Availability: In Stock

मुंबईचा वृत्तांत

Store
0 out of 5

प्रस्तुत ग्रंथ : मुंबईचा वृत्तांत

मुंबईविषयीचे दुसरे पुस्तक म्हणजे मुंबईचा वृत्तांत. हे ‘प्राचीन आणि अर्वाचीन वर्णनात्मक नकाशासह’ बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिले आणि निर्णयसागर छापखान्यात छापून १८८९ मध्ये प्रसिद्ध केले. आपल्यापुढील कार्याचा त्यांना योग्य अंदाज होता.

ज्या देशाचा  किंवा प्रान्ताचा इतिहास लिहावयाचा, त्याची पूर्ण माहिती ग्रंथकारास असली पाहिजे; तेथींल अनेक वयोवृद्ध व अनुभवशीर अशा गृहस्थांचा त्याच्याशीं परिचय असला पाहिजे, व त्याने त्या कामी साधनीभूत अशा अनेक ग्रंथाचे अवलोकन केलें पाहिजे. इत्यादी साधनांपैकी आम्हापाशी एकही पुरें साधन नसतां आम्ही हें धाडसाचे आणि त्यांत मुंबईसारख्या वैभवशाली शहराचा वृत्तांत लिहिण्याचे काम हातीं कां घेतलें असा प्रश्‍न साहजिक उत्पन्न होईल. होय. प्रश्‍न अगदीं बरोबर आहे. आह्मींही पूर्ण जाणत आहों की, हें काम आमच्या शक्‍तीपलिकडे आहे हें खचीत. तरी पण, यथाशक्ती प्रयत्न करून जी अल्पस्वल्प माहिती मिळविली ती तशीच दाबून न ठेवितां लोकांपुढे आणावी, बरीवाईट कशी काय असेल तशी त्यांचे ते पाहून घेतील; आणि आमचे दोष आम्हांस दाखवितील.

असे लेखकद्वयीने प्रस्तावनेतच लिहून ठेवले आहे. ज्या पुस्तकांची त्यांनी मदत घेतली त्यात म्याक्लिन्‌स गाईड टु बॉम्बे, बुक ऑफ बॉम्बे, मुंबईचे वर्णन, राऊंड अबाऊट बॉम्बे; मुंबईनो बहार (भाग १ला), बिंबाख्यान इत्यादींचा समावेश आहे.

नोंद: ‘मुंबईचे वर्णन’ हे कै. माडगावकराचे पुस्तक मुंबई शहरातील मराठीतील पहिले पुस्तक होय.

मुंबईचा वृत्तांत या १८८९ साली प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचे विस्तृत प्रस्तावनेसह यथामूल पुनमुुद्रण

Digital Book

Book info


  Ask a Question
Share...

Description

निवेदन : मधु मंगेश कर्णिक

‘मुंबईचे वर्णन’ हे कै. माडगावकराचे पुस्तक मुंबई शहरातील मराठीतील पहिले पुस्तक होय. त्याशिवाय १८८९ मध्ये प्रसिध्द झालेले ‘मुंबईचा वृत्तांत’ हे बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिलेले तत्कालीन मुंबईशहराबद्दल साद्यत माहिती देणारे असे पुस्तक तेवढेच महत्वाचे आहे. हे पुस्तक अनेक वर्षे दुर्मीळ होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या त्यावेळच्या अध्यक्षांनी त्याचे आवर्जुन पुनर्मुद्रण केले. आजच्या मुंबई शहराचे स्वरूप दीडशे वर्षापूर्वी कसे होते त्याचा इतिहास, भूगोल, रचना, चतुः सिमा इंग्रजी आमदानीतील तेथील कारभार, नागरी व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य आदी अनेक विषयांची माहिती ‘मुंबईचा वृत्तांत’ मध्ये वाचावयास मिळते. आजच्या पिढीला ही सर्व माहिती व वर्णन वैशिष्ट्यपूर्ण वाटेल.

मुंबईसारख्या सतत बदलत्या व विकसित होणाऱ्या शहराबद्दल असे माहितीपूर्ण पुस्तक उपलब्ध असणे ही एक ऐतिहासिक गरज आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने या महत्वपूर्ण पुस्तकाचे यथामूल पुनर्मुद्रण करावयाचे ठरवून आज ते पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे. वाचकांची जुन्या मुंबईबद्दलची जिज्ञासा हे पुस्तक पूर्ण करील असा विश्वास वाटतो. 

मधु मंगेश कर्णिक

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

दिनांक ३ ऑक्टोबर, २०११.

निवेदन: लक्ष्मणशास्त्री जोशी

एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकातील पहिल्या जागतिक युद्धाच्या काळापर्यंत मराठी साहित्यातील सिद्ध झालेली महत्त्वाची व पुस्तकांच्या बाजारात उपलब्ध न होणारी पुस्तके पुनः प्रकाशित करण्याचे धोरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ठरवले. अशाप्रकारची पुस्तके जर महाराष्ट्रातील खाजगी प्रकाशक व साहित्यिक संस्था यांनी प्रकाशित करण्याचे ठरवले तर मंडळ त्यांना अनुदान देण्याचा विचारही करते.

अशा साहित्याचे महत्त्व अनेक प्रकारचे आहे. मराठी साहित्याची शैली बदलत व विकसित होत गेली आहे ; कविता, कथा, लघुकथा यांचा आशय आणि आकृतिबंध वेळोवेळी बदलला आहे. ऐतिहासिक व भौगोलिक वर्णनांची पद्धती यांच्यात फरक पडत गेलेला आहे. वैचारिक निबंध व प्रबंध यांच्यातील ध्येयवाद व तत्त्वप्रतिपादन यांमध्ये नवीन नवीन भर पडत गेली आहे; जीवनमूल्यांमध्ये व सामाजिक परिस्थितीमध्ये जे परिवर्तन होत आहे त्याचाही वेळोवेळी वेगवेगळा ठसा साहित्यात उमटलेला आहे. या सर्व परिवर्तनांचे भिन्न भित्न आविष्कार आज अनुपलब्ध असलेल्या ज्या ज्या जुन्या मराठी साहित्यात आढळून येतात, ते ते साहित्य मराठी वाचकाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने अंगावर घेतली आहे.

अशा साहित्यामध्ये कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची निंबधमाला, कै. आगरकरांचे निबंध इत्यादी वैचारिक साहित्य येते. कै. न्यायमूर्ती रानडे यांच्या राईज्‌ ऑफ मराठा पॉवर किंवा  कै. नारायण गद्रे यांच्या महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग हे ग्रंथ येतात. यापैकी निबंधमाला मंडळाने प्रकाशनार्थ स्वीकारली आहे. आणि दुसरे दोन ग्रंथ प्रकाशित केले आहेत. कै. माडगावकर यांचे मुंबईचे वर्णन आणि कै. बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांच्या मुंबईचा वृत्तांत या पुस्तकांचाही मौलिक ग्रंथात समावेश होतो.

कै. माडगावकरांचे मुंबईचे वर्णन हे पुस्तक मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने या पूर्वीच पुनर्मुद्रित केले आहे. परंतु मुंबईचा वृत्तांत हे १८८९ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक आज अनेक वर्षे अनुपलब्ध होते. मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीचा वृत्तांत इ. स. १४०० पासून १८८८ पर्यंत या पुस्तकात दिलेला आहे. त्याचे पुनर्मुद्रण करावे असे मंडळाने ठरवले. मुंबई शहराच्या आणि उत्तर कोकणच्या इतिहासात अलिकडे बरेच नवे संशोधन झाले आहे. त्याची माहिती या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणात घ्यावी असे मंडळाने ठरविले आणि या पुनर्मुद्रित पुस्तकाचे संपादन मंडळाचे सुरुवातीपासूनचे सदस्य श्री. बापूराव नाईक यांच्याकडे सोपवले.

मुंबई शहराचा आणि परिसराचा इतिहास अलिकडे उपलब्ध झाला आहे. मंडळाचे माजी सदस्य म. म. डॉ. वा. मि. मिराशी यांनी या अज्ञात इतिहासावर नवा प्रकाश टाकला आहे. त्या माहितीचा उपयोग संपादकांनी प्रस्तावनेत करून घेतला आहे. मुंबई नगरीतल्या प्रगतीची माहिती साक्षेपाने गोळा करून प्रसिद्ध करण्यात श्री. शां शं. रेगे यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्या माहितीचा उपयोगही प्रस्तावनेत केला आहे, असे दिसून येईल.

मूळ पुस्तक १८६९ साली निर्णयसागर मुद्रणालयात मुद्रित झाले. त्याचे यथामूल मुद्रण प्रतिरूप पद्धतीने केले आहे. मराठीतील यथामूल पुनर्मुद्रण केलेल हे पहिलेच पुस्तक ठरावे. या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी पार पाडल्याबद्दल श्री. बापूराव नाईक आणि सुव्यवस्थित मुद्रण केल्याबद्दल अक्षर प्रतिरूप मुद्रणालयाचे श्री. अरुण नाईक यांचे आभार मानले पाहिजेत.

लक्ष्मणशास्त्री जोशी,

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

नारळी पौर्णिमा दिनांक २५ ऑगस्ट, १९८०. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुंबईचा वृत्तांत”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.