Availability: In Stock

तेजस्विनी अहिल्याबाई होळकर

SKU: MH19

Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.

Store
0 out of 5

ही तर रणरागिणी प्रजा वत्सल राणी 

ज्या समाज रचनेत कोणतीही उन्नतीची साधने स्रियांना उपलब्ध नसताना, त्याकाळी या महान कर्तृत्व शालिनीने “पति’ बरोबर “सति” न जाता प्रजापालन करण्यासाठी जीवन जगण्याचा स्वीकार केला!!  ही प्रजा वत्सल राणी जनमानसाच्या डोळ्यातील पाणी पुसणारी खरी लोकमंगल माता झाली!!  संपूर्ण भारतात त्यांचे नांव अत्यंत श्रद्धेने गौरवले गेले आहे. अत्यंत समृद्ध अशा राज्याची स्वामीनी असूनही आपली सर्व संपत्ती लोककल्याणार्थ खर्च केली. मंदिरे आणि तीर्थस्थाने यांना संरक्षण दिले. भारतीय शिल्प, कला, साहित्य आणि संस्कृती यांची अमोल सेवा केली. भारताच्या राज्य प्रशासनात त्यांच्या कार्याचे स्थान अढळ आहे. सर्व स्वकीयांना इंग्रज फिरंग्या विरुद्ध एकत्र होण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांनी पुढील संकट ओळखले होते – अशी दूरदृष्टी – अशी प्रजा वत्सल समदहृष्टी आणि कर्तृत्व सृष्टी – असलेल्या अहिल्या देवीचे या महान लोकमातेचे चरित्राचे  वाचक वर्ग उत्साहाने स्वागत करतील अज्ञी आशा  आहे. 

Book info

विजया जहागिरदार
94

998 in stock

  Ask a Question
Share...

Description

मनोगत 

गेली कित्येक वर्षे माझं मन अहिल्यादेवींनी व्यापून टाकलं आहे. त्यातूनच सहा वर्षे अनेक पुस्तकांचे वाचन करून, अभ्यास करून कर्मयोगिनी’ ही ३०० पानी चरित्र कादंबरी इतिहासाशी इमान राखून लिहिली. मध्यप्रदेश साहित्य अँकॅडमीने त्या कादंबरीस भा. रा. तांबे पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला. त्यानंतर मुलांसाठी लोकमाता हे कथांचे पुस्तक लिहिले. (दिलीप महाजन – मोरया प्रकाशन – डोंबिवली) आणि आज ‘तेजस्विनी’ हे देवींचे चरित्र लिहिले आहे. कितीही लिहिले तरी या अपूर्व स्रीचे वर्णन पूर्ण होत नाही.  

त्या पुण्यशील, धार्मिक म्हणून तर अवघ्या जगास माहीत. ठिकठिकाणचे घाट, देवळे, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी, तळी, कुंडे, रस्ते, यासारखे प्रचंड कार्य तर आसेतुहिमाचल पसरलेले आहे. पाणपोया, अन्नछत्रे आज दोनशे वर्षांनंतरही चालू आहेत. हे कार्य अनेक मुखाने त्यांची धर्मपरायणता आणि औदार्य गर्जुन सांगत आहे. परंतु आश्चर्याने थक्क करतं ते त्यांचं अपार शहाणपण, मुत्सद्दीपण, ज्ञानलालसा, असामान्य तडफ, हिशोबातली समूळ पारंगतता, तेज, झुंज घेण्याचा खंबीरपणा! प्रजावत्सलता, अचूक न्यायदान, आत्मविश्वास, पुरुषार्थ, रणकौशल्य, संरक्षणव्यवस्था, गुप्तहेर खाते, स्वाभिमान, राज्यकारभाराची जाण, रणकौश्ल्य आणि माणुसकीशी घट्ट नातं असणारं परदुःखकातर असं मन! श्रीमंतांच्या गादीशी असलेली निष्ठा, जिद्द, बाणेदार वृत्ती, साधी राहाणी आणि कल्याणकारी विचारसरणी. या अनेक सद्गुणांचे, त्यांच्या तेजस्वी वागण्याचे, पुरावे इतिहासाच्या पानोपानी आहेत. त्यांची ही स्वाभिमानी आणि तेजस्वी बाजूसुद्धा सर्वांना कळावी याचा ध्यास मला लागला, त्यामुळेच हे लेखन तळमळीने झाले आहे. काही टीकाकारांनी त्यांच्या दानधर्मात होणाऱ्या पैशांच्या उघळपट्टीला दोष दिलेला मी वाचला. अन्‌ त्याचवेळी त्यामागची भूमिका आणि अनेक सद्‌गुण, सर्वांना कळलेच पाहिजे असं प्रकर्षाने वाटलं. पहिलीच गोष्ट अशी की दान हे आपल्या संस्कृतीचे वरदान आहे. त्याला कुणी उधळपट्टी म्हणत नाहीत. हा दानधर्म, इतकेच नव्हे तर अनेक मंदिरे, तळे, धर्मशाळा त्यांनी त्यांच्या खाजगी उत्पन्नातून केलेल्या आहेत. खाजगी खर्चाची पैसुद्धा सरकारी तिजोरीवर पडू नये.” हे त्यांचे   ब्रीदवाक्य होते. त्यांच्यावर कोसळलेले कौटुंबिक आघात पाहिले तर त्यांच्या धार्मिक वृत्तीस दोष देण्याचे धारिष्ट्य कुणालाच होणार नाही. पती खंडेरावांचा अकाली मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती! गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू जरी वयोमानाप्रमाणे झाले तरी अहिल्याबाईचा आधारच निखळून पडला. मल्हाररावांच्या दोन बायकांना सती जातांना त्यांना पाहावं लागलं. याहूनही भयानक आघात पुढे होतेच. पुत्र मालेराव अवघ्या बावीस वर्षाच्या तरुण वयात मृत्यूमुखी पडला. त्याच्या दोन बायका सती गेल्या. मुक्ता ही मुलगी. तिचा मुलगा नथूही बावीसाव्या वर्षी क्षयाला बळी पडला. त्या दोन चिमण्या नातसुनांचं सती जाणं, त्यांना बघणं, त्यांच्या दुर्दैवात होतं. शेवटी मुक्ता फक्त राहिली होती. जावई यशवंतराव फणसे कॉलऱर्‍्याचा बळी ठरले आणि मुक्ता तिच्या दोन सवतींसह सती गेली. एकुण पांच जिवलगांचे मृत्यू आणि अठरा सतींच्या किंकाळ्या ज्यांनी ऐकल्या त्यांच्या वेदनांचं, दुःखाचं वर्णन कोण आणि कसं करणार? तरीही ही बाणेदार स्त्री शेवटपर्यंत कुणालाही शरण न जाता कठोर कर्मयोग आचरत राहिली. तुकोजीची कर्जे निवारत, पैसा पुरवित राहिली. त्यांच्या कर्तव्यकर्माचा पट मोठा आहे. बुद्धीचा आवाका दांडगा, सामर्थ्य थोर आहे!  

हे सारे वाचकांना एकत्रितपणे कळावे म्हणून चरित्रकथनानंतरही मी चार प्रकरणे यात घातली आहेत. एकंदर आढावा, रुढीपरंपरा, मूळ तत्त्वे आणि कूटनीती या प्रकरणातून त्यांच्या राज्यकारभाराचे चित्र स्पष्ट होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अहिल्याबाईंच्या खुणा आहेत. त्यांचे कार्य वेगवेगळ्या रूपात उभे आहे. अहिल्याबाईंनी केलेला दानधर्म प्रजेच्या सुखासाठी केला. त्यांच्या औदार्याचा परिणाम त्यावेळच्या इतर राजांवरही झाला आणि तेही दानधर्म करू लागले. औदार्याचे बीज पेरण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. पुणे ही राजधानी असल्यामुळे पुणे दरबारी अहिल्यादेवींची तेजस्वी छाप पडली होती. ‘पुणे दरबारचे पुण्यद्वार महेश्वर आहे.’ असे खुद्द पेशव्यांनी म्हटले आहे.

अहिल्याबाईंनी दिलेल्या कित्येक गावाच्या जहागिऱया वंशपरंपरेने चालत होत्या. कूळकायदा १९५५ साली आल्यानंतर त्या जहागिऱया विलीन करण्यात आल्या.

महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, जीवनावर अहिल्याबाईचा फार मोठा ठसा उमटलेला आपल्याला दिसतो. आज दोनशे वर्षानंतरही त्यांचे नांव ताजेतवाने आहे. हेच त्यांच्या कर्तृत्वाचे फार मोठे गमक आहे.

अहिल्यादेवी लोकमाता होत्या, पुण्यश्लोक ‘होत्या. त्या. त्यांचे हे चरित्र अनेकांना धैर्य, शौर्य, स्फूर्ती, सामर्थ्य देवो अश्नी इच्छा व्यक्त करून, त्यांना अभिवादन, प्रणिपात आणि नमस्कार करून पूर्णविराम देते आणि हे चरित्र लोकार्पण करते.

– सौ. विजया जहागीरदार

१ सोना मोती अपार्टमेंट,

५६०/५८ दक्षिण सदर बाजार, सोलापूर-४१३ ००३

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तेजस्विनी अहिल्याबाई होळकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.