व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला.माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळ दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५–८५) नोकरीत होते.

 
						 
						 
						 
						