साम्राज्यं निर्माण होतात, विलयाला जातात. रोमन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य अशी किती तरी उदाहरणं घेता येतील. भारताच्या हिशोबात इसवी सनामागं साताठ शतकापासून ते थेट इसवी १९४७ पर्यंतच्या काळात पाच पन्नास लहान मोठी साम्राज्य जन्मली आणि मेली. भारतातलं शेवटचं (कथित)साम्राज्य, ब्रिटीश साम्राज्य.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची राजकीय मांडणी विस्कटली. सुरवात ब्रिटीश साम्राज्य मोडण्यापासून झाली. सर्वात शेवटी मोडलं ते सोवियेत रशियन साम्राज्य. दणादण देश साम्राज्याच्या बाहेर पडले.
सोवियेत युनियनचं साम्राज्य वैचारिक साम्राज्य होतं, कम्युनिष्ट साम्राज्य होतं. ते १९९० मधे मोडलं. आता ते साम्राज्य सांस्कृतीक हिशोबात पुन्हा उभारण्याची खटपट पुतीन करत आहेत. क्रायमिया, जॉर्जिया हे रशियन प्रदेशच आहेत असं म्हणत रशियानं ते स्वतंत्र देश गिळले. आता युक्रेन हाही रशियाचाच भाग होता असं म्हणून तो पुन्हा काबीज करण्याच्या प्रयत्नात पुतीन आहेत.
ब्रिटिशांनी गंमत केली. जगभर परलेल्या भूप्रदेशांवरची मालकी सोडली पण छोटछोट्या बेटांचे सुमारे १४ प्रदेश या ना त्या स्वरूपात आपल्या प्रभावाखाली ठेवले. हे ब्रिटिशांचं एकविसाव्या शतकातलं साम्राज्य. माल नव्हे, पैशाच्या उलाढाली हे या साम्राज्याचं वैशिष्ट्य.
युकेच्या किनाऱ्यापासून चाळीसेक मैलांच्या अंतरावर केमन बेटं आहेत. ही बेटं म्हटलं तर स्वतंत्र आहेत. तिथं एक पार्लमेंट आहे, एक सरकार आहे. पण या बेटांच्या रक्षणाची जबाबदारी युकेवर आहे. बेटाचा कारभारी युके निवडतं. बेटाच्या कारभाराचं स्वरूप युकेनं ठरवलंय आणि युकेतली माणसं कधी लंडनमधे बसून तर कधी तिथं जाऊन कारभार करतात, सल्लामसलत करतात.
युकेच्या किनाऱ्यापासन ४१०० मैलावर ‘व्हर्जिन आयलंडस’ हा बेटसमूह प्रदेश आहे. डच, पोर्तुगीझ,फ्रेंच इत्यादी स्पर्धकांशी लढून हा प्रदेश ब्रिटननं मिळवला. आता ही बेटं एक स्वतंत्र देश असल्यागत आहे. तिथं संसद आहे, एक राजा आहे. हा राजा कोण असेल ते युकेचं पार्लमेंट ठरवतं. युकेचं नौदल या बेटांचं संरक्षण करतं. या बेटांच्या अर्थव्यवस्थेचं डिझाईन ब्रिटननं तयार केलं आहे. ब्रिटीश माणसं तिथं जाऊन येऊन असतात, लंडनमधे राहून ब्रिटीश माणसं या बेटांचं आर्थिक डिझाईन अमलात आणतात.
युकेच्या किनाऱ्या पल्याडच्या साम्राज्यात, अंतरावर असलेल्या प्रदेशातल्या कारभाराचा आणि अर्थव्यवस्थेचा पॅटर्न साधारणपणे वरील बेटसमूहांसारखाच आहे.
या प्रदेशात काय चालतं?
जगभरातल्या देशांमधे अनेक धनवान माणसाना त्यांचे पैसे देशाबाहेर पाठवायचे असतात. अनेक कारणांसाठी. त्या त्या देशातले कर त्यांना जाचक वाटत असतात. मुळात त्यांना कर भरायला नको असतात, नफा येवढंच त्यांचं ध्येय असतं. कर चुकवण्यासाठी ते पैसे देशाबाहेर कुठं तरी गुंतवू पहातात. पैसे या बेटावर निनावी पोचतात. ते पैसे जगात कुठं तरी निनावी गुंतवले जातात. उद्योगातून मिळणारं उत्पन्न पुन्हा बेटावर निनावी येतं. धनवान माणसांकडं प्रचंड निनावी पैसा तयार होतो. निनावी उद्योग करण्यासाठी हा पैसा उपयोगी पडतो.
महाराष्ट्रातले खोके पती. खोक्यातले पैसे निनावी. उत्तर कोरियाचा किवा रशियाचा हुकूमशहा. त्यांचे पैसे निनावी.त्यांना ही बेटं उपयोगी पडतात. ही बेटं युकेनं जपली आहेत.
व्हर्जिन आयलंडमध्ये हेज फंड आहेत. कमीत कमी धोके पत्करून केलेली पैशाची बँकिंग व्यवस्था. सामान्य माणसाच्या समजुतीच्या कायच्याकाय पलिकडं असणारी साधनं, तरतुदी, व्यवस्था फायनान्सवाल्यांनी तयार केल्या आहेत. पैसा कुठून आला, कुठे गेला, त्यात गुंतलेली माणसं आणि संस्था यांचा पत्ता लागणार नाही अशा रीतीनं पैसा फिरवण्याची तंत्रं हुशार लोकांनी तयार केलीत. चार्टर्ड अकाउंटंट, वकील आणि कंप्यूटर तज्ञ अशा तिघांची टोळी हा उद्योग करते. हेज फंडमधे पैसे येतात,ते नाना ठिकाणी गुंतवले जातात, तिथून मिळणारा नफा फंडाकडं येतो आणि परत गुंतवणाऱ्याकडं जातो.
शेल कंपन्या असतात. व्हर्जिनमधे इंटरनॅशनल बिझनेस कंपनी (आयबीसी) आहे. शेल कंपनी म्हणजे एक धर्मशाळा असते. कर चुकवून, देशांचे कायदे चुकवून उद्योग करणारे वाटसरू या धर्मशाळेत उतरतात. धर्मशाळा त्यांना अगदीच नाममात्र शुल्क आकारून मुक्कामाला परवानगी देते. या मुक्कामात तुम्ही काहीही करा, धर्मशाळा तुम्हाला विचारत नाही. तशी ही शेल कंपनी. कंपनी फटाफट तयार होते. कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत.
या उद्योगातून मिळणारा पैसे पुन्हा धर्मशाळेत परत येतो. हा व्यवहार जगाच्या कोणत्याही कायद्यात अडकणारा नसल्यानं तुम्ही बेड्या आणि गज यापासून मुक्त असता. हे व्यवहार इतक्या कौशल्यानं होतात की कोणालाही कोणाचंही नाव वा पत्ता कळत नाही.
कंपनीतून तुम्ही जगात कुठंही पैसे गुंतवू शकता, घरं घेऊ शकता, कारखान्यात पैसे गुंतवू शकता. निवडणुकीत वाटायला हे पैसे उपयोगी पडतात. खाजगी सेना पोसण्यासाठी, त्या सेनेसाठी शस्त्र विकत घ्यायला हा पैसा उपयोगी पडू शकतो.आयबीसीनं लाखो कंपन्या रजिस्टर केल्या आहेत.
जगभरात अशा पद्धतीनं होणाऱ्या किनाऱ्या पलिकडच्या व्यवहाराची किंमत गेल्या वर्षी सुमारे १० ट्रिलियन डॉलर असावी. भारताचं वार्षिक उत्पादन सुमारे ३.२ ट्रिलियन डॉलर आहे. या उलाढालीतली अर्धी उलाढाल व्हर्जिनी प्रदेशांत होते.
या उद्योगांचं केंद्र लंडनमधील फायनान्स गल्ल्या आहेत. तीन चार गल्ल्या, त्यातल्या पाच पन्नास इमारतीत बसलेले लोक हा उद्योग चालवतात. लंडनमधे एक समांतर बँकिंग व्यवस्थाही आहे. वरील प्रदेश आणि खुद्द युकेमधे युरोडॉलर अकाऊंट उघडण्याची सोय करण्यात आलीय. तिथं गुंतवणुकीवर बऱ्यापैकी परतावा मिळतो,निदान अमेरिकेत जेवढा परतावा बँका देतात त्यापेक्षा जास्त परतावा या बँकांमधे मिळतो. बहुदा हा परतावाही लवचीक असतो. पैसे ठेवणारे लोक कोण आहेत, किती पैसे आहेत, कुठल्या देशातून पैसे आलेत यावर परताव्याचा दर अवलंबून असतो.
तुम्ही विचाराल की या उद्योगातून युकेला काय मिळतं?
तुमचा प्रश्न योग्य आहे.
या कामी खूप माणसं कामाला लागलेली असतात. बॅरिस्टर लोक आणि अकाऊंटंट कंपन्या यात गुंतलेल्या असतात. जजला मिळणाऱ्या पैशाच्या किती तरी पट पैसा या उद्योगात मिळत असल्यानं चांगले चांगले बॅरिस्टर न्यायव्यवस्थेत न जाता या उद्योगात जातात. न्यायव्यवस्थाही त्यामुळं बिघडलेली आहे. मुळात कायदेही या वकील-पुढारी टोळीनं असे करून ठेवलेत की न्यायालयाला काही करता येत नाही किवा काणाडोळा करायची सोय असते. हज्जारो लोकांना इतकं चांगलं उत्पन्न मिळतं. एकेकाळी ब्रीटनमधले लोक ईस्ट इंडिया कंपनीतली अगदी सामान्य नोकरीही घेत कारण कंपनीत अमाप पैसा करता येत असे.
किनाऱ्या पलिकडच्या साम्राज्याची राजधानी लंडन आहे. खुद्द युकेमधले नागरीकच त्यांच्याच देशाला टांग मारून व्हर्जिनमधे पैसे ठेवतात. हे पैसे सुमारे ६०० अब्ज पाऊंड इतके आहेत असा एक अंदाज आहे. म्हणजे खुद्द ब्रिटिशांचाच फायदा झाला की.
गुळाचा व्यापार करणारी आडत लंडनमधे आहे म्हटल्यावर मुंगळेही लंडनमधेच येणार ना? इग्लंडमधे रशियन, चिनी, अरब लोक पोचलेत. भारत स्वतंत्र झाल्यावर दुभती गरीब गाय गेली. साम्राज्य गेल्यावर ब्रीटनची आर्थिक परिस्थिती खालावली. या अर्थव्यवस्थेला रशियन, चिनी, सौदी, कतारी इत्यादी लोक टेकू लावतात. इंग्लंडमधले मोठाले क्लब, हॉटेलं, मैदानं, स्टेडियम या लोकांनी विकत घेतलीत. दोन वर्षांपूर्वी एक रेलवे स्टेशन एका रशियन माणसानं विकत घेतलं. अशी स्थिती युकेवर येण्याची शक्यता आहे की लोकांनी गुंतवलेल्या पैशावरच तो देश चालेल.
साम्राज्याच्या जिवावर ब्रिटनमधे भव्य इमारती, म्युझियम, चर्चेस, पूल, पार्लमेंट इत्यादी उभं राहिलं. आता स्थिती अशी आलीय की त्या गतवैभवाचा उपयोग पर्यटन स्थळं म्हणून करावा लागतोय.
बल्लो नावाचा एक लेखक आहे. तो म्हणतो की युके हा जगभरच्या उद्योगींचा,दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचा बटलर झालाय.
बटलर काय करतो? तो धन्याचं घर चालवतो. धन्याच्या गरजा भागवतो. घराची रंगरंगोटी करतो, बाग नीट ठेवतो, तळघरात मद्य भरपूर आहे की नाही ते पहातो, धनी खुष राहील याची व्यवस्था करतो.
ब्रिटन आता सम्राट राहिला नसून बटलर झालाय.