Description
शरदिन्दु बंद्योपाध्याय यांच्या मूळ बंगालीतल्या आणि अतिशय गाजलेल्या ‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’ या शेरलॉक होम्स, डॉ. वॅटसन च्या व्यक्तीरेखेशी साम्य दाखवतात. रहस्याचा शोध घेण्याची पद्धत, नुसत्या तर्कांवर आधारित काढलेले अचूक निष्कर्ष, तसंच आपली उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना व्योमकेशच्या विचारात व्यत्यय येऊ नये म्हणून काहीही प्रश्न न विचारता गप्प बसणारा त्याचा मित्र अशा काही गोष्टी जणु त्याचप्रमाणे. व्योमकेशचा मित्र अजित जो व्योमकेशबरोबरच राहतो, तो एक लेखक आहे. या दोघांमधले संवाददेखील अतिशय चांगले आहेत.
शरदिन्दु बंद्योपाध्याय यांनी व्योमकेशच्या मुखातुनच ‘गुप्तहेर’,डिटेक्टिव ह्या शब्द नाकारला आहे. व्योमकेश स्वत:ला सत्यान्वेषी म्हणवून घेतो, म्हणजेच सत्याचा शोध घेणारा. त्याच्या पत्नीचे नाव सत्यवती हे देखील त्याला शोभेल असेच आहे. साधारणत: गुप्तहेरांना लग्न, मुलं अशा गोष्टींमध्ये काडीचीही उत्सुकता नसते. व्योमकेश बक्षी हा बहुतेक एकमेव विवाहित गुप्तहेर असावा!
पोलिस दलाची काही वैशिष्ट्यं, ज्यामुळे गुन्हेगाराला पकडण्यास अडथळे येतात त्या गोष्टी तसंच पुरावा आणि तर्कशुद्ध अंदाज यापैकी काय जास्त अचूक अशा विषयांवर व्योमकेशआणि अजित या दोघांचे वादविवाद होतात. त्यातुनच मग आपल्याला रहस्याची उकल होते, खरे अपराधी लक्षात येतात.
‘व्योमकेश बक्षी रहस्यकथा’च्या चारही भागांतील गोष्टी अत्यंत मनोरंजक व खिळवून ठेवणाऱ्या आहेत. शरदिन्दु बंद्योपाध्याय प्रत्येक कथेत आपल्याला अगदी व्यवस्थित गुंतवून ठेवतात. एका रहस्यकथा वाचकाच्या डोक्याला पुरेसे खाद्य या कथा पुरवतात. सत्यान्वेषी व्योमकेश हा अत्यंत हुशार, चलाख व थोडा विक्षिप्त असला तरीही स्वत:चा वेगळेपणा दाखवतोच आणि त्यामुळे आपल्याला आवडूनही जातो. या कथांचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी अतिशय ओघवत्या व रसाळ भाषेत केला आहे. त्यामुळे व्योमकेश मराठी वाचकांनाही भुरळ घलेल असे खात्रीने म्हणता येते.
Reviews
There are no reviews yet.