॉल खेळत होती. बॉलच्या जागी एका माणसाचं रक्तबंबाळ मुंडकं होतं.
आज त्यांच्यावर फिलिपिन्स सरकारनं अनेक खटले भरलेत. त्यांना कितीही तुरुंगवास आणि करोडोंचा दंड होऊ शकतो.सर्व खटले बनावट आरोपांखाली आहेत. फेसबुकवर त्यांना आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला बातमीदारांना अत्यंत घाणेरड्या रीतीनं ट्रोल केलं जातं. वेळोवेळी त्यांचा खून करा असे संदेश फेसबुकवरून पसरवले जातात.
रेसांनी फिलिपिन्समधे स्वतःसाठी आणि सहकाऱ्यांसाठी व्यावसायिक सेक्युरिटीची व्यवस्था केली आहे.
रेसा अजूनही टिकून आहेत. रेसा बुलेटप्रूफ जॅकेट घालून घराबाहेर पडतात.
https://www.niludamle.com/पुस्तकं-जिवाची-किंमत-मोज/