Description
या पुस्तकावरचा पुढील अभिप्राय तत्कालीन म्हणून उद्धृत करणे अत्यवश्य आहे…
ह्या महाराष्ट्रमहोदयाच्या पूर्वरंगांत साडेतीनशे वर्षांचा धार्मिक, राजकीय व सामाजिक इतिहास रा. गद्रे यांनीं बखरी, कागदपत्रे व शोधकांचे लेख इत्यादि सामुग्रीच्या आधारानें लिहिला आहे. रा. रा. नारायणराव गद्रे हे एक कसलेले लेखक असून, प्रस्तुत पुस्तकांतील माहिती संगतवार, भाषा प्रौढ, विवेचन मार्मिक व स्पष्ट असून, विषयाची मांडणी व्यवस्थिस असल्यामुळें हें पुस्तक बहुश्रुत मराठी वाचकांच्या आदरास पात्र होईल असा आम्हांस भरंवसा वाटतो. सामान्य वाचकांसहि हें पुस्तक वाचून ऐतिहासिक कादंबरीप्रमाणें मनोरंजन व बोध यांचा लाभ झाल्यावांचून राहणार नाही. [केसरी, तारीख ६-२-१९०६]
विजयानगरच्या इतिहासाकडे महाराष्ट्राच्या दृष्टीनें पाहण्याचा एकअभिनव प्रयत्न कै. ना. कृ. गद्रे यांनीं एका ग्रंथांत केला आहे. त्यांच्या ग्रंथाच्या नांवावरूनच त्यांच्या विचारांची दिशा कळून येण्याजोगी आहे. ‘महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग’ हें नांवच सांगतें की, महाराष्ट्रांत जी स्वराज्यस्थापना झाली तिच्या उदयाची पार्श्वभूमि चित्रित करणें हा रा. गद्रे यांचा उद्देश आहे. विजयानगरचें अस्तंगत साम्राज्य आणि महाराष्ट्रांतील स्वराज्याचा उदय हीं दोन्हीहि अदृश्य कार्यकारणभावानें निगडित असल्याचें प्रतिपादन रा. गद्रे यांनी केलें आहे, तें सर्वथा समर्थनीय नसलें तरी तसेंच तें सर्वथा उपेक्षणीयहि नाहीं.” [वि. पां. नेने संपादित अर्वाचीन मराठी साहित्य : द. वा. पोतदार : मराठी इतिहास व इतिहाससंशोधन, पा. ३६८]
पंढरपुरातील विठ्ठल मुर्ती आणि इतिहास
पंढरपुराहून विठ्ठलाची मुर्ती विजयनगरला नेली असता भानुदासांनी परत आणली या भानुदासासंबंधी टीपेंत श्रीविठ्ठलाची मूर्ती भानुदासांनी अनागोंदीहून आणिली इत्यादि वृत्तांतास प्रत्यंतर पुरावा नाहीं, म्हटलें आहे. परंतु त्यास रा. वि. का. राजवाडे ह्यांनीं ग्रंथमालेंत छापलेल्या चौऱ्यायशीच्या शिलालेखांत खालीलप्रमाणें पुरावा सापडतो. यवनांनीं ह्या देवळाचा व आंतील मूर्ती भंग करण्याचा प्रयत्न केला; तेव्हां अनागोंदी येथील तत्कालीन राजानें विठोबाची मूर्ती हंपीस नेली व तिची स्थापना त्या शहरी केली, अज्ली एक लोकवार्ता आहे. ही लोकवार्ता खरी आहे असें हंपी येथील शिलालेखावरून दिसून येतें.
ह्यावरून असें दिसतें कीं, शक १४३५ श्रीमुखनाम संवत्सराच्या पूर्वी दोन वर्षे पंढरपुराहून विठोबाजी मूर्ती विजयनगरच्या कृष्णदेवानें आणून हंपीस स्थापन केली. त्या वेळीं एकनाथाचा पणजा भानुदास चांगला वयांत आलेला असावा. पुढें यवनांची क्रूरदृष्टी किंचित कमी झाल्यावर भानुदासनें हंपीहून ती मूर्ती परत आणिली असावी. कर्नाटकांतील इतर मोठमोठ्या क्षेत्रांतून विठोबाची देवळें फारच विरळा आढळतात. प्रख्यात असें विठोबाचें देऊळ हंपीसच तेवढें एक आहे. तें कृष्णदेवानें क १४३५ त बांधून त्याच्या अर्चेची व उत्सवाची व्यवस्था लावून दिली.
Reviews
There are no reviews yet.