ग्रंथालयं कमी होत आहेत?
बॉडेलियन ग्रंथालय ऑक्सफर्ड विश्वशाळेच्या प्रांगणात एका प्रशस्त दालनात १३०२ साली सुरू झालं. वर्गांच्या जवळच, विश्वशाळेच्या मधोमध हे दालन होतं.
सुरवातीला या ग्रंथालयातली पुस्तकं साखळीनं बांधलेली असत. साखळी इतकी लांब असे की पुस्तक कपाटापासून दूर नेऊन वाचता येत असे. पुस्तक साखळीत अडकलेलं असल्यानं वाचक ते बाहेर नेऊ शकत नसे.
पाचव्या हेन्रीचा भाऊ ड्यूक ऑफ ग्लूस्टरनं त्याच्याजवळची पुस्तकं आणि हस्तलिखितं या ग्रंथालयाला दिली. राजानं लक्ष घातलं, १० वर्षांच्या बांधकामानंतर १४८८ साली मोठी इमारत उभी राहिली.
१५५० मधे इग्लंडमधे धार्मिक उलथापालथ झाली. चर्च ऑफ इंग्लंड आणि कॅथलिक चर्च यात संघर्ष उद्भवला. चर्च ऑफ इंग्लंडनं कॅथलिकांची पुस्तकं नष्ट करायची ठरवलं, या ग्रंथालयातली पुस्तकं बाहेर काढली, बरीचशी जाळून टाकली. संस्थेकडं पैसे नव्हते, ग्रंथालय नव्यानं उभारणं शक्य नव्हतं. पाच वर्षं ग्रंथालय बापुडवाणं पडून होतं.
१५५५ मधे वैद्यकीय विद्याशाखेनं या ग्रंथालयाचा ताबा घेतला. थॉमस बॉडली या एका धनिकानं या लायब्ररीचं पुनरुज्जीवन केलं. त्यानं इमारत सुधारली, स्वतःच्या साठवणीतली २५०० पुस्तकं ग्रंथालयाला दिली. व्यवस्थित झालेलं आणि मोठं ग्रंथालय १६०२ मधे जनतेला खुलं झालं. १६१० ला स्टेशनर्स या पुस्तक प्रकाशन करणाऱ्या कंपनीबरोबर ग्रंथालयानं करार केला. स्टेशनर्स प्रसिद्ध करत असलेल्या प्रत्येक पुस्तकाची प्रत या ग्रंथालयात येऊ लागली. पुस्तकांची संख्या वाढत गेली, जागा अपुरी पडू लागली, इमारतीचा विस्तार केला गेला. बॉडली यांनी आपल्या मृत्यूपत्रात ग्रंथालयाच्या विकासासाठी बरीच रक्कम ठेवली होती.
ग्रंथप्रेमी धनीक ग्रंथालयाला पुस्तकांच्या देणग्या देत राहिले, ग्रंथालय विस्तारत राहिलं.
१८२९ मधे ग्रंथालयात दिवे लावले गेले. १८४९ मधे ग्रंथालय थंडीत उबदार ठेवण्याची सोय करण्यात आली.
या ग्रंथालयाची गंमत म्हणजे आजही इथं पुस्तकं घरी न्यायला दिली जात नाहीत. १६४५ मधे राजा चार्ल्स यानं पुस्तकं राजवाड्यात मागवली होती, ग्रंथालयानं दिली नाहीत.
१७४९ साली जॉन रॅडक्लिफ या माणसानं दिलेल्या देणग्यांतून ग्रंथालयात पुस्तकं आली आणि मधोमध घुमट असलेली ग्रंथालयाची मोठी इमारत बांधण्यात आली.
१८४९ साली ग्रंथालयात दोन लाख वीस हजार पुस्तकं आणि २१ हजार हस्तलिखितं होती.
१९१४ साली पुस्तकांची संख्या झाली १० लाख. पुस्तकांची संख्या वाढतच होती. म्हणून पुस्तकं साठवण्यासाठी तळघर करून त्यात एक मजला तयार करण्यात आला.
१९३१ मधे पुन्हा विस्तार करण्यात आला आणि ५० लाख पुस्तकं मावतील येवढी इमारत बांधण्यात आली.
सध्या या ग्रंथालयात १.५ वस्तू आहेत. त्यात पुस्तकं, हस्तलिखितं, नकाशे, करार इत्यादी गोष्टी आहेत. त्यात शेक्सपियरचं सर्व साहित्य एकत्र केलेलं फर्स्ट फोलियो हे १६२३ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे, गुटेनबर्गनं १४५० साली प्रसिद्ध केलेलं बायबल आहे, १४ व्या शतकात प्रसिद्ध झालेलं सचित्र पुस्तक, रोमान्स ऑफ अलेक्झांडर हे पुस्तक आहे.
युकेमधे ग्रंथालयांची संख्या कमी होतेय.
युकेमधे २००९।१० या वर्षी ४३५६ सार्वजनीक ग्रंथालय होती. २०१८/१९ ती संख्या ३५८३ वर घसरली. सार्वजनिक वगळता विविध शैक्षणिक संस्थांच्या ग्रंथालयाची संख्या ९५० आहे.
सार्वजनिक ग्रंथालयं सरकारी मदतीवर चालतात. २०२० साली सरकारचं अनुदान २ कोटी पाऊंडानं घटलंय.
ग्रंथालयात जाणाऱ्या माणसांची संख्या घटत आहे. छोट्या गावात जाणं कमी झालंय याचं कारण तिथली पुस्तकांची संख्या आता वाढत नाहीये, तीच तीच पुस्तकं माणसं किती वाचणार? अनुदानं कमी झाल्यानं कमी पुस्तकं विकत घेतली जातात. २००८ साली युकेच्या सार्वजनिक ग्रंथालयात. १० कोटी पुस्तकं होती. २०२० साली ती संख्या ७.३ कोटीवर घसरलीय.
मोठ्या शहरांत माणसं दिवसभर इतकी कशात तरी गुंतलेली असतात की ग्रंथालयात जाऊन निवांतपणे वाचायला लोकांना वेळ सापडत नाही. ग्रंथालयात जाणाऱ्या वाचकांची संख्या ७५ लाखांवरून ७३ लाखांवर घसरलीय.
युकेमधे ग्रंथालयांची संख्या कमी होतेय. कागदी पुस्तकं कमी वाचली जाणं हे तिथलं एक कारण दिसतंय. युकेमधे (अमेरिकेतही) वाचनालयानं स्थानिक स्वराज्य संस्था पैसे देतात. पैशाची ती वाट युकेमधे काहीशी निरुंद होतेय.
ग्रंथालयं आणि काही प्रमाणात छापील पुस्तकं यांच्याकडं माणसं कमी वळताहेत कारण आता डिजिटल वाचकांची संख्या वाढत चाललीय. युकेमधे ईबुक्स, ऑडियो बुक्स यांचे वाचक वाढू लागल्यानं कित्येक ग्रंथालयं कागदी पुस्तकं कमी करत असून इलेक्ट्रॉनिक पुस्तकं वाढवू लागलीत. २०२० साली आदल्या वर्षीच्या तुलनेत ८५ लाख जास्त ईपुस्तकं वाचली गेली.
वाचक ग्रंथालयात जातात किंवा जात होते कारण तिथं संदर्भ ग्रंथ उपलब्ध होतात. अलीकडं ऑन लाईन संदर्भ उपलब्ध झाले आहेत. अनेक ग्रंथ, विश्वकोष, विविध विषयांवरील पुस्तकं डिजिटल प्रकारात ऑन लाईन उलब्ध होतात. यातली कित्येक पुस्तकं बाजारातही मिळतात आणि कित्येक पुस्तकं ग्रंथालयंही देतात.
करमणूक आणि ज्ञान या दोन्ही भुका भागवण्यासाठी आता कागदी पुस्तकांची जागा इलेक्ट्रॉनिक पुस्तकं घेऊ लागल्याचा परिणाम ग्रंथालयांवर होतोय.
कागदी पुस्तकांचा वापर कमी होणं ही ग्रंथालयाची अडचण आहे. ही घटना दीर्घकाळ टिकणार नाही असा काही जाणकारांचा अंदाज आहे. कागदी पुस्तकं टिकाऊ असतात. डिजिटल पुस्तकं काही काळानं खराब होतात, ती कागदी पुस्तकांपेक्षा खूपच कमी टिकतात असं जाणकारांचं मत आहे. कागदी पुस्तकातल्या कागदाचा पुनर्वापर होतो. कागद मातीत मिसळतो, त्यातून नवी झाडं आणि नवा कागद होतो. हे नैसर्गिक चक्र इलेक्ट्रॉनिक पुस्तकांत होत नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तू निसर्गात मिसळत नाही, त्या वस्तूंची निर्मिती आणि क्षय या दोन्हीत निसर्गाचं कधीही भरून न येणारं नुकसान होतं असंही जाणकारांचं मत आहे.
माणसं कागदी पुस्तकांकडं वळण्याची दाट शक्यता आहे.
खाजगी संग्रह ही घटना फारच मर्यादित असल्यानं ग्रंथालय हाच टिकाऊ आणि स्थाई मार्ग आहे. अडचण आहे ती जागेची. शहरीकरणाच्या प्रक्रियेत जागा महाग होतात, लोकांना रहायलाच जाग नसल्यानं ग्रंथालयांना जागा द्यायला कोणी तयार होत नाही. दुसरं असं की पुस्तकांची वाढती संख्या सामावून घेण्याची ग्रंथालयाची क्षमताही मर्यादित होत जाते.
- लोकांना पुस्तकं घरी न्यायची तरतूद करणं, पुस्तकं घरी पोचवायची सोय केली तर ग्रंथालयातली बरीच पुस्तकं ग्रंथालयाच्या बाहेर रहातील.
- अलिकडं खाणावळी पदार्थ लोकांना घरी पोचवतात. त्यामुळं खाणावळीची जागा मर्यादित रहाते पण ग्राहकांची संख्या मात्र वाढत रहाते.
- पर्यावरण ही आता चिंतेची बाब झाली आहे.
- कागदी पुस्तक पर्यावरणमित्र आहे.
- ग्रंथालय हे एका परीनं मोकळा समुद्र, विस्तृत उद्यान, मोकळं मैदान यांच्यासारखीच एक जागा मानायला हवी. ऐसपैस पसरलेलं वाचनालय, त्यात शांतपणे वाचत असणारे नागरीक, तिथंच त्यांना विरंगुळा आणि छोटी भूक भागवण्याची व्यवस्था अशा गोष्टी असायला हव्यात.
भारतात सुमारे ९० हजार ग्रंथालयं आहेत. त्यातली सुमारे ८ हजार मोठ्या शहरात आहेत. उत्तर प्रदेश यासारख्या राज्यात ग्रंथालयं कमी आहेत, तामिळनाडू-केरळ इत्यादी राज्यांत ती खूपच जास्त आहेत.
भारतातल्या बहुतेक ग्रंथालयात पुस्तकांची अवस्था भीषण असते. ग्रंथालय असायलाच हवं म्हणून एक इमारत असते आणि त्यात चक्रम पद्धतीनं पुस्तकं भरलेली असतात.
भारतात सरकारी अनुदानावर ग्रंथालयं उभी रहातात.
समृद्ध देशांत स्थिती वेगळी आहे. ऑस्ट्रेलियात सार्वजनिक ग्रंथालयांसाठी दर माणशी ४४ डॉलर खर्च केले जातात, अमेरिकेत ३५ डॉलर आणि फिनलंडमधे ३५ डॉलर. भारतात सात पैसे.
भारतात मुळातच माणसांना वाचायची सवय अजून म्हणावी तशी लागलेली नाही. वाचायची सवय नसलेला माणूस पुढारी किंवा नोकरशहा झाल्यावर ग्रंथालयांवर सार्वजनीक पैसा कसा खर्च होणार?