• -100% तुकारामाचे अभंग

    श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा

    0

    निवेदन 

    पंढरपूरचा श्री विठ्ठल हा जसा आपल्या ‘विठोबा’ या मराठमोळ्या नावाने महाराष्ट्रीय समाजाच्या हृदयामध्ये अत्यंत आदरपूर्वक प्रस्थापित झाला आहे, त्याप्रमाणेच त्याचा परमभक्त संत तुकाराम यालाही महाराष्ट्राच्या मनामध्ये अद्वितीय आणि अलौकिक स्वरूपाचे स्थान मिळालेले आहे. मराठी भक्तजन श्री ज्ञानदेवांच्याबरोबरच संत तुकारामांनाही परमश्रध्येय मानतात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा उत्कट भावाने गजर करतात. श्री विठ्ठल, श्री नामदेव, संत तुकाराम ही महाराष्ट्राची आराध्य दैवते आहेत. श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिभेने जज्ञी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच उत्कट भक्तीभावाने संत तुकारामांनी आपले अभंग लिहिले. तुकाराम हे महाराष्ट्रातील संत मंडळींचे शिरोभूषण मानले जातात. गेली साडेतीनशे वर्षे तुकारामांची गाथा महाराष्ट्राने हृदयाशी बाळगून आध्यात्मिक वाटचाल केली आहे.  

    जनसामान्यांना प्रिय असलेल्या संत तुकारामांची सकल गाथा प्रसिद्ध करून ती सर्वांना उपलब्ध करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई सरकारने १९५० साली घेतला आणि शासनामध्ये न्यायमूर्ती या उच्च पदावर काम करतानाही अंतरीचे काव्यगुण जोपासणाऱ्या आणि संत वाड्मयाचा प्रगाढ व्यासंग असलेल्या स्व. पुरुषोत्तम मंगेश लाड या विद्वान सनदी अधिकाऱ्याची गाथेच्या संपादनासाठी नियुक्ती केली. लाड हे स्वतः उत्तम कवी होते आणि त्यांचा संत वाड्मय आणि आधुनिक कविता यांचा विशेष अभ्यास होता. तुकारामांची गाथा संपादित करून प्रकाशित करण्याचे महत्‌ कार्य लाडांनी स्वीकारले आणि आपल्या अतिशय विवेचक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह १९५० साली तुकारामांची गाथा शासनातर्फे प्रथम प्रकाशित झाली. तिचे वाचकांनी अभूतपूर्व स्वागत केले. १९५५ साली तुकाराम बीजेला गाथेची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर १९७३ साली तिसरी आवृत्ती शासनातर्फे प्रकाशित झाली आणि आता ती दुर्मीळ झालेली आहे.  

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे श्री एकनाथी भागवत आणि श्री नामदेव गाथा हे दोन बहुमोल ग्रंथ पुन्हा प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे दुर्मीळ झालेली तुकारामांची गाथासुद्धा पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९५० साली प्रथम प्रकाशित झालेल्या गाथेच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सुयोग सध्याच्या मंडळाला लाभलेला आहे. श्री नामदेव, श्री एकनाथ आणि संत तुकाराम यांचे वाड्मय महाराष्ट्राला पुन्हा अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याची सुसंधी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. संत तुकारामांना विनम्र भावाने अभिवादन करून ही गाथा मी महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करीत आहे.  मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart