Description
अनुक्रमणिका
१. शिवपूर्वकाल
२. शहाजीची कामगिरी
३. शिवरायाचा उदय
४. स्वराज्याचा विस्तार
५. बलाढ्य शत्रूवर मात
६. जयसिंगाची स्वारी.
७. शिवाजी आणि औरंगजेब
८. चढाईचे राजकारण
९. मुघलांची पिछेहाट
१०. शिवराज्याभिषेक
११. कर्नाटक स्वारी
१२. सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज
१३. शिवरायाच्या कार्याचे स्वरूप
प्रास्तविक
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपर्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये ‘मऱ्हाष्ट्र राज्याची’ स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली.
कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधाररण महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापना केले नव्हते. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला मऱ्हाष्ट्र राज्य असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद्द शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जातीधर्माच्या लोकांना, साधुसंतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येयधोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठ्यांची अस्मिता जागृती केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांमध्ये संघठन निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राजवटींना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपति शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पटते. सतराव्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेला अत्यंत प्रतिकूल होती.
शिवाजी महाराजांचे कार्य
शुन्यातून स्वराज्य निर्माण करण्याचे अलौकिक कार्य शिवाजी महाराजांनी करून दाखविले. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याचे मोठे वैशिष्ठ्य असे होते की हे राज्य भोसले वंशाचे राज्य असूनही सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले राज्य होते. लोककल्याणाचा विचार करणारा राज्यकर्ता त्या काळामध्ये जगात इतरत्र झालेला आढळत नाही. म्हणूनच १७व्या शतकातील महान राजा या दृष्टीने शिवाजी महाराजांचेच नाव घ्यावे लागते. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या काव्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केलेले आढळते. फक्त एकाच ओवीमध्ये महाराज कसे होते ते रामदास स्वामींनी स्पष्ट केले आहे,
निश्चयाचा महामेरू । बहुत जनासि आधार ॥
अखडं स्थितीचा निर्धार । श्रीमंत योगी ॥
शिवाजीचे निकटवर्ती सहकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन करताना असे म्हटले आहे, ‘राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला… नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधिज छत्रपति जाहाला. ये जातीचा कोणी मागे जाहाला नाही. पुढे होणार नाही.’ रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रामध्ये शिवाजीचे कर्तृत्व सांगताना म्हटले आहे की, ‘त्यांनी केवळ नुतन सृष्टीच निर्माण केली’ समकालीन हिंदी कवी भूषण महाराजांविषयी लिहितो की,
साहि के सपूत सिबराज, समसेर तेरी
दिल्ली दल दाबि कै | दवाल राखी दुनी मै ॥
शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले म्हणून ते फार थोर होते असे म्हणता येणार नाही. राज्य स्थापन करून राज्याचा विस्तार केला हे त्यांच्या पराक्रमाचे लक्षण आहे. पण आपल्या राज्यातील रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारा महान पुरुष म्हणून शिवाजी महाराजांची योग्यता मोठी होती. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा आपल्या राज्यातील साधुसंतांना आणि स्रियांना काडीचाही उपद्रव लागू नये म्हणून अत्यंत प्रयत्नशील होता. परमुलुखातील स्रियांना आणि बालकांना उपद्रव देणाऱ्या आपल्या सैनिकाची गय केली जाणार नाही. असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले होते. ‘परमुलुखात बायका पोरं जो धरील त्याची गर्दन मारली जाईल हे शिवाजीचे ब्रीदवाक्य होते. शिवाजीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक धोरणाचा आढावा घेतल्यास लोककल्याण हेच त्यांच्या धोरणाचे मूलतत्त्व होते असे दिसून येते.
Reviews
There are no reviews yet.