Description
रायगडचे दर्शन
रायगडचें इतिहासप्रसिद्ध स्थान माहीत नाही, असा मनुष्य महाराष्ट्रांत सापडावयाचा नाही. इंग्रज, पोर्तुगीझ, फ्रेंच या परकीयांस आणि भारतांतील सुशिक्षितांस रायगडच्या इतिहासाची कल्पना निश्चित आहे; कारण, तो रोमांचकारी व स्फुरण देणारा आहे. एका काळीं मुसलमानी सत्तांना रायगडचा विलक्षण दरारा वाटत होता आणि तेथे नांदू लागलेली स्वकीयांची निर्भय, दृढ सत्ता त्यांच्या डोळ्यांत कुसळासारखी सलत होती.
रायगडचें प्राचीन नाव रायरी असें होते व युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील ‘जिब्राल्टर’ म्हणून संबोधीत. जिब्राल्टरचें ठाणे जितकें अभेद्य, दुर्गम, तितका रायगड अजिंक्य असें स्पष्ट मत इंग्रज ग्रंथकारांनी नमूद करून ठेविलें आहे. पाचशे वर्षांपूर्वी रायगडास जेव्हा गडाचें स्वरूप नव्हतें व जेव्हा तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास तणस व रासिवटा अशीं दोन नांवें होती. त्याचा आकार, उंची व भोवतालच्या दर्या या सर्वांचे स्वरूप ध्यानी घेऊन त्यास नंदादीप असेंही एक नाव पडलें. अगदी आरंभीं तेथे घडशी कोळी रहात. आज आपण याच कोळी जमातीस डोंगरकोळी म्हणून संबोधितों. निजामशाहींत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरताच होई व त्यावर पहारा ठेवण्यासाठी पहारेकरी तेवढे रहात. येथील ‘घळकीच्या पहार्या’ चा उल्लेख जुन्या कागदपत्रांतून आढळतो.
रायरी हें नाव बदळून त्यास रायगड हें नाव शिवाजी महाराजांनी दिलें. हा नामकरणविधि केव्हा झाला असावा, हें आपणास शिवचरित्रप्रदीप पृ. ५० वरून स्पष्ट कळतें. “गडाची नावे ठेविले” अशी नोंद तेथे आढळते. या नोंदीचे वाचन आमचे मते ‘गडासी नाव ठेविले’ असें पाहिजे. रियासतकारांनी या नोंदीच्या आधारें केवढें काव्यमय भाष्य केलें आहे! ते म्हणतात, “शिवाजीने पुष्कळशा किल्ल्यांची जुनीं नावें बदलून संस्कृत वळणावर नवी सुंदर नावें ठेवलीं. रायरी घेतल्यावर शके १५७८ भाद्र ०श्व॥ ११ रोजीं [इ. स. १६५६ सप्टें. ४] गडांचीं नावें ठेविलीं असा उल्लेख शकावलींत आहे.” यावर आमचें म्हणणें एवढेंच की शिवाजीने गडांस नवीं, सुंदर नावें दिल्याचा प्रकार खरा असला, तरी तो नंतरचा आहे. इ. स. १६५६ सप्टे. ४ नंतर जिकलेल्या व बांधलेल्या किल्ल्यांस शिवाजीने अगोदरच नवीं नांवें दिलीं, असें मानणें योग्य होणार नाही.
प्रथमदर्शनी रायगड अगदी बाजूस असल्यासारखें वाटतें. पण रायगडपासून मुंबई, पुणें व सातारा हीं शहरें सारख्याच अंतरांवर आहेत. महाडच्या त्यावेळच्या बंदरापासून रायगड केवळ सोळा मैलांवर आहे.
अनुक्रमणिका
प्रस्तावना…
- रायगडचे दर्शन…
- रायगडचा पूर्वेतिहास.
- रायगडचें चढतें वैभव …
- रायगडवरील वैभवाची मध्याहून,
- ऑक्झेंडनची ऐतिहासिक वकिली …
- रायगडवरील पहिला राज्याभिषेक.
- राज्याभिषेकानें घडविलेलीं स्थित्यंतरे.
- भूषण कवीनें पाहिलेला रायगड
- शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक
- ऑस्टिनची रायगडवरील वकिली.
- राजे निजघामास गेले
- संभाजीच्या कारकिदीचें स्वरूप.
- रायगडावर शाक्तांचा वरचष्मा.
- संभाजीच्या रायगडवरून स्वार्या.
- रायगडचें वैभव ओसरलें..
- रायगडचें पहिलें पारतंत्र्य
- रायगड शाहूनें घेतला.
- रायगडवर पेशव्यांची सत्ता स्थापन झाली ..
- रायगडवरील वार्षिक अुत्सव…
- रायगडची दुरुस्ती, शाकारणी, राखण व गस्त
- रायगडवरील कैदी
- रायगडवरील शिबंदी व तिचें कामकाज
- रायगडची व्यवस्था व आयव्यय
- नाना फडणीस व रायगड
- पारतंत्र्याच्या अंधाराची चोरपावलें.
- रायगडवरील स्वातंत्र्यसूर्य मावळला
- रायगड–इतस्ततः.
- १८१८ नंतरचा रायगड.
ग्रंथनामसंक्षेप..
संदर्भग्रंथसूचि
व्यक्तिस्थलविषयसूची.
शांताराम विष्णु आवळसकर
शांताराम विष्णू आवळसकर तथा शां.वि.आवळसकर किंवा आवळसकर हे एक मराठी लेखक होते. यांनी रायगडची जीवनकथा हे पुस्तक लिहिले. मराठेकालीन कोकणच्या इतिहासाची साधनांचा त्यांनी प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला.
आवळसकरांनी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यात (आताचा रायगड जिल्हा) शिक्षक असताना ऐतिहासिक कागदपत्रे जमविण्यास त्यांनी सुरुवात केली. त्या विषयाची आत्यंतिक गोडी निर्माण झाल्याने तो त्यांच्या अध्ययन – संशोधनाचा विषय झाला. कागदपत्रांचा शोध घेत हिंडणे, जुनी दप्तरे पाहणे, ऐतिहासिक कागदपत्रांच्या नकला करणे, त्या पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाकडे पाठवणे, अन्य संशोधकांबरोबर चर्चा करणे, संशोधित कागदपत्रांना विवेचक प्रस्तावना लिहिणे या प्रकाराची कामे ते करत. भारत इतिहास संशोधक मंडळाशी १९४० पासून त्यांचा संबंध आला. आंग्रेकालीन पत्रव्यवहार, शिवचरित्र साहित्य खंड ९वा (चौल अधिकारी दप्तर), ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड १० इत्यादी त्यांचे लेखसंग्रह भारत इतिहास संशोधन मंडळाने प्रसिद्ध केले.
Reviews
There are no reviews yet.