Air-Borne

Share...

कोविडची साथ सुरु झाली तेव्हां जागतीक आरोग्य संघटना विषाणू हवेतून पसरतो हे कबूल करायला तयार नव्हती. हात स्वच्छ ठेवा, शारीरीक स्पर्ष टाळा, अंतर ठेवा असा सल्ला संघटना देत होती. साथीच्या रोगाचे अभ्यासकही हवास्वार जंतू रोग पसरतात हे मान्य करायला तयार नव्हते.

वर्षभरानंतर स्थिती बदलली. संघटनेनं हवास्वार जंतूंचा सिद्धांत मान्य केला आणि तोंडावर मास्क लावायच्या सूचना दिल्या. खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, बोलतांनाही काळजी घ्या कारण तोंडातून बाहेर पडणारे कण रोग पसरवतात असं संघटनेनं सांगायला सुरवात केली.

कार्ल झिमर या पत्रकार लेखकानं लिहिलेल्या प्रस्तुत पुस्तकात आरोग्य संघटनेच्या समजुतीत फरक कां पडला याचं विवेचन केलं आहे.

रोगांचा धावता इतिहास पुस्तकात आहे. सुरवातीला रोग दूषित हवेमुळं होत असत असं मानलं जात असे. दूषित हवा म्हणजे दुर्गंधी. ही झाली इसवी सनापूर्वीची गोष्ट. सतराव्या शतकात ल्यूएनहॉकनं केलेल्या प्रयोगानंतर सूक्ष्म जंतूंमुळं रोग होतात हे सिद्ध झालं, मान्य झालं. जंतू रोग पसरवतात, पाण्यातून, स्पर्षातून, पदार्थातून. पण हवेतून जंतू पसरू शकत नाहीत असं साथीचे रोगवाले म्हणत.

वेल्स पतीपत्नीनी १९४० मधे प्रयोग करून जंतू सूक्ष्म आकारात हवेत पसरतात हे सिद्ध केलं. आज आपण ज्याला एरोसोल म्हणतो ते २.५ मायक्रॉनपेक्षा लहान आकाराचे जंतू त्यांना हवेत सापडले. अतीनील किरणांचा वापर करून ते जंतू मारता येतात याचाही अभ्यास त्यांनी मांडला. पण तो अभ्यास एका मर्यादेपर्यंत थांबला. किती मात्रेत, किती तीव्र किरण सोडले तर किती वेळानं जंतू मरतात इतका तपशीलवार अभ्यास वेल्स पतीपत्नीना जमला नाही. विषाणूंचे प्रकारही त्यांना निश्चित करता आले नाहीत.

कोविडच्या काळातली अमेरिकेतली एक घटना. वॉशिंग्टन राज्यात वादक आणि गायकांचं रियाझ सत्र व्हायचं होतं. वर्षातून अनेक वेळा शेकडो हौशी गायक वादक त्या ठिकाणी जमत असत. कोविडच्या काळात सत्र घ्यायचं की नाही यावर विचार झाला. जाआसंच्या सल्ल्यानुसार लोकांनी सॅनिटायझरनं हात आणि वाद्य निर्जंतूक केली. वादक गायक एकमेपासून अंतरावर बसले. अडीच तासाची तालीम झाली. ६० जणं होते.

तीन आठवड्यानंतर कळलं की ६० पैकी ४५ जणांना कोविडची लक्षणं झाली; तिघाना हॉस्पिटलात जावं लागलं, दोघं मेले.

बोंब झाली. लोकांनी किती काळजी घेतली होती. खुर्च्या उघडून ठेवताना, कार्यक्रम झाल्यावर घडी घालून ठेवताना, संगिताची नोटेशन्स उघडून वाचताना, सर्वांनी सॅनिटायझर वापरला होता. कोणीही शेक हॅंड केलं नव्हतं. इतकी काळजी घेऊनही कोविड कसा झाला?

अमेरिकेतल्या वैद्यकीय युनिव्हर्सिटीतले लोक कामाला लागले. कसून तपासण्या केल्या. वेल्स दांपत्यानं केलेले अभ्यास उघडले गेले. एरोसोल्सचं अस्तित्व लक्षात आलं. खोकण्यातून, शिंकण्यातून, जोरात बोलण्यातून, जोरात श्वासोच्छ्वास करण्यातून अगदी सूक्ष्म जंतू हवेत जातात, हवेत तरंगत रहातात. वातावरण जसं असेल त्यानुसार ते काही अंतर प्रवास करतात. तीनेक तास ते जिवंत राहू शकतात आणि श्वासावाटे लोकांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. हे सिद्ध झालं.

हे सिद्ध होणं, ते मान्य होणं, ते सरकारांनी आणि समाजानं मान्य करणं यात वेळ गेला. पण अगदी काल परवापर्यंत अनेक समाज, अनेक सरकारं ते मान्य करायला तयार नव्हती. त्यामुळंच लॉक डाऊनचा बखेडा झाला. वैज्ञानिक जागरूकता, वैज्ञानिक साक्षरता भरपूर असलेल्या ब्रिटीश समाजानंही लॉक डाऊन करायला नकार दिला. हात साफ ठेवा, शेक हँड करू नका, बस झालं असं ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन म्हणत. अंतर ठेवा ही सूचना अमान्य करत त्यांनी बैठका घेतल्या, चर्चासत्रं घेतली येवढंच नव्हे तर पार्ट्याही केल्या. एका पार्टीत मंडळी छान दारुबिरू पिऊन नाचले. लॉक डाऊन ही बकवास आहे असं पंतप्रधान बेकर जाहीरपणे बोलत. 

बेकर यांच्या पार्टीत, बैठकीत सामिल एक स्त्री कोविड होऊन वारली. तरीही बेकर यांनी लॉकडाऊनची भूमिका सोडली नाही.

कार्ल झिमर यांनी प्रस्तुत पुस्तकात एरोबायॉलॉजी या विषयाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. विषाणू प्रसाराची तपशीलवार माहिती आणि झालेले अभ्यास प्रस्तुत पुस्तकात लेखकानं मांडले आहेत.

आजही लॉकडाऊनला विरोध करणारी माणसं आहेत. त्यांना आर्थिक मुद्दा महत्वाचा वाटतो. काम बंद झाल्यानं अर्थव्यवहार थांबतात, ते परवणारं नाही असं त्यांचं मत आहे. काही लोक असाही सिद्धांत मांडतात की लोकांना एकमेकाला भेटू द्यावं, आपोआप विषाणू पसरण्याच्या खटाटोपात कमकुवत होईल आणि नाहिसा होईल. अमेरिकेचे सध्याचे आरोग्य मंत्री केनेडीही याच सिद्धांताचे समर्थक आहेत. (ते वैज्ञानिक नाहीत की डॉक्टर नाहीत) रोग आपोआप आटोक्यात येणार असल्यानं लसही टोचण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं आहे.

काही मुद्दे लेखकाच्या विवेचनातून स्पष्ट होतात. कधी मर्यादित ज्ञानाच्या आधारे किंवा अनुभवाच्या आधारे समजुती तयार होतात. नवं वैज्ञानिक ज्ञान उपलब्ध झालं तरी समाज आपल्या जुन्या समजुती सोडायला तयार नसतो. पण समज येते तोवर खूप उशीर झालेला असतो. कोविडबाबतचे गैरसमज होऊन तो आटोक्यात येईपर्यंत झालेल्या समजुतीच्या घोटाळ्यामुळं लाखोंचा जीव गेला, आर्थिक नुकसानीचं तर विचारूच नका.

लेखक न्यू यॉर्क टाईम्स या दैनिकातले विज्ञान पत्रकार आहे. त्यांची १५ विज्ञान विषयक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. पत्रकार असल्यामुळं माहिती मांडण्याचं कौशल्य त्यांच्याकडं आहे. प्रस्तुत पुस्तक कधी कधी आपण साहित्य वाचतोय असं वाटावं इतकं वाचनीय झालंय.


Share...
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *