मानवी इतिहासात ग्रंथलेखनाची नांदी झाल्यावर अनेक उत्कृष्ट दर्जाची अक्षरवाङ्मय गणली गेलेली, मानवी मूल्यांची महत्ता सांगणारी साहित्यसंपदा आपल्या पूर्वसूरींनी निर्माण करून ठेवलेली आहे. लाखो लोकांनी शेकडो वर्षे ती वाचली, त्याची पारायणे केली. मानवी आयुष्य इतके मर्यादित आहे की तुम्ही २४ तास पुस्तके वाचत बसलात तरी तुमच्या बेभरवश्याच्या आयुष्यात काही हजारच पुस्तके वाचून होतील. भाराभर वाचनापेक्षा प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी निवडक अशी ज्ञान, माहिती, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद,मार्गदर्शक ठरणारी आणि मनोरंजक पुस्तके वाचावी. पुस्तक हे ज्ञानरंजनाचे साधन आहे, साध्य नव्हे. माणूस केवळ एका-मागोमाग पुस्तके आणत जातो व आपला ग्रंथसंग्रह वाढवत नेल्याने त्याच्याच मोहात अडकतो. अशाच मंडळींना समर्थ रामदासांनी पढतमूर्ख संज्ञा दिलेली आहे. नुसत्याच सरधोपट वाचनापेक्षा निरक्षिर विवेकाने वाचावे.
तुम्हाला वाचनाची आवड आहे, हे तुम्हाला मिळालेले एक वरदान आहे. नवनवीन पुस्तके वाचण्यास घेताना ते एक कोडं समजा.आपण एकटे सोडवणार आहोत ते कोडं!
सुरुवातीला वाचन केवळ आनंद मिळवण्यासाठी करा.
तुम्ही महिन्यातून १ पुस्तक वाचले तरी चालेल, मात्र सातत्य असू दे कासवासारखे!
कोणाशीही तुलना,स्पर्धा करू नका.
पुस्तकाच्या विषयावरून आपल्याला एका पानासाठी किती वेळ लागतो हे ठरत असते. आपल्या वाचनाचा वेग हा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो. आपली मनःस्थिती देखील त्या त्या वेळी कारक ठरते.
सर्व तऱ्हेची पुस्तके मजेत व आनंद घेत वाचा त्यासह पुस्तकाचा सर्व बाजूंनी अभ्यास करा. उदा, एका प्रसिद्ध लेखकाचा कथासंग्रह वाचला तर त्यातील कथांचे विषय लेखकाला कसे सुचले असतील, त्यातील विविध पात्रे कशी वागतात यासाठी लेखकाने काय निरीक्षण केले असेल, यात शब्द- अलंकार- धक्कातंत्र यांचा वापर कसा केला आहे, या कथा आपल्याला का आवडल्या, हा लेखक इतका लोकप्रिय का, पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या अशी पुस्तकाची झाडाझडती घ्या. याला पुस्तकाचा सर्वांगाने अनुभव घेणे म्हणतात. पुस्तकांची केवळ संख्या वाढवण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांना याचा गंधही नसतो.
ज्या विषयात तुम्हाला गोडी आहे, तुम्ही वाचताना देहभान हरपून जाता, तीच पुस्तके तुम्ही वाचत राहा. त्याच बरोबर एक करा की पुस्तक वाचून झाल्यावर आवडलेले काही एका वहीत टिपून ठेवा.
सुरुवातीला पुस्तके विकत घेण्याचा फंदात न पडता एखाद्या वाचनालयाचे सभासदत्त्व घ्या. तेथील पुस्तके चाळा, ज्यांचे विषय साधारण आवडतील ती वाचत राहा. एक दिवस तुम्हाला सर्वांत भावणारा वाचनप्रकार तुम्ही शोधून काढाल.
वैचारीकता, प्रगल्भता व प्रत्यक्ष आचरण यात काही बदल होत आहेत का याचे आत्मपरीक्षण करीत रहावे.
वाचनाची पहिली पायरी चढलात की मनन, चिंतन, विश्लेषण, अनुभावन आणि अनुसरण या पायऱ्या ही गाठता येतात. वाचक मित्र जोडावे, चर्चा करावी , विवेकी वादसंवाद करावा….
जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन। ||
मुले वाचत नाहीत अशी आजच्या पालकांपैकी अनेकांची तक्रार असते.
केवळ वाच असे सांगून मुले वाचणार नाहीत. त्यासाठी घरात वाचनाचे वातावरण दिसते का, हे महत्त्वाचे आहे. मुलांना लहानपणापासूनच वाचून दाखवायला पाहिजे, त्यांना पुस्तके हाताळायला दिली पाहिजेत. मुलांना पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य देणे हे गरजेचे आहे. आपली आवडीची पुस्तके सुचवावी पन मुलांवर थोपवू नये. पुस्तक वाचून दाखवताना त्यांना चित्रे, नकाशे, अॅटलास शब्दकोश यांच्या मदतीने संदर्भ समजावणेही गरजेचे असते. केवळ वाचनाचा आनंद या दृष्टीकोनातून पुस्तकाकडे पाहिले जाणे महत्त्वाचे असते, प्रत्येक पुस्तक हे ज्ञान, माहिती, अभ्यासात मदत म्हणून वाचले जाऊ नये.
https://timb.in/पुस्तके-का-वाचावी/
लहान मुलांना गोष्टी सांगता सांगता वाचुन दाखवायला सुरुवात केली की त्यांच्यात देखील वाचनाची आवड निर्माण होते …. वाचनाची सवय जेवढी लहानपणापासून लागेल तेवढी समज, आकलन क्षमता वाढण्यास मदत होते आणि व्यक्तिमत्व घडायला लागते. मुलं तीन-चार वर्षांची असल्यापासून अक्षरं-शब्द यांची जुळवाजुळव करायला लागतात. याच वयात असंख्य नवीन गोष्टी शिकता येतात. मुलांचं जसं वाचन वाढतं तसा शब्दांचा साठा वाढत जातो. त्याचमुळे चार लोकांशी मुलं बिनधास्त बोलू शकतात! खरंतर वाचनामुळे मुलांसह सर्वांचाच सर्वांगीण विकास होतो.. आत्मविश्वास येतो.. म्हणून विशेषत: मुलांना वाचनाची सवय लागली पाहिजे