The Anxious Generation

चिंता विकाराचा प्रसार । The Anxious Generation – Jonathan Haidt -निळू दामले

Share...

मानसीक विकार (डिसॉर्डर) झाल्यास त्यावर उपचार करता येतात, ते विकार आटोक्यात आणता येतात हे भारतात फार कमी लोकांना माहित असतं.  आपल्याला किंवा कोणालाही मानसीक विकार झाला आहे हेही लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं भारतात किती माणसं मानसीक विकारानं ग्रस्त आहेत हे नीटसं कळत नाही.

चिंता (अँक्झायटी) या विकारानं भारतातले १८ टक्के माणसं ग्रासली आहेत असा आकडा सांगितला जातो. परंतू हा आकडा वास्तवापेक्षा किती तरी कमी असण्याची शक्यता आहे.

चिंता आणि नैराश्य हे मानसिक विकार एकच आहेत असं मानलं जातं. ते खरं नाही. ते विकार एकत्र नांदतात पण स्वतंत्र आहेत.

आपलं कसं होणार याची चिंता माणसाला असते. सभोवतालची परिस्थिती इतकी अनुपकारक असते की आपल्याला अपयश येणार, धडक बसणार असं माणसाला पदोपदी वाटत असतं. आपण कमी पडतो असंही माणसाला वाटतं. असं सतत वाटत असण्यातून नैराश्य येतं. या विकारानं ग्रासलेल्या माणसाची कार्यक्षमता कमी होते, माणसं कामातून जातात, ढिली होतात, ढिम्म होतात. आत्महत्याही करतात.

हा विकार समाजात केव्हांपासून आला? इतिहासात ते स्पष्ट होत नाही. परंतू हा विकार विसाव्या शतकात लक्षात येऊ लागला आणि आता काळजी करावी इतका वाढला आहे हे निश्चित.

न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक जोनाथन हाईट यांचं प्रस्तुत पुस्तक लहान मुलांच्या विकारांचा विचार करतं. आताची पिढी ही विकारग्रस्त पिढी आहे असं हाईट यांचं मत आहे.

प्रस्तुत पुस्तकात अमेरिका आणि युकेमधल्या मुलांचा विचार केला आहे.

युकेमधे गेल्या वर्षी दरमहा ३५०० मुलं तातडीच्या उपचारांची आवश्यकता असल्यानं मानसिक आरोग्य विभागाकडं पोचली. संकट इतकं भीषण झालंय याची कल्पना सरकारला नाही, त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणं सरकारला जमलेलं नाही, त्यामुळं मुलांना उपचार मिळत नाहीत. २.५ लाख मुलं आरोग्य केंद्राच्या प्रतीक्षा यादीत आहेत आणि त्यातली ४० हजार मुलं दोन वर्षांपासून उपचार मिळेल याची वाट पहात आहेत.

अमेरिकेत १८ ते २५ वयोगटातल्या चिंताविकारी मुलामुलीं ९५ टक्क्यांनी वाढल्या, गेल्या वर्षीच्या तुलनेत.  

हाईट यांच्या मते ही समस्या सुरवातीला २००८ साली आणि कोविडनंतर अनेक पटीनी वाढली. २००८ साल अमेरिका आणि युरोपमधलं आर्थिक मंदीचं, आर्थिक संकटाचं साल होतं. नंतर कोविड आला. कोविडनं माणसं घरात अडकून पडली; या आजारामुळं आपलं काय होईल या विचारानं माणसं विकारी झाली. आर्थिक संकटामुळं तरूणांना आपलं भविष्य अंधारात आहे, अनिश्चित आहे असं वाटलं. कोविडमुळं तर जगण्याबद्दलच संशय निर्माण झाला कारण रोगाचं रूप आणि परिणाम याबद्दल प्रचंड अज्ञान होतं, आजही ते अज्ञान शिल्लक आहे.

हाईट यांनी शाळकरी/बालवयातल्या मुलांची वाढ कशी होते याकडं लक्ष वेधलं आहे. मुलं खेळत नाहीत. मुलं आईबापांच्या भोवतीच फार काळ असतात. मुलांवर आईबापांचं सारखं लक्ष असतं. मुलं ही आईबापांचे प्रोजेक्ट झालेले असतात, मुलांच्या पाठी आईबाप फार गोष्टी लावतात, हे शीक, ते शीक इत्यादी. आपलं कसं होणार ही चिंता आईबापांना छळत असते तीच चिंता ते पोरांवर लादतात, त्यांचं कसं होणार या चिंतेत आईबाप  मुलांमधे अडकून बसतात. 

परिणामी मुलांची नीट वाढ होत नाही.  संकटांचा सामना करत, संकटातून शिकत वाढणं ही माणसाची स्वाभाविक आवश्यकताच मुलांमधे पूर्ण होत नाही. जगात मिसळून शिकणं ही गोष्ट मुलांच्या बाबतीत होत नाही. मैदान वगैरे तर सोडूनच द्या. मुल फळा आणि गृहपाठ यातच गुंग रहातात. गरीब असोत की श्रीमंत, पालक मुलांना स्क्रीनच्या हवाली करतात.  टीव्हीचा स्क्रीन, टॅब्लेटचा स्क्रीन किंवा स्मार्ट फोनचा स्क्रीन.  मुलांची विश्लेषण शक्ती, कल्पना शक्ती क्षीण होते.

हाईट यांच्या मते सध्याच्या संकटाचं मुख्य कारण स्मार्ट फोन आहे. पुस्तकांची जागा स्मार्ट फोननं घेतलीय. मुलं स्क्रीनवर खेळतात, मैदानात खेळत नाहीत. मुलं स्क्रीनवरच्या माणसांत मिसळतात, खऱ्याखुऱ्या माणसांमधे मिसळत नाहीत.

उपाय काय? १३ वर्षाचा होईपर्यंत मुलाला स्मार्ट फोन न देणं. मुलांचा सार्वजनिक वावर वाढेल अशा संस्था निर्माण करणं.  दुर्दैवानं खुद्द युकेमधे शाळाही बंद होताहेत मग मुलांसाठी क्लब वगैरे उभं करणं सोडाच. युकेमधे शाळा बंद होतात पण पब नव्यानं उघडले जातात हे दुर्दैव आहे असं लेखक म्हणतो.

समाज विस्कळीत झालाय. श्रीमंत असो की गरीब, प्रत्येक घरातल्या तरुणाला भविष्याची चिंता आहे.समाजातलं विघटन, विविध गटांमधली वितुष्ट आणि द्वेष हेही समाजातलं वातावरण बिघडण्याचं एक मुख्य कारण आहे. 

डावे म्हणतात की सगळ्या विकारांचं मूळ आर्थिक विषमता, गरीबी आणि बेरोजगारीत आहेत.उजवे म्हणतात की उपरे, परधर्मी, परजाती, परदेशी, परभाषी इत्यादी समाजगटांमुळं समाजातलं दुःख वाढतय. शक्यता अशी आहे की दोघेही गट बरोबर असावेत. आर्थिक आणि सामाजिक लोच्या झाल्यामुळंही माणसं चिंतीत आहेत.

माणसं काम करत नाहीत, व्यसनी होतात, आत्महत्या करतात. जगभर तसं घडतांना दिसत आहे. 

मुलांची वाढ रोगट झाली तर पुढे मोठी झाल्यावर ती कशी असतील? मुलांची वाढ रोगट होते कारण त्यांचे पालक रोगट असतात. झालीची की गोची. 

शिक्षणात पैसे आणि डोकं गुंतवायला हवं. पण ते कसं जमणार? सरकारं म्हणतात की तेवढे पैसे आमच्याजवळ नाहीत, आम्हाला शस्त्रं, लढाया आणि मारामारीत जास्त पैसे लागतात. सरकारं म्हणतात की आम्हाला मंगळावर आणि कुठं कुठं त्यांना जायचंय.

The Anxious Generation: How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness   –  Jonathan Haidt

प्रस्तुत पुस्तक विचार करायला लावतं, आपल्याला चिंताग्रस्त करतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *